पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रयत्न झाला. खेळाडूंनी या राष्ट्रकूल स्पर्धांत ३८ वेळा आपले राष्ट्रगीत वाजवायला लावून आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय आणून दिला खरा, पण स्पर्धा संपल्याबरोबर त्यांचे हाल सुरू झाले. खेलग्राममध्ये पाश्चात्त्य खेळाडूंसाठी उत्तम भोजन असे, पण भारतीय भोजन अत्यंत भिकार होते. एक दिवस रात्री १० वाजता आमच्या खोलीवर निरोप आला. सर्व भारतीय खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा एकत्रित फोटो घ्यायचा आहे; सकाळी ६ ॥ वाजता करमणूक केंद्रावर सर्वांनी एकत्र जमावे मी आणि माझे एक सहकारी वेळेवर तेथे गेलो, पण इतर कोणीच आलेले नव्हते. नंतर भारतीय पथकाचे प्रमुख तेथे आले आणि खेळाडू का आलेले नाहीत, याबद्दल आम्हांलाच जाब विचारायला लागले. शेवटी फोटो वगैरे बाजूलाच राहिले आणि आम्हांला नाश्ता न घेताच रेंजची बस गाठावी लागली. अशी अव्यवस्था सगळीकडेच होती. उत्तम स्पर्धा चाललेल्या असताना त्या पाहण्याची संधी खेळाडूंनाच मिळाली नाही. सुरक्षेच्या नावाखाली जवळजवळ सारी प्रेक्षागृहे रिकामीच असत. मग ती इतका प्रचंड खर्च करून बांधली कशाकरता? जवळजवळ साऱ्याच स्टेडियम्सचे बांधकाम स्पर्धा सुरू होईपर्यंत पूर्ण झालेले नव्हते. वास्तविक ते दोन वर्षे आधीच पूर्ण करून एकदा तरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तेथे व्हायला हव्या होत्या. नोव्हेंबर २०१० मध्ये चीनने वॉन्गझौ येथे आशियाड भरवले. तेव्हा ऑगस्ट २०१० मध्ये सारी स्टेडियम्स पूर्ण करून संयोजन समितीच्या हवाली करण्यात आलेली होती. चिनी खेळाडूंना घरच्या साऱ्या मैदानांवर सराव करता आला आणि त्यांनी आशियाडमध्ये २०० सुवर्णपदके जिंकली ! आपल्या वाट्याला फक्त १४ आली! कारण राष्ट्रकुल स्पर्धांनंतर खेळाडूंवरचे लक्षच काढून घेतले गेले. नेमबाजीचा संघ पुण्याच्या शिबिराकरिता गौरव समारंभामुळे वेळेवर पोहोचू शकला नाही. मला माझी नेमणूक फक्त राष्ट्रकुल स्पर्धा होईपर्यंतच आहे, असे सांगण्यात आले. सारे खेळाडू गोळा होईपर्यंत नोव्हेंबरची एक तारीख उजाडली. त्यांच्या सरावासाठी गोळ्याच नव्हत्या. दिल्लीहून घाईगडबडीत पाठवलेल्या गोळ्या इतक्या निकृष्ट दर्जाच्या होत्या, की त्या नवोदितांनाही वापरायला द्याव्यात की नाही असा प्रश्न पडावा. मग चारपाच दिवसांतच शिबिर आटोपते घेऊन नेमबाजांना दिल्लीला नेण्यात आले आणि तेथे दोन-तीन दिवस नुसतेच घालवल्यावर चीनला नेले, बलाढ्य चीन, कोरिया आणि जपानच्या संघांशी टक्कर देण्याची तयारी इतक्या हलगर्जीपणाने केल्यावर व्हायचे तेच झाले. नेमबाजीच्या संघाची पार वाट लागली. अडीचशे कोटी रुपये खर्चून बांधलेल्या आणि अद्ययावत संगणकीय सामग्री बसवलेल्या कर्णीसिंह रेंजेस राष्ट्रकुल स्पर्धा संपल्याच्या दुसऱ्या दिवसापासून बंद झाल्या. फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपदाच्या स्पर्धा तेथे घेण्यात आल्या, त्या दिवसापर्यंत तिथली साधी सफाईसुद्धा कोणी केलेली नव्हती, अगदी संडास - मुताऱ्यांची सुद्धा. निम्म्याच्यावर संगणकीय यंत्रणा नादुरुस्त झालेली होती. ती वापरायची नव्हती, तर विकत घेतली कशाला ? ४४० • निवडक अंतर्नाद खेळांकडे अक्षम्य दुर्लक्ष करून आपण आपल्या पुढल्या पिढ्यांचा घात करीत आहोत. स्पर्धा म्हणजे काय, याचे नीट आकलन न झाल्याने अनेक हुशार माणसे पूर्णपणे वाया गेलेली मी पाहिली आहेत. स्पर्धा ही शत्रूशी कधीच नसते, ती नेहमी भावंडांशी आणि आपल्या सहका-यांशी, नातेवाइकांशीच असते. उत्तम आणि श्रेष्ठ काय ते निवडायला दुसरा मार्गच नाही, पण चुरशीची स्पर्धा असतानाच मैत्र आणि नाती ही प्रेमाने, संघभावनेने मजबूत करायची असतात. द्वेष, मत्सर, शत्रुत्व या उपटसुंभ भावनांना मूठमाती द्यायची असते. म्हणजे मग आयुष्य खऱ्या अर्थाने संपन्न होत असते. हे सारेच स्पर्धात्मक खेळांतून शिकता येते. शालेय शिक्षणात खेळ आणि कला यांची आवड असणाऱ्यांना त्यातच करिअर करता यावी. खेळ हा विषयच १० वी, १२ वी पर्यंत परीक्षेसाठी ऐच्छिक असावा, राज्य अजिंक्यपद, राष्ट्रीय अजिंक्यपद किंवा आंतरराष्ट्रीय पदक मिळाल्यास त्याला पदवी देण्याची व्यवस्था व्हावी. खेळ या विषयातही पदवी घेता यावी आणि पुढे त्यात संशोधनही करता यावे. योगशास्त्र ही भारतीयांची जगाला मोठीच देणगी आहे योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे व्यायाम प्रकार शाळा - कॉलेजातून शिकणे आवश्यक करायला हवे. योगशास्त्र हे आपले मानसशास्त्र आहे. त्याचा वापर गेली कित्येक वर्षे खेळाडूंच्या मानसिक तयारीसाठी मी करीत आहे आणि त्याचा त्यांना अतिशय उत्तम उपयोग होत आहे. इतरही सर्व क्षेत्रांत हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. याचा पाया शालेय जीवनातच घातला गेला, तर स्पर्धात्मक खेळात येणारे दडपण हाताळणे सोपे जाऊन त्यांना उत्कृष्ट कामगिरी तर करता येईलच, पण जीवनातल्या इतर धकाधकीच्या प्रसंगांनाही उत्तम तोंड देता येईल. फुटबॉल, अॅथलेटिक्स, भारतीय खेळ यांचा सर्वाधिक प्रचार व्हायला हवा. हे सर्व अतिशय कमी खर्चाचे खेळ आहेत. विनाकारण स्टेडियम आणि हॉल बांधत न बसता क्रीडांगणे तयार करण्यावर शासनाने भर द्यावा. आतापर्यंत जेवढी बांधकामे सुरू झाली असतील, तेवढीच पूर्ण करून ती जास्तीत जास्त वापरली जातील असे पाहावे, खासगी संस्थांकडेही जी क्रीडांगणे आणि सोयीसुविधा असतील, त्याही सर्वाधिक वापरल्या जातील असे पाहावे आणि शाळांना या सोयी उपलब्ध करून द्याव्या. पुण्याला बालेवाडीमध्ये बांधलेले क्रीडासंकुल हे फक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठीच वापरले जावे. तेथे क्रीडा विद्यापीठ, प्रशिक्षकांचे खास वर्ग चालवले जावेत, देखभाल दुरुस्तीचा खर्च शासनाने संपूर्णत: करावा. व्यापारी तत्त्वावर क्रीडासंकुल भाड्याने देण्याचे ताबडतोब बंद करायला हवे. जनतेनेही संघटित होऊन, माहिती अधिकाराचा वापर करून शासनावर दडपण आणावे आणि क्रीडाक्षेत्राचा योग्य विकास करायला शासनाला आणि क्रीडा संघटनांना भाग पाडावे. तुमच्या मुला-नातवंडांचे आयुष्य जास्त चांगले जावे असे वाटत असेल, तर हे करायलाच हवे. (ऑगस्ट २०११)