पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आतमध्येही कुठे काही आवाज झाला, उंदरांनी काही पाडलं तर त्या खोलीबाहेरच्या जागी येऊन तो काळजीचा स्वर असलेलं भुंकायचा. आईनं आतून येऊन खिडकी किलकिली करून त्याला 'डॉन, काही नाही आहे, शांत हो,' म्हटलं की आई सुरक्षित आहे, हे पाहून शांत व्हायचा. प्राण्यांना भाषा समजत नसेल पण 'टोन' वरून कदाचित भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतेच, याचे आम्हांला प्रत्येक कुत्र्याच्या बाबतीत अनेकदा अनुभव आलेत. एकदा मी नागपूरहून वणीला गेलो असताना मी व आईच घरी होतो. रात्री डॉन असाच भुंकायला लागला, म्हणून मलाही जाग आली. बाजूला पाहिलं तर आई नव्हती. काळजीने पटकन उठलो, बाहेर आलो, तर खिडकी किलकिली करून ती अत्यंत एकाग्रतेने बाहेरचा अदमास घेताना दिसली. काही चोरबीर असतील म्हणून मीही अगदी हळू पावलांनी तिच्या मागे जाऊन उभा राहून अंदाज घेऊ लागलो. बोलण्याचा आवाज येऊ नये म्हणून तिला हात लावून 'काय आहे?' असं विचारायला गेलो, तर ती एकदम दचकून मोठ्याने ओरडली. मग भीतीचा भर ओसरल्यावर आम्ही दोघंही खूप वेळ हसत राहिलो. डॉनचं आणि आईचं रात्रीच्या असुरक्षिततेचं असं हे एक वेगळंच भावनिक विश्व होतं. आम्ही सगळेच नागपूरला शिफ्ट झाल्यावर वणीच्या घराची कितीतरी वर्षं डॉनने एकट्यानेच राखण केली. त्यानंतर नागपूरला आणल्या आणल्या एकदा हा नजर चुकवून बाहेर पडला व कुठेतरी हरवला. एका रिक्षावाल्याने त्याला स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी हा त्याच्या डॉक्टरांमार्फतच पुन्हा सापडला. मागच्या वर्षी नवरात्रात टिपूचा शेवटचा आजार होता. त्याने खाणं-पिणं सोडलं होतं. निपचित पडलेला असे. जवळ जाऊन त्याच्या अंगावरून हात फिरवला की त्याच्या डोळ्यांत ओळखीचं हसू येत असे व क्षीणपणे तो शेपटी जमिनीवर आपटत असे. सलाईनच्या भरवशावरच त्याचं जगणं सुरू होतं. आई त्याच्या बाजूला बसून त्याच्या अंगावर हात फिरवत त्याला "टिपू, सणासुदीचे दिवस नीट निभावून घे हं बेटा" म्हणायची. जायच्या दोन दिवसच आधी डॉक्टरकडे नेण्याच्या निमित्ताने माझं त्याला गाडीतून फिरवून आणणंही झालं. गाडीत बसून फिरणं त्याच्या अत्यंत आवडीचं, त्या त्राण नसलेल्या अवस्थेतही त्याने दोन पाय खिडकीवर ठेवून नेहमीसारखं खिडकीबाहेर पाहत, शेवटचं फिरूनही घेतलं. त्याच्या चिमलेल्या चेहऱ्यावरचं हसू उदासवाणं दिसत होतं. आपलं हे शेवटचंच फिरणं, हे समजून तो जणू त्या दिवशी ते उपभोगून घेत होता. आईचं त्याने ऐकलंही. काही न खाता, पिता, पण तरीही चिकाटीने त्याने नवरात्र काढलं. दसऱ्याच्या दिवसही निभावला, त्या रात्री पहाटे तीन चार वाजता केव्हातरी तो गेला. आम्हांला सकाळीच कळलं. माणसाचा करावा तसा कपडा, फुलं, मिठानिशी त्याचा अंत्यसंस्कार मी करून आलो. आमचा एक फॅमिली मेंबर कमी झाला. या वर्षी डॉनही गेला. योगायोगाने तोही दसऱ्यानंतरच्या आठवड्यातच गेला. पण त्याचं जाणं अनपेक्षित होतं. तो अॅक्सिडेंटने गेला. अॅक्सिडेंटनंतर दोन-तीन दिवस जगला गाडीने उडवल्यामुळे त्याचं मागचं शरीर लुलं झालं होतं. त्याला उभंसुद्धा राहता येत नसे. त्या भागात अत्यंत वेदना होत होत्या, कळवळून तो ओरडत असे. खाली जवळ बसून डोकं मांडीवर घेऊन लोभ केला की कळवळणं थोडं शांत व्हायचं. डोळ्यांत तसंच प्रेम यायचं. पण चेहरा केविलवाणा होत असे. तो सतरा वर्षांचा झाला होता. माणसांच्या दृष्टीने बघायला गेलं तर डॉबरमनसाठी हे वय ऐंशी वर्षांचं ह्येतं. थोड्या दिवसांनी पाय ठीक होतील, पण हा जाणार नाही असंच मला वाटे पण बाबाच म्हणालेच होते, "आता याचं काही खरं नाही. " तिसऱ्या दिवशी डॉक्टरकडे न्यायला गाडीपाशी आणल्यावर तो तिथेच कोसळला. दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यांत जीव नव्हता. डॉक्टर म्हणाले, "वेदनेच्या स्ट्रेसमुळे याचं हार्ट बंद पडून हा गेला." एका क्षणात त्याला शांत मरण आलं. कुठलं आजारपण नाही, किंवा काही नाही. जितक्या ग्रेसफुली जगला, तितक्याच ग्रेसफुली तो गेला. शेवाळकर फॅमिलीचा आणखी एक मेंबर कमी झाला. अशा रीतीने टिपू शेवाळकर व डॉन शेवाळकर दोघेही एकाच वर्षात आम्हांला सोडून गेले. टिपूच्याच बाजूला, त्याच इतमामाने डॉनचाही आम्ही अंत्यसंस्कार केला. (फेब्रुवारी २००४) सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टहास सुवास पाकळ्या - पराग - देठ, फूल इतकीच देते ग्वाही... अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही... थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखूण सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून? मुखवयही असेल, असो... मागले काहीच नये दिसू साधे शब्द, पुरेत तेच, एक साधे सोपे हसू... शान्ता ज. शेळके निवडक अंतर्नाद ४१