पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संबंध नाही! असला गलथानपणा क्रीडाक्षेत्रात जागोजाग आढळतो. अगदी संघटनेचे पदाधिकारीसुद्धा साऱ्या गोष्टींत अनभिज्ञ असतात. अंजली भागवतने जागतिक चषक स्पर्धांत सुवर्णपदक जिंकले. जगातल्या साऱ्या पुरुष आणि स्त्री स्पर्धकांना हरवून तिने जर्मनीत चँपियन्स ऑफ चँपियन हा विश्वातला सर्वोच्च किताब पटकावला. ऑलिंपिकच्या सरावासाठी तिला रायफलच्या गोळ्या हव्या होत्या, त्यासाठी ती दिल्लीला संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटली, तेव्हा त्यांना ती कोण आहे, हे माहीत नव्हते, ती शूटिंगबद्दल बोलायला लागली तेव्हा त्यांना ती व्हिडिओ शूटिंगबद्दल बोलते आहे असे वाटले! सर्वात कडी म्हणजे ऑलिंपिक स्पर्धेत भाग घ्यायला जाताना राष्ट्रीय रायफल संघटनेच्या अध्यक्षांना ती भेटायला गेली. तेव्हा त्यांनी तिला विचारले, "तू पिस्तोल नेमबाजी करतेस का रायफल ?" हाच प्रश्न अभिनव बिंद्रालाही विचारला! त्यावेळी अभिनवने रायफल शूटिंगचे जागतिक अजिंक्यपद जिंकलेले होते! आपल्या सर्वोत्तम खेळाडूंबद्दल ही अनास्था आहे, तर सर्वसामान्य खेळाडूंना कोण विचारणार? आणि नेमबाजीच्या खेळावर तर आयातीच्या नियमांचा फास गच्च आवळलेला आहे. एकदा मी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना सांगितले होते, "आम्ही आंतरराष्ट्रीय अजिंक्यवीर घडवण्याच्या प्रयत्नात आहोत. आमचे पैसे खर्चून तांत्रिकदृष्ट्या उत्तम साधनं मिळवायला आम्हांला चार चार वर्षं खेटे घालावे लागतात. मी जर आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना किंवा गुन्हेगारी टोळ्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्योगात असतो, तर हवी असलेली शस्त्रं आणि दारुगोळा मला एका आठवड्यात घरपोच मिळाला असता! असली कसली यंत्रणा आहे आपली ?" ते हसले. माझ्याकडून साऱ्या गोष्टी नीट समजावून घेऊन मगच दिल्लीला परतले. १५ दिवसांनी आम्ही दिल्लीत भेटायचे ठरले. पण त्या पंधरवड्यात दिल्लीचे सरकारच कोसळले! असा अनुभव मला अनेकदा आलेला आहे राजकारणी आणि नोकरशहांना साऱ्या गोष्टी समजावून सांगितल्या की त्यांची खातीच बदलतात. नव्या आलेल्यांना हे काही करण्यात रसच नसतो. पण केंद्र शासनाने, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने आणि राष्ट्रीय रायफल संघटनेने गेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या वेळी मला एक मोठा आश्चर्याचा धक्काच दिला. चक्क दिल्लीहून क्रीडाखात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माझ्याशी फोनवरून संपर्क साधला आणि भारताच्या नेमबाजीच्या संघाच्या मानसिक सरावाची जबाबदारी मी घेऊ शकेन का असे विचारले. ज्या मंडळींना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असे वाटतच नाही, त्यांनी मानसिक सरावाचा विचार करावा हे नवलच! पण नेमबाजी आणि मानसिक सराव हे दोन्ही माझ्यासाठी भयंकर आकर्षणाचे मुद्दे. तेव्हा मी नाही म्हणणे शक्यच नव्हते. पण मी साधारणपणे एका सत्रासाठी घेतो तेवढे मानधन महिन्याभरासाठी देऊ, असे मला सांगण्यात आले. माझी इतर कामे पुष्कळ होती, तेव्हा मला संपूर्ण वेळेसाठी न नेमता मी जेवढी सत्रे घेऊ शकेन, तेवढ्याचेच मानधन मला द्यावे म्हणजे शासनाचे आणखी पैसे वाचतील, असे मी सुचवले. (अर्थात हे कमी पैसे आणि माझे खर्च झालेले पैसे अजूनही मला दिले गेलेले नाहीत, हा मुद्दा वेगळा!) शिबिर पुण्याला चालू झालेले होते. नेमबाजांना मी येणार हे कळल्याने त्यातल्या काही जणांचे मला फोन यायला लागले. नेमणुकीचे पत्र राष्ट्रीय रायफल संघटनेकडून यायचे होते. म्हणून मी दिल्लीला त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा मला सांगण्यात आले, की मी पुण्याला जाऊन काम सुरू करावे, पत्र नंतर पाठवण्यात येईल. तेव्हा मी डिसेंबर २००९ मध्ये पुण्याच्या शिबिराला गेलो. त्यात मी इतका गुंतत गेलो, की बाकीची जवळजवळ सर्व कामे बंद करून मी जास्तीत जास्त वेळ नेमबाजांना दिला. त्यात मला भरपूर ताण पडला, पण अतिशय आनंद मिळाला. शिबिरे चार वेगवेगळ्या रेंजेसवर होत. त्यातून पुण्याला ट्रॅप अँड स्कीटची रेंज बंद असल्यामुळे त्यांची शिबिरे त्याच कालावधीत कधी दिल्लीला तर कधी पतियाळाला होत. त्यामुळे मी काही दिवस पुण्याला तर काही दिवस दिल्ली किं पतियाळाला जाई. सुरुवातीला जवळजवळ शंभर नेमबाज शिबिरांना येत. चाचणी स्पर्धा असतील तेव्हा त्यात ५०/६० जणांची भर पडे. त्यातल्या बहुसंख्यांना मानसिक सराव ही काय भानगड आहे, हेही ठाऊक नव्हते. बहुतेक सारा वेळ नेमबाजीच्या सरावालाच दिला जाई. संध्याकाळी दीड एक तास इतर व्यायामासाठी दिला जाई. त्यानंतर अर्धा तास जेमतेम मला मिळे. तोपर्यंत सारे जण इतके दमलेले असत, की अनेक जण गाढ झोपी जात, मानसिक सरावाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुष्कळ वेळा मी एकत्र सत्रे घेत असे. ती सकाळी अर्धा तास होत. मग दिवसभर मी या ना त्या रेंजवर असे. नेमबाजांना जशी सवड होई, तसे ते मला वैयक्तिक सत्रांसाठी भेटत. कधीकधी तर रात्री दीड वाजेपर्यंत या चर्चा चालू राहत. हॉकी, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स, जलतरण या खेळांची शिबिरेही बालेवाडीत झाली. त्यांतले बरेच खेळाडू माझ्याकडे प्रशिक्षण घेतलेले होते, त्यांच्या प्रशिक्षकांशीही परिचय झाला. त्यांनी आग्रह केल्यावरून मी त्यांचीही सत्रे घेतली. माझी पुस्तके वाचून त्यांतल्या तंत्रांवरही चर्चा करून मला आपापल्या देशात येऊन व्याख्याने देण्यासाठी निमंत्रणे दिली. यात पाकिस्तानचाही समावेश होता. ते १५ दिवस फार आनंदात गेले. पण या आनंदाला विषादाची झालर होती. झालेला आणि होत असलेला अनाठायी खर्च सारखा बोचत होता. संयोजकांवर रोज नवे आरोप वृत्तपत्रांतून होत होते. संयोजन अगदीच टुकार होते. पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना कित्येक तास समारंभासाठी खोळंबून राहावे लागे. त्यांचे सामने नंतर असले, तर त्यांना फारच त्रास होई, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण नीट झालेले नव्हते. कोणीच काही माहिती देऊ शकत नसे. उद्घाटन आणि समारोपाचे सोहळे भपकेबाज करून आम्ही किती सुधारलेले आहोत, त्याचे प्रत्यंतर देण्याचा केविलवाणा निवडक अंतर्नाद ४३९