पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जनमानसावर जो आघात झाला होता, तो त्यांना आठवत होता. (त्यावेळी ते चोवीस वर्षांचे होते.) अॅटनबरोंनी हे सारं स्पष्टपणे सांगून टाकलं, त्यावर कोठारींनी त्यांना थोडक्यात गांधीजी, त्यांचं कार्य आणि तत्त्वज्ञान याविषयी माहिती दिली. अशा ह्या प्रकल्पाची जबाबदारी अॅटनबरोंनीच स्वीकारायला हवी, ते पालुपद ते बोलताना मधूनच घोळवत होते. अॅटनबरोंना एका गोष्टीचा उलगडा होत नव्हता. या प्रकल्पामध्ये कोठारी आपल्यालाच का गुंतवू पाहताहेत? आपण तर एकाही चित्रपटाचं आजवर दिग्दर्शन केलेलं नाही. पास्कल, प्रेमिंजर, मायकेल पॉवेल आणि त्याहूनही विशेष म्हणजे साक्षात डेव्हिड लीन यांच्यासारख्या दिग्गजांनी याआधी 'गांधी' या विषयावरील चित्रपटाला हात घालण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्यापैकी कुणालाच पुढे जाता आलं नव्हतं. भोजनोत्तर कॉफी घेताना कोठारींनी विचारलं, "लुई फिशरनं लिहिलेलं गांधीजींचं चरित्र तुम्ही वाचून पाहाल का?" अॅटनबरो त्याच सुमारास सपत्नीक स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी प्रवासास निघण्याच्या गडबडीत होते. तरीही त्यांनी प्रवासात चरित्र वाचण्यासाठी वेळ काढण्याचा अवश्य प्रयत्न करू, असं कोठारींना आश्वासन दिलं. चरित्र वाचल्याशिवाय तो चित्रपट करण्याची आपल्यात क्षमता आहे की नाही, ते ठरवता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. गांधी- चरित्र वाचून अॅटनबरोंनी अस्ति-नास्ति जी काही ४२० निवडक अंतर्नाद प्रतिक्रिया असेल, ती कोठारींना दोन आठवड्यात कळवायची, असं ठरवून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. घराकडे परतताना अॅटनबरोंच्या मनात संमिश्र विचारांची एकच गर्दी उसळली होती. आजवर आपल्या कलाजीवनात जे काही येत गेलं, त्याहून हे काहीतरी वेगळं आहे, खास! हा काही सर्वसामान्य चित्रपट - विषय नाही. मघाशी कोठारींनी जी काही माहिती दिली, त्यावरून गांधीजी हे एक महाप्रचंड व्यक्तिमत्त्व असलं पाहिजे. लुई फिशरचं गांधी- चरित्र वाचल्यावर आपली प्रतिक्रिया काय होईल? आपल्याला ठाऊक असलेली जुजबी माहिती आणि कोठारींकडून ऐकलेल्या काही गोष्टी यापलीकडे सध्या तरी या विषयातली आपली पाटी तशी कोरीच आहे. मात्र चित्रपटाचा विषय महाप्रचंड असल्यानं चित्रपटाची निर्मितीही अर्थातच त्याच महाप्रचंड प्रमाणावर होणं आवश्यकच नव्हे तर अटळही आहे. त्यासाठी उभारायला लागणारं भांडवलही तसंच छाती दडपून टाकणारं असेल. गांधीजींचा जीवनपट फार मोठ्या कालावधीचा आहे. चित्रपटाच्या वाजवी लांबीत तो सामावला जाईल, असं स्क्रिप्ट तयार करणं शक्य होईल का? गांधीजींच्या आयुष्यात आलेल्या अनेकानेक व्यक्तीपैकी वेचकच जरी घ्यायच्या म्हटलं, तरी त्यांचीही संख्या मोठीच असणार, म्हणजे चित्रपटाचं कास्टिंग (पात्रयोजना) ही एक मोठीच डोकेदुखी ठरणार!