पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वपुंनी एके ठिकाणी म्हटलं होतं, की जो सातत्याने फिरतो, तो सर्वांत शहाणा असतो. या विभागात त्यांनी टीसीचा एक वेगळाच अनुभव सांगितला होता. एकदा पुण्याच्या गाडीत कल्याणहून काही मुलांचा ग्रुप चढला. सुट्टीचा मूड, धमाल चाललेली. एकमेकांची फिरकी घेणं / चिडवणं असं सर्व चाललं होतं. तब्बल २० ते २५ जणांचा ग्रुप होता. पण या सगळ्या गदारोळातदेखील एक मुलगा मात्र खिडकीत बसून हातातल्या पुस्तकात गढून गेला होता. त्याला या सगळ्या भोवताली घडणाऱ्या घटनांशी जसं काहीच देणं-घेणं नव्हतं, इतक्यात लोणावळ्याला एक मुलींचा ग्रुप चढला. सुंदर तरुणींना बघून या सर्वांना जरा अधिकच चेव आला. मग त्यांची मस्ती / आवाज जरा अधिकच वाढले. पण खिडकीतल्या मुलाने मात्र एकदा त्यांच्याकडे बघितलं व तो परत पुस्तकात गढून गेला. इतक्यात गाडीतला टीसी, जो दुरून हे सारं बघत होता तो, तिकीट तपासत या ग्रुपजवळ पोचला. सर्वांनी रिझव्र्हेंशन दाखवलं. इंजिनिअरिंग कॉलेजचा ग्रुप पावसाळ्याच्या धमाल पिकनिकला निघालेला होता. टीसी, त्यातला जो कोणी एक लिडर होता त्याला म्हणाला, की 'तुमच्यात एकच मुलगा मात्र वेगळा आहे जो या रिझर्व्हेशनच्या यादीत नाही. म्हणजे ऐनवेळी जो मुलगा येणार होता त्याच्याऐवजी दुसराच कोणीतरी तुम्ही आणला आहे. सर्वांनी टाळायळ करायला सुरुवात केली. टीसी म्हणाला, 'बघा! मी तुम्हाला चार्ज नाही करत, फक्त मी तुमचा खोटेपणा ओळखला, याचा मला आनंद मिळू द्या.' शेवटी तो तथाकथित लीडर शरण आला, म्हणाला, 'आम्ही सारे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहोत, पण खिडकीतला मुलगा आमच्याबरोबरचा नाही.' टीसी म्हणाला, 'थांबा, मी सांगतो की तो नक्की मेडिकलचा विद्यार्थी असणार.' आता माझ्यापासून सारेच चकित. याने कसं बरं ओळखलं? मलाच राहवलं नाही. मी म्हणालो, 'तुम्ही कसं ओळखलंत?' तो म्हणाला, 'हा वर्षानुवर्षाचा आमचा अनुभव आहे. एकतर त्या मुलाचे हात स्वच्छ आहेत. डॉक्टर लोकांना सतत हात धुवायची सवय असते. दुसरं, लोणावळ्याला मुली गाडीत चढल्यावर तुम्ही सारे चेकाळलात, पण तो मात्र शांत होता; कारण मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मुलींचं एवढं आकर्षण असत नाही, त्यांच्या बरोबरीने भरपूर मुली शिकत असतात. पण इंजिनिअरिंगवाल्यांना मात्र मुलींचं जरासं स्टाव्हेंशनच असतं.' तर 'घुमता साधू आणि बहता पानी कधीही धीरगंभीर आणि अनुभवांनी समृद्ध असतात.' यात आम्हां इंजिन ड्रायव्हरचादेखील समावेश करायला हरकत नाही. तर आमच्या ड्रायव्हर लोकांचेदेखील वेगवेगळे समज / गैरसमज असतात. फार पूर्वी आमच्या विभागात खूप कष्टाचे काम असल्यामुळे निरक्षरता होती. कारण कोळशाचं इंजिन चालवणं खरंच कष्टाचं काम होतं. सतत गरम धगीजवळ राहून लघवीदेखील बंद व्हायची. सतत कोळशाचा काळेपणा, धूर, एकटेपणा आणि भरपूर निरक्षरता यामुळे सहजच ड्रायव्हर व्यसनांच्या अधीन व्हायचे. स्वतःला रमवण्यासाठी जिथे जातील तेथे घरोबा करणं, दारू, सिगरेट, भांग आणि बऱ्याच गोष्टींचं व्यसन आपसूकच लागायचं. त्या काळात खेड्यांमधून काही बायका अशा निरक्षरांना अक्षरश: पिळून घ्यायच्या. त्यांचा पगार घरी कमी आणि या बायकांच्या पदरात जास्त जायचा. घरचे उपाशी, त्याच वेळी बाहेरचे मात्र तुपाशी, असा साधारण एक काळ होता. पण हळूहळू काळ बदलला. रेल्वेने कात टाकायला सुरुवात केली. तिचा पसारा वाढत असतानाच कमी श्रमाची डिझेल / इलेक्ट्रिक इंजिनं आली. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक होतं. साधारण १९८० नंतर प्रशिक्षितांची पलटण रेल्वेत यायला सुरुवात झाली. तोपर्यंत कुणीही ड्रायव्हर बनू शकायचा, ज्याला कुठेच नोकरी नसायची, त्याला रेल्वेत ड्रायव्हरची नोकरी चटकन मिळायची. त्याचमुळे सुरुवातीला यात मुस्लिम खूप होते. मग कष्टकरी यूपी / बिहारी आले. अजूनही मराठी माणसं तशी कमीच आहेत. त्यातही आमच्यासारखे ब्राह्मण तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच! अनेक जाती, प्रजाती / धर्माचे लोक आम्ही एकमेकांच्या सतत संपर्कात येत असतो. एखादा ड्रायव्हर इंजिनमध्ये आपल्या श्रद्धेचे फोटो लावतो / उदबत्ती पेटवतो, मग रस्त्यात दिसणाऱ्या देवीला, दर्ग्याला, मंदिराला रात्रीच्या अंधारात दोन फुटाच्या ट्रॅकवर समोर दिसणाऱ्या सिग्नलना प्रतिसाद देत भरधाव वेगाने गाडी धावत असते. आमच्या पाठीमागच्या २१-२४ डब्यांमध्ये प्रवासी आमच्यावर निर्धास्तपणे विसावून झोपलेले असतात. एका रिदमवर छानपैकी झोपेत मग्न झालेले असतात. (गाडीच्या रिदमने अनेक गीतांना / तालांना जन्म दिलेला आहे) त्यामुळे आम्ही जरासे अधिकच सावध असतो. ट्रेनिंगच्या काळात आम्हांला हे सतत शिकवलेलं असतं, की मागच्या डब्यांमध्ये तुमचे आई-वडील बसलेले आहेत असं समजा जर काही चूक केली, तर जे काही वाईट व्हायचं आहे, ते सर्वप्रथम त्यांच्या बाबतीत होईल, तेव्हा या ठिकाणी कुठल्याही चुकीला काही वावच नाही. सतत सावध, सतर्क हा इथला मंत्र आहे तो वर्षानुवर्षाच्या सवयीने अंगात मुरलेला असतो. आता झोप येत नाही, असं नाही, कारण आपण सारीच माणसं आहोत. मग अशा वेळी उठून उभे राहतो. थोडेसे काहीतरी बिस्किट वगैरे तोंडात यकतो. थर्मास असतोच, त्यातला थोडा चा घेतो. खिडकीतून बाहेर डोकावतो. जंगलातला मस्त वास खोलवर भरून घेतो. वर आभाळावर उमटलेली चांदण्यांची नक्षी न्याहाळतो. उगाच एखादा तारा ओळखण्याचा प्रयत्न करतो. खरं तर गाडी खूप वेगात धावत असते व सप्तर्षीची दिशाही त्याच वेगाने बदलत असते. गाडी सिग्नलप्रमाणे धावत असते. जवळ आलेला सिग्नल आमच्यासाठी महत्वाचा असतोच पण पुढचा येणारा, त्याच्या पुढेही येणारा सिग्नल अधिक महत्त्वाचा असतो. गेला तो क्षण गेला, येणाऱ्या क्षणाच्या पोटात काय दडलंय ते महत्त्वाचं. त्याच्यावर गाडीचा वेग अवलंबून असतो. इंजिनमध्ये स्टिअरिंग असत नाही. पण वेग वाढवणं आणि कमी करणं इतकंच काम आमच्या हातात नसतं; तर संपूर्ण इंजिनाची जबाबदारी आमच्यावर असते. जोडीला अनेक कामं आम्ही करत असतो. समोरचा ट्रॅक बघणं / स्टेशन पास होताना ऑलराइट देणं, 'ऑलराइट देणं' ही इंग्रजांनी सुरू केलेली पद्धत आजही उपयोगी पडत असल्यामुळे आजतागायत सुरू आहे म्हणजे मी स्टेशनवरून पास होताना माझ्याकडचा हिरवा झेंडा (किंवा बॅटरी) मास्टरला दाखवतो. तोही निवडक अंतर्नाद •४४७