पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्याआधी डॉ. शिशिरकुमार दास विभागप्रमुख असताना त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली होती आणि त्या दृष्टीने माझ्या मदतीने त्यांनी हा अभ्यासक्रमाची आखणी करायला प्रारंभही केला होता, पण त्यांचा पवित्रा अत्यंत सावधगिरी चा आणि केवळ वैचारिक पातळीवर थबकणारा होता. मी धडाक्याने ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धार केला. रीतसर एक अभ्यासक्रम समिती स्थापन करून त्यावर विषयतज्ज्ञ म्हणून कोलकात्याचे डॉ. अमिय देव आणि मुंबईचे डॉ. भालचंद्र नेमाडे यांना निमंत्रित केले. समितीच्या दोन सभांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण निश्चित करून यकला, या वेळेपर्यंत मी कलाशाखेचा अधिष्ठाता झालेलो असल्यामुळे कलाशाखेच्या नियामक समितीमध्ये तो अभ्यासक्रम मंजूर करून घ्यायला काहीच अडचण आली नाही. त्यानंतर विद्वत्सभा आणि त्यानंतर विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद यांची मंजुरी मी मिळवली. मी या दोन्ही ठिकाणी सदस्य होतोच. त्यामुळे तेथे भाषणे करून मला अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि महत्त्व इतर सदस्यांना नीट समजावून सांगता आले आणि त्यांच्या शंकांचे निराकरण करता आले. एका वर्षात हे सर्व करून पुढल्या वर्षी मी एम. ए. (तौलनिक भारतीय साहित्य) चे वर्ग सुरू केले! तरीही, पहिल्या वर्षी अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी घेतलेल्या विभागातील प्राध्यापकांच्या बैठकीत डॉ. दास यांनी सबुरीचा राग आळवला. "अजून आपल्या विभागातले अध्यापक तौलानिक साहित्याच्या अभ्यासात पुरेसे प्रशिक्षित झालेले नाहीत, तेव्हा प्रत्यक्ष अध्यापन आपण इतक्यात नको सुरू करायला' असा विचार त्यांनी मांडला. यावर मी एक दीर्घ भाषण करून प्राध्यापकांना भावनिक स्तरावर आवाहन केले. हा अभ्यासक्रम लौकरात लौकर सुरू करणे हे कसे विभागाच्या हिताचे आहे ते सांगून मी म्हटले, 'पोहायचे असेल, तर आधी मला पोह्ययला चांगले येऊ दे; मगच मी पाण्यात उडी टाकेन, असे म्हणून कसे चालेल? पाण्यात उडी यकल्यावरच पोह्ययला येईल. आधी डुबक्या खाव्या लागतील, नाकातोंडात पाणी जाईल, पण त्यातूनच पट्टीचे पोहणारे तयार होतील." माझ्या भाषणानंतर सगळ्या प्राध्यापकांनी अभ्यासक्रम सुरू करायला पाठिंबा दिला. दास यांनीही आपला विरोध मागे घेतला. एकदा अभ्यासक्रम सुरू झाल्यावर तो चालवताना त्यांनी पूर्ण सहकार्य दिले, 'तौलनिक साहित्य सिद्धांत व इतिहास हा विषय त्यांनी निवृत्त होईतो शिकवला. दिल्ली विद्यापीठाची प्राध्यापक संघटना (DUTA - Delhi University Teachers Association ) फारच शक्तिशाली आहे. DUTAने काही कारणाने संप पुकारला, तर विद्यापीठाचे सर्वच व्यवहार बंद पडतात, हे मी एकदा प्रत्यक्ष अनुभवले आहे. DUTAच्या या ताकदीमुळे अगदी कुलगुरूंपासूनच्या सर्व अधिकारयंत्रणा कायमच DUTAला न दुखवता चुचकारूनच आपला कार्यभाग साधत असतात. DUTA च्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका दर दोन वर्षांनी मोठ्या जोरदारपणे होतात. त्यामध्ये सगळे राजकीय पक्ष सहभागी असतात. ४०२ • निवडक अंतर्नाद एकूणच दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकवर्गात राजकीय मतप्रणालीच्या वर्चस्वाचा प्रभाव मला जास्त जाणवला. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या नियुक्ती करताना जे मुलाखती घेणारे पॅनेल असते, त्यामध्ये संबंधित विभागाचा विद्यापीठातील विभागप्रमुख हा एक पदसिद्ध सदस्य असतो. माझ्या विभागप्रमुखपदाच्या कालावधीत दिल्लीमधील महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या भारतीय भाषांच्या अध्यापकांच्या नियुक्तींसाठी मुलाखती घेणाऱ्या पॅनेलचा सदस्य म्हणून जाण्याचा अनुभव मला अगणित वेळा आला. महाविद्यालयांतील नियुक्तींची प्रक्रिया मी जवळून पाहिली. त्यामध्ये कुठे पैशाची देवाणघेवाण होत असल्याचा संशय मला कधी आला नाही. परंतु एखाद्या उमेदवाराच्या नियुक्तीविषयी निर्णय घेताना त्याच्या राजकीय विचारधारेची चर्चा मात्र अगदी उघडपणाने होत असे. महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती ज्या राजकीय विचारप्रणालीची असेल, त्याच विचारधारे चे प्राध्यापक नेमण्याकडे सार्वत्रिक कल असे. दिल्ली विद्यापीठातील काही प्राध्यापकांशी माझे छान सूर जुळले, डॉ. शिशिरकुमार दास हे त्यांपैकी प्रमुख. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तौलनिक साहित्याचे अभ्यासक होते. आमच्या विभागात ते 'गुरुदेव टागोर अध्यासना' चे बांग्लाचे प्राध्यापक होते. बांग्लामधील विख्यात नाटककार आणि कवी होते. त्यांच्याबरोबर मी साहित्य अकादमीच्या एका बृहत्- प्रकल्पामध्येही सहभागी झालो. ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या असमीया कादंबरीकार इंदिरा गोस्वामी यांच्याशी माझी निकटची मैत्री झाली. त्यांच्याबरोबर मी दोन वेळा आसामचा दौरा केला. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणारे तमिळ कादंबरीकार 'इंदिरा' पार्थसारथी हेदेखील माझे असेच मित्र बनले. विभागातील तरुण प्राध्यापकांपैकी कन्नडचे टी. एस. सत्यनाथ आणि सिंधीचे रवी टेकचंदानी या दोघांनी माझ्या मार्गदर्शनाखाली आमच्याच विभागात 'तौलनिक साहित्य' विषयामध्ये पीएच. डी केले. मल्याळममधील कवी डॉ. अनुजन हेही विभागातले एक जवळचे सहकारी याखेरीज हिंदी विभागातले प्राध्यापक ओमप्रकाश, संस्कृत विभागाचे प्राध्यापक रमेश भारद्वाज, इंग्लिश विभागाचे प्राध्यापक हरीश त्रिवेदी, भाषाशास्त्राचे प्राध्यापक अंजनी कुमार सिन्हा या सगळ्या प्राध्यापकमित्रांची आठवण आज तीव्रतेने येते आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये मी छान रमलो होतो. कर्तृत्त्वाची नवीनवी क्षितिजे मला दिल्ली विद्यापीठाने उपलब्ध करून दिली. आता मागे वळून सिंहावलोकन करताना स्थळकाळाची अंतरे विरघळून जातात. दिल्ली विद्यापीठातील तीस वर्षे मनात पुन्हा जागी होतात. दिल्ली विद्यापीठातून निवृत्त होऊन दहा वर्षे झाली, तरी तिथले सारे अनुभव अगदी ताजे आहेत. एका वेगळ्या दुनियेत आयुष्याची तीस वर्षे अगदी वेगळ्याच कैफात व्यतीत झाली होती! (दिवाळी २०१८)