पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिल्ली विद्यापीठाची दुनिया निशिकांत मिरजकर डॉ. निशिकांत मिरजकर दिल्ली विद्यापीठातील कला शाखेचे अधिष्ठाता (डीन) व व्यवस्थापन परिषदेचे (एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे) सदस्य होते. त्यांच्या पत्नी डॉ. ललिता यांनीही तिथे प्राध्यापक म्हणून काम केले. देशातील बहुतेक प्रमुख भाषांचे तिथे शिक्षण घेता येते. तीस वर्षे त्यांनी तिथे व्यतीत केली. त्यांचे तेथील काही अनुभव. सांगलीच्या श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून चार वर्षे काम केल्यानंतर जुलै १९७८ मध्ये मी दिल्ली विद्यापीठात रुजू झालो. एक वर्षानंतर आम्ही आमचा कुटुंबकबिला दिल्लीला हलवला. आणखी एका वर्षांनंतर डॉ. ललिता मिरजकर यांचीही नियुक्ती दिल्ली विद्यापीठात झाली. अधिव्याख्याता, प्रपाठक, प्राध्यापक अशा पदोन्नती होत आम्ही दोघांनी दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले. कालांतराने मी 'आधुनिक भारतीय भाषा व साहित्याभ्यास' या आमच्या विभागाचा प्रमुख झालो, कलाशाखेचा अधिष्ठाता (आर्ट्स फॅकल्टीचा डीन) बनलो, विद्यपीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल) सदस्य बनलो. तीस वर्षांचा प्रदीर्घ काळ मी दिल्ली विद्यापीठात व्यतीत केला. या प्रदीर्घ काळातील अनुभवांविषयी परिचितांना आणि जिज्ञासूंना कुतूहल असणे हे स्वाभाविक आहे. दिल्ली सोडून आता पुरेसा काळ लोटल्यामुळे मलाही त्या अनुभवांचा पोत काहीशा तटस्थपणे न्याहाळणे आणि त्यातले ताणेबाणे नीट समजून घेणे शक्य होईलसे वाटते. म्हणून 'अंतर्नाद'च्या वाचकांसाठी तसा प्रयत्न करण्याचे योजले आहे. सुरुवात दिल्ली विद्यापीठातील मराठीच्या अध्यापनापासून करू या कारण भारताच्या राजधानीतील विद्यापीठात मराठीचे अध्यापन कसे चालते, याविषयी बऱ्याच लोकांना कुतूहल असते. कित्येकांना तर दिल्लीत विद्यापीठीय पातळीवर मराठीचे अध्यापन ही गोष्टच असंभाव्य आणि अविश्वसनीय वाटते. दिल्ली विद्यापीठात मराठीचे अध्यापन अठ्ठावन वर्षांपूर्वी म्हणजे १९६० मध्ये सुरू झाले. तेही हिंदी विभागाच्या अंतर्गत, हिंदी विभागाने तेव्हा एम.ए. च्या अभ्यासक्रमात 'काँपोझिट कोर्स या वैकल्पिक अभ्यासक्रमाचा समावेश केला. त्यानुसार मराठी, बांग्ला, तमिळ आणि मल्याळम यांपैकी कोणत्याही एका भाषेतील साहित्याविषयीच्या दोन प्रश्नपत्रिका एम. ए. (हिंदी) च्या विद्यार्थ्यांना घेता येण्याची सोय निर्माण झाली. अर्थातच या चारही विषयांच्या अध्यापनाची व्यवस्था केली गेली. मराठीकरिता डॉ. म. अ. करंदीकर यांना हिंदी विभागामध्ये मराठीचे प्रपाठक म्हणून नेमण्यात आले. लगोलग 'आधुनिक भारतीय भाषा या स्वतंत्र विभागाची स्थापना झाली. दिल्ली विद्यापीठात मी या विभागात मराठीचा अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो, तेव्हा या विभागात असमीया, बांग्ला, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी, सिंधी, तमिळ आणि तेलुगू अशा बारा भाषांचा समावेश होता. या सर्वच भाषांमध्ये प्रमाणपत्र आणि पदविका असे भाषेचे अभ्यासक्रम होते. हे अभ्यासक्रम केवळ भाषाशिक्षणाचे होते. हे अर्धवेळ अभ्यासक्रम होते. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असे. अक्षरश: हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करीत. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता 'बारावी उत्तीर्ण एवढीच होती, तरी पदवीधर विद्यार्थीही प्रवेशासाठी अर्ज करीत या गर्दीमागे नवीन भाषा शिकण्याची विद्यार्थ्यांची तळमळ हे कारण नव्हते. खरे कारण वेगळेच होते. त्या काळी विद्यार्थ्यांना दिल्लीच्या स्थानिक बससेवेचा 'ऑल रूट पास' केवळ बारा रुपयांत मिळायचा. म्हणजे महिन्याला फक्त बारा रुपये भरून कोणत्याही रूटच्या बसने कितीही वेळा प्रवास करता यायचा प्रवेश मिळवण्याची विद्यार्थ्यांची धडपड या पासकरिता असायची! एकदा पास पदरात पडला, की मग ते वर्गाकडे ढुंकूनही पाहायचे नाहीत. पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, तर परीक्षेपर्यंत सहासातच विद्यार्थी उरलेले असायचे. हे खरे विद्यार्थी असायचे. श्रीकांत नरुला नावाचा एक विद्यार्थी होता. तो महानुभाव होता आणि धर्मभाषा म्हणून मराठी शिकत होता, निष्ठेने मराठी शिकून त्याने महानुभावांचे साहित्य वाचून काढले आणि श्रीचक्रधरांच्या जीवनावर एक आणि महदाईसेच्या जीवनावर एक अशा दोन उत्कृष्ट चरित्रात्मक कादंबऱ्या हिंदीमध्ये लिहिल्या. अंशुल नावाची एक बिहारी मुलगी होती. तिला एका मराठी मित्राशी लग्न करायचे होते, म्हणून ती मराठी शिकली. त्याच्याशी लग्न करून ती मुंबईला गेली आणि आता उत्कृष्ट मराठी बोलते. केंद्रीय हिंदी निदेशालयातील एक अधिकारी आणि संसदेमध्ये अनुवादक म्हणून काम करणारे एक अधिकारी मराठी शिकले आणि आपापल्या कार्यालयात त्यांना त्याचा उपयोग करता आला. निवडक अंतर्नाद ३९७