पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तनखा बंद झाला आहे असं ऐकिवात आहे आज राज्य आणि केंद्र एकमेकांवर ह्य खर्च ढकलत आहेत, त्यामुळे येणाऱ्या दिवसांत त्याची देखभाल कुणी करायची, हा मोठाच वादाचा विषय ठरणार हे नक्की! ड्रायव्हर हा पदोन्नती घेत घेत ड्रायव्हर बनतो. सहायक लोको पायलट अशी रेल्वेत सुरुवातीची भरती होते. मग परीक्षा / अनुभव / निरंतर प्रशिक्षण आणि शारीरिक प्रशिक्षण अंमळ कठीणच असतं, दर चार वर्षांनी आमची मेडिकल होते. यात थुंकीपासून लघवीपर्यंत सारंच तपासलं जातं. सुरुवातीची दोन मेडिकल, म्हणजे जवळ जवळ आठ वर्षं, चष्मा चालत नाही. रंगांधळेपणा तर कुठल्याही वयात खपवून घेतला जात नाही. सायको टेस्ट सुरुवातीला घेतली जातेच, पण जेव्हा आम्ही १०० कि. मी. पेक्षा जास्त वेगाने गाडी चालविण्यासाठी निवडलो जातो, त्याच्या अगोदर परत एकदा सायको टेस्ट घेतली जाते - ज्याला हाय- स्पीड सायको टेस्ट म्हणतात, ती पास झालो, तरच १२० कि.मी. वेगाची गाडी चालवायला दिली जाते. भारतीय रेल्वेचा अधिकतम वेग १२० कि.मी. आहे गाडीचा वेग हा सर्वस्वी इंजिनाच्या मागे लावलेल्या डब्यांवर अवलंबून असतो. इंजिन स्वतः अधिकतम १६० कि.मी. पर्यंत चालू शकतं. आता भारतात सगळीकडे या वेगाने गाड्या चालतात असं नाही. मुंबई - दिल्ली वेस्टर्न रेल्वेवर १२० कि. मी. ने गाडी चालते, पण मध्य रेल्वेत घाट असल्यामुळे ते शक्य नाही. म्हणजे वेगासाठी डब्यांबरोबर भौगोलिक परिस्थितीदेखील महत्त्वाची असते. भारतात तीन गेजवर गाड्या चालतात - नॅरो गेज, मीटर गेज आणि ब्रॉड गेज, नॅरो गेज म्हणजे माथेरानची गाडी. मीटर गेज म्हणजे अहमदाबाद- उदयपूर एक गाडी चालते. नॅरी आणि मीटर गेजमध्ये इलेक्ट्रिफिकेशन शक्य नाही. त्या गाड्यांसाठी वेगळी, छोटी, फक्त डिझेलवर चालणारी इंजिनं असतात. याच मार्गाचं नंतर नूतनीकरण होऊन त्याचं रूपांतर ब्रॉड गेजमधे करतात. हे रूपांतर तिथल्या विकासावर सर्वस्वी अवलंबून असतं, मग सिंगल लाइन / डबल लाइन / फोर लाइन अशा चढत्या भाजणीने रेल्वे धावते. तुमचा पुणे-सोलापूर आता आतापर्यंत सिंगल लाइन होता. आमच्याकडे उधना- नंदुरबार असा एक मार्ग मध्य रेल्वेशी हितगुज करायला जातो. तो अजूनही सिंगल लाइन आहे. मुंबई ते पुणे डबल लाइन आहे. वाचकांच्या पटकन लक्षात यावं म्हणून मी अशी उदाहरणं देत आहे. पश्चिम रेल्वेत आमच्याकडे चर्चगेट- मुंबई सेंट्रल चार लाइन, मुंबई सेंट्रल अंधेरी, बांद्रा पाच लाइन, बांद्रा बोरीवली सात लाइन नंतर परत बोरिवली विरार चौपदरी अशा वाढत्या नेटवर्कमध्ये काम करणं सोपं नाही. एका प्रख्यात सर्जनचं असं म्हणणं होतं, की जेव्हा एखादा सर्जन ऑपरेशन करत असतो, तेव्हा मेंदूपासून पायातल्या बोटापर्यंत त्याचा प्रत्येक अवयव कामात असतो. त्याचप्रमाणे आम्हां ड्रायव्हर लोकांचंदेखील असतं. गाडी चालवताना मेंदूपासून पायाच्या बोटापर्यंत आमचे सगळेच अवयव कामात असतात, इतका तणाव झेलण्यासाठी कणखरपणा खूपच आवश्यक असतो. तो कैक वर्षांच्या सरावाने अंगात मुरत जातो. एकाच जागेवर सात-आठ तास बसून गाडी चालवणं खरंच खूप आव्हानात्मक असतं. ४४६ निवडक अंतर्नाद काही गाड्या सतत धावत असतात. एका निर्धारित गतीने धावताना समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला प्रतिसाद देत पुढे सरकावं लागतं. हाय स्पीड सायको घेण्याचा उद्देशदेखील हाच असतो, की तुम्ही चटकन निर्णय घेता की नाही हे तपासणं, चटकन निर्णय घेण्याची सवय इतकी अंगात मुरत जाते, की घरातल्यांनाही त्याचा त्रास होतो. खूपदा एखाद्या विषयावर घरातले सगळे मिळून चर्चा करत असतात, पण कुठल्याही ठाम निर्णयाअगोदर त्या सर्वांना माझ्याशी बोलायचं असतं. मग मी ज्यावेळी उपलब्ध असतो, त्यावेळी अशा एखाद्या समस्येची चर्चा सुरू होते. मी त्यावर चटकन निर्णय देऊन मोकळाही होतो. घरच्यांना मात्र मला त्या समस्येचं गांभीर्यच नाही असं वाटतं, पण प्रत्यक्षात इतका वेळ दवडणं मला पटतच नाही. मग उगाच घरच्यांचे गैरसमज वाढत राहतात. भोवताली रेल्वेचे रूळ आणि दगड असल्यामुळे ड्रायव्हर रुक्षच असतात असाच साधारण समज आहे. यात एकटेपणा हा त्यांच्या नशिबाने त्याला बहाल केलेला एक दुखरा सल आहे निसर्गाच्या विरुद्ध वेळेत सतत घरापासून दूर राहणारा ड्रायव्हर माणसांत फार कमी रमतो, कारण भोवतालच्या लोकांच्या वेळेत तो घरात असतच नाही. दिवाळी, दसरा, कुठला सण, काळ, वेळ या कुठल्याच गणितात नसणारी अशी त्याची कामाची वेळ असते. पुलंचा पोस्टमन आग विझवायला आलेल्या गाडीच्या शिडीवरून वरच्या मजल्यावर पत्र टाकून स्वतःचा निष्कामपणा सिद्ध करत असतो, त्याचप्रमाणे आम्ही निष्कामपणे भोवतालच्या कुठल्याही मोहात गुंतून न पडता सतत धावत असतो. मेल गाड्या साधारणपणे रात्रीच चालतात. त्यामुळे जेव्हा हा घरी असतो, तेव्हा सारं जग वेगळ्या दुनियेत असतं आणि हा मात्र मोठ्या कष्टाने स्वतःची झोप पूर्ण करत असतो. परत संसारातल्या मूलभूत जबाबदा-या पार पाडताना थोडासा अवघडलेपणा नकळत याच्या वागण्यात येत जातो. हा ज्या लोकांमध्ये असतो, त्यांची दुनियाच वेगळी असते. खूपदा एकाकीपणा घेरून येतो, आपल्याला इतरांनी वाळीत टाकल्यासारखंदेखील वाटतं. अस्तु ! भारतात रेल्वेचं जितकं लोकांना आकर्षण आहे तितकं जगात कुणालाच नसेल, माझी नोकरी भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्या काठाने वाढली. म्हणजे मुंबई- गुजरात हा पट्टा तसा समुद्राच्या जवळचा समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या मी रोजच्या रोज पार करतो. त्यांच्या दर्शनाने धन्य होतो. यांतल्या काही नद्या बारमाही असल्यामुळे मुबलक पाणी पार उन्हाळ्यातही यांतून वाहत असते. त्यामुळे नकळत भोवतालचा हिरवेपणा ऋतुमानानुसार कमी जास्त होतो इतकंच, पण अगदी रखरखीतपणा मात्र नसतो, रेल्वेचा ट्रॅक हा भर वस्तीतून कधीच जात नाही, पण ट्रॅक आल्यावर मात्र त्याच्या भोवताली वस्ती इतकी गच्च होते, की ट्रॅक अगोदर की वस्ती यांच्या झगड्याला उगाचच सुरुवात होते. सतत काहीतरी घडणारी नोकरी मी करतोय. प्रत्येक क्षण महत्त्वाचा / मोलाचा, सतत सतर्क / सावध कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं आव्हान निराळं, त्याला सामोरी जाणारी आपली वृत्ती, नजर रोज निराळी. कालचे फंडे आज नाहीत, आजचे उद्या नाही. सतत नवे पवित्रे, रोज काहीतरी वेगळे.