पान:निवडक अंतर्नाद.pdf/४१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही त्याच्यापर्यंतसुद्धा मी गाते, त्या काव्याचा अर्थ पोहोचावा असा माझा प्रयत्न असतो. इथं माझे स्वर माझ्या मदतीला येतात. लहानपणापासून मी बुजुर्ग आणि गुणी अशा गुरुजनांकडे रागाची तालीम घेतली. स्वरातून भाव कसा व्यक्त करायचा याची फार चांगली तालीम मला माझ्या उस्तादांनी दिली," असं म्हणून त्या आपल्या गुरुजनांविषयी आत्मीयतेने बोलू लागल्या. पतियाला घराण्याचे अताम महंमदखां आणि किराणा घराण्याचे अब्दुल वहीदखां या आपल्या उस्तादांविषयी बोलत असताना अनेक वेळा त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. "सुरांचा असर! गाणाऱ्याच्या सुरांचा ऐकणाऱ्यावर काय परिणाम होतो त्याला महत्त्व आहे. तुमची विद्वत्ता, पांडित्य झूट आहे. तुमचे गाण्याचे भाव तुम्ही कसे पोहोचवता हेच महत्त्वाचं' असं म्हणून त्यांनी एक पान तोंडात ठेवलं आणि पेटी वाजवत त्या गाऊ लागल्या. 'कोयलिया मत कर पुकार, कलेजवा लागे कटार...' त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोरून तो डाकबंगला, गाणाऱ्या अख्तरी बाई हे सारं विरून गेलं आणि डोळ्यासमोर आली गर्द आमराई आणि त्या आमराईत विरहवेदनेनं व्याकूळ झालेली विरहिणी! कोकिळेची विनवणी करणारी, कोकिळांच्या गंधित स्वरांनी विद्ध झालेली विरहिणी! अगं कोकिळे! नको घालूस अशी जीवघेणी साद! तुझे हे कोमल स्वर कट्यारी सारखे माझ्या काळजात घुसतात आणि माझ्या साजणाच्या विरहाची वेदना वाढवतात, कोकिळे! अग वैरिणी! नको करूस ही 'पुकार'! 'कोयलिया मत कर पुकार...' मी भानावर आलो तेव्हा बेगम हसत हसत सिगरेट पेटवीत होत्या. "क्या जनाब! ह्यल कैसे है आपके ?” त्या हसत विचारत होत्या. मी मान हलवीत त्यांना मला आलेला अनुभव सांगितला. "यही असली बात है। असर! सूरोंका असर! सूर लावताना सगळा प्राण गोळा करून लावायला पाहिजे. किती सूर लावता, काय चमत्कार करता, तुम्हाला किती राग येतात आणि कोणत्या तालात गाता याला काहीही महत्त्व नाही, महत्त्व आहे ते सूर कसा लावता याला एकच सूर लावा पण असा लावा की ऐकणाऱ्याच्या थेट काळजाचा वेध घ्यावा. शिकाऱ्याच्या बाणासारखा! उस्तादोंकी इनायत, गुरुची कृपा, म्हणूनच थोडं थोडं जमतं मला, " त्या थंड पाण्याचा घोट घेत म्हणाल्या, "थोडं का म्हणता ? पूर्णपणे जमलंय," मी म्हणालो, त्या हसल्या. मान हलवीत म्हणाल्या, "तुम अभी बच्चे हो! तुला अजून खूप ऐकायचं आहे. हे जग फार मोठं आहे. खूप गुणी लोकांनी भरलेलं आहे. कुणी प्रकाशात येतं, कोणी येत नाही. फार वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते, ऐन जवानीत होते तेव्हाची गोष्ट. कलकत्याला फिल्म कंपनीत काम करत होते. त्या वेळी मौजुद्दीनखां म्हणून एक गायक होते, जन्मभर ते फक्त भैरवीच गायले, " ४१६ निवडक अंतर्नाद "काय ! फक्त एकच राग ?” मी आश्चर्याने विचारलं. त्याचवेळी दरमहा पाच राग शिकून झटपट संगीतअलंकार होणाऱ्या अनेक तथाकथित कलाकारांची नावं डोळ्यासमोरून तरळून गेली. "हो. फक्त भैरवी! म्हणून ते मैफलीत असले की कोणी भैरवी गायचे नाही. मैफलीच्या शेवटी तेच गायचे. अशाच एका मैफलीत आम्ही जमलो होतो. सगळे गाणारे, वाजवणारेच होते. सगळेजण कसून गायले. सगळेच गुणी लोक. सर्वांनीच आपापलं गाणं रंगवलं. इतक्या प्रकारच्या गाण्यानंतर आता मौजुद्दीनखां कसं काय गाणं जमवणार असं मला वाटत होतं. शेवटी ते बसले. तंबोरा वाजत होता. मी त्यांना प्रथमच पाह्यत होते. अगदी बेढब आणि जवळजवळ कुरूपच होते ते. क्षणभर डोळे मिटून त्यांनी तंबोरा ऐकला आणि स्वर लावला, अहाहा! काय तो स्वर ! जणू तेजाची शलाकाच! नुसता सा लावला आणि सारी मैफल प्रकाशमय झाली. त्यांचा चेहरा पण उजळून निघाला, इतका वेळ कुरू वाटणारा माणूस एकदम देखणा वाटायला लागला. सगळी मैफल त्या पहिल्याच स्वरानं स्तब्ध झाली, भारून गेली आणि मग त्यांनी फक्त तीनच स्वर लावले. सारे गरे सारेसा, बेटा, तुला खरं सांगते. प्रत्येकाच्या डोळ्यांत खळकन् पाणी आलं. “मैफल संपल्यानंतर मी त्यांचे पाय धरून म्हणाले, 'तुम्ही तर तीनच स्वरात आम्हाला रडवलं.' तेव्हा ते हसून म्हणाले, 'जन्मभर मैफलीचा ध्यास घेतलाय. तेव्हा कुठे थोडसं जमतंय. अजून खूप करायचं आहे. तानसेन, बैजू बावरा यांनी गाण्यानं पाषाणाला पाझर फोडला. दिवे लावले. पाऊस पाडला, तिथं जायचं आहे मला बघू या परवरदिगार काय करतो.' असे लोक होते ते. सूरों के दीवाने !” अख्तरी बाई अंतर्मुख होत म्हणाल्या. त्या हकीकतीने मी भारावून गेलो होतो. "एक विचारू का?” मी भीत भीत म्हणालो. " हां हां पूछो, क्या बात है बोलो." त्या सिगरेट पेटवत म्हणाल्या. " हे थंड पाणी, सिगरेट यांचा गळ्यावर परिणाम होत नाही?" त्या हसल्या. आपण शरीराला जशी सवय लावू तसं ते वागतं. लहानपणापासूनच मी माझ्या गळ्याला थंड पाण्याची सवय लावली आहे. त्यामुळे काही त्रास होत नाही. फक्त एकाच गोष्टीचा त्रास होतो मला, " “ती कोणती?” "गायले नाही की त्रास होतो मला. सुरांशिवाय जगूच शकत नाही मी माझं पहिलं लग्न झालं तेव्हा आमच्या नवरोजीनं सांगितलं की गायचं नाही. घरी नाही. कुठंच गायचं नाही.” "बापरे! मग?" "मग काय? आठ पंधरा दिवस कसेबसे काढले. गाण्याशिवाय वेड लागण्याची पाळी आली माझं वजन तीस पौंडांनी उतरलं. मग मी निर्णय घेतला. " "कोणता? नवऱ्याचं मन वळवायचा?"