पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याच्याकडून मला प्रतिसाद देतो. या सगळ्या सांकेतिक भाषेतल्या खुणा आहेत. म्हणजे मी जेथून आलो तो भाग (सेक्शन) निर्धोक आहे, त्यात काही अडचण नाही, हे मी स्टेशन मास्टरला सुचवतो. त्याचवेळी तोदेखील मला पुढे जायला काहीच अडचण नाही, मार्ग निर्धोक आहे याची सूचना त्याच्या प्रतिसादातून देत असतो. याचप्रमाणे गाडीच्या शेवटी असणारा गार्डदेखील आपली गाडी बरोबर आणि संपूर्णपणे स्टेशनमधून जात आहे याची सूचना देत असतो. हे प्रत्येक स्टेशनवर एका रिदममध्ये घडत असतं. इंजिनवर माझ्याबरोबर सहायकदेखील असतो. मास्टर गाडी समोरून जाताना तिचं निरीक्षणही करत असतो, जेणेकरून काही तुटलं / सुटलेलं लटकत असेल किंवा चाकांमधून आग / ठिणगी उडत असेल तर ताबडतोब लाल झेंडा किंवा बॅटरी दाखवून तो गाडी थांबवतो. त्यामुळे स्टेशनमधून जाताना शेवटपर्यंत आमचं मास्टरकडे लक्ष असतं, त्याच्या अशा काही संकेतांना प्रतिसाद देणं हे आमचं कामच आहे. / परत प्रत्येक गेटवर शिटी वाजवावी लागते. आपल्याकडे रेल्वेचे रूळ ओलांडणं ही एक फॅशन आहे अशा 'फॅशनेबल' माणसांनी आमच्या गाडीखाली मरू नये, यासाठी आम्ही सतत शिटी वाजवत स्टेशन / गेट पास करत असतो. याचा लोकांना त्रास होतो. मग ते रागावून शिव्या देतात / दगड फेकतात. पण आम्हांला यावर काहीच प्रतिक्रिया देता येत नाही. कारण आम्ही सरकारी नोकर! समोरचा दोन रुपयांचं तिकिट घेऊन वाटेल ते करू शकतो. कारण तो जनताजनार्दन! खरंतर गाडीखाली माणसं मरणं हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे! तो पुन्हा केव्हातरी, गाडी धावताना भोवताली अनेक खुणांचे बोर्ड लटकत असतात. त्यांचं अचूक पालन करत धावायचं असतं. कधी कधी रेल्वेची माणसं काम करत असतात. रूळ / दगड सातत्याने तपासावे लागतात. वेगाच्या प्रचंड ह्यदऱ्यानं त्यात आलेली कमतरता वेळीच दुरुस्त नाही केली तर एखादा अपघात होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या-त्या ठिकाणी वेग कमी करण्याचे बोर्ड लागतात. त्याप्रमाणे निर्धारित गतीने आम्ही गाडी चालवतो. आम्ही म्हणजे आम्ही अनेक जण मिळून गाडी चालवतो. एक गाडी ट्रॅकवर चालते तेव्हा वेगवेगळ्या विभागांतले अनेक लोक पडद्यामागे काम करत असतात. प्रत्यक्ष फिल्डवर आम्ही असलो, तरी सिग्नल यंत्रणेचे नियंत्रण कंट्रोल ऑफिसमधून होत असते. कंट्रोल ऑफिस हे एक वेगळंच प्रकरण आहे इथे रात्रंदिवस काम चालू असतं. रेल्वेच्या मुख्यालयात हे असतं. सगळ्या ऑफिसेसना कुलपं लागतात, वेळ संपल्यावर किंवा सुटीच्या दिवशी, पण कंट्रोल ऑफिस मात्र तिन्ही त्रिकाळ, बाराही महिने सुरू असतं. याच्या अखत्यारीत वेगवेगळे विभाग असतात. एक मेन कंट्रोलर असतो. त्याला दिवसभराचं नियोजन करायचं असतं. इतरांच्या मदतीने तो त्या त्या दिवसाचं नियोजन यशस्वीपणे पार पाडायचा प्रयत्न करतो. रेल्वे अनेक विभागांमध्ये वाटली गेलेली आहे प्रत्येक विभागाचं स्वतंत्र कंट्रोल ऑफिस असतं. ट्रॅकवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद कंट्रोल ऑफिसमध्ये लगेच उमटतात, 'तुझ्या अंतरी कोणती वादळे, मला हेलकावे बसू लागले', असंच काहीसं कंट्रोल ऑफिसचं स्वरूप ४४८ निवडक अंतर्नाद असतं. या सर्वांचा मुख्य डिविजनल मॅनेजर असतो. एक मॅनेजरने टीव्हीच्या मुलाखतीत असं सांगितलं होतं, "मी ऑर्केस्ट्रॉचा कंडक्टर आहे माझ्या अखत्यारीतील सर्व वाद्यं व्यवस्थित वाजली, तरच त्यातून आनंद देणारं संगीत मी निर्माण करू शकेन." आमच्या वेस्टर्न रेल्वे मुंबई डिविजनचं कंट्रोल ऑफिस पूर्ण जगात नावाजलं गेलं आहे. नॅशनल जिऑग्राफीवर वेस्टर्न रेल्वेच्या कंट्रोल ऑफिसवर एक डॉक्युमेंटरीदेखील दाखवली जाते. 'ट्रेन मॅनेजमेंट सिस्टिम' (TMS) ही प्रणाली आपल्याकडे वापरली जाते. डच टेक्नॉलॉजीवर आधारित संपूर्ण संगणकाने वापरलं जाणारं अद्ययावत तंत्रज्ञान इथे वापरलं आहे. नासाच्या ऑफिससारखं प्रचंड मोठं ऑफिस मुंबई सेंट्रलला आहे याचा रस्तादेखील इतरांपेक्षा वेगळा असतो. इतर ऑफिसमधील लोकांचा उपसर्ग / संपर्क होऊ नये अशा तऱ्हेने या ऑफिसची रचना केलेली असते. नको ती माणसं इथे येऊच शकत नाही. रेल्वेत काम करणाऱ्या इतर विभागांतील लोकांनादेखील या यंत्रणेचं महत्व आणि कार्य माहीत असेलच असं नाही. कंट्रोल ऑफिस हे रेल्वेचं धडकतं हृदय आहे. मी स्वतः काही वर्षं कंट्रोल ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. प्रचंड मोठ्या पडद्यावर विरार ते चर्चगेटमध्ये धावणाऱ्या प्रत्येक गाडीचं रेखाचित्र समोर उमटतं, प्रत्येक गाडीला एक नंबर असतो, वेस्टर्न रेल्वेवर रोजच्या रोज जवळजवळ १,३०० लोकल धावतात. बाहेरगावच्या तब्बल ५० ते ६० गाड्या रोज ये-जा करत असतात. हे सगळं विस्ताराने कंट्रोल ऑफिसमधून नियोजित केलं जातं. आम्ही कसला अहं ठेवत नाही, की मी गाडी चालवतो, कारण गाडी कंट्रोल ऑफिस चालवतं. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य गाडी पोचवणं हे कंट्रोलचं कर्मकठीण काम तिथली माणसं रोजच करत असतात. आम्ही ड्रायव्हर लोक समोर येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना रोज प्रत्यक्षपणे भिडत असतो. पण आम्हाला कंट्रोलचा पूर्ण सपोर्ट असतो. प्रत्यक्षात गाडी चालवताना रोज निरनिराळी आव्हानं समोर असतात. वेळ, ऋतू, वातावरण तापमान सारंच निराळं असतं. इंजिन डबे ठरावीक दिवसांनी रिपीट झाले, तरी त्यात बसणारी माणसं मात्र रोजच नवी असतात. आम्हाला जिथे जातो, तेथे राहण्याची सोय म्हणून रनिंग रूम ही एक मोठी व्यवस्था रेल्वेने केलेली असते. मोठ्या मोठ्या स्टेशनवर रेल्वेने ड्रायव्हर, गार्ड, टीसी यांच्यासाठी राहण्याची सोय केलेली आहे. या ठिकाणी राहून आपली रेस्ट पूर्ण करणे म्हणजे एक वेगळाच संघर्ष असतो. अक्षरशः धर्मशाळा ! विविध जाती- धर्मांचे, राज्यांतले / वेगवेगळ्या परंपरांतले लोक एकत्र येतात. त्यांच्या प्रत्येकाच्या झोपण्याच्या खाण्याच्या सवयी अगदी निराळ्या असतात. आपण स्वत:देखील एक वेगळ्या परंपरेचे, संस्कृतीचे पाईक असतो. आपली मते आपण इतरांवर लादू शकत नाही. अशा ठिकाणी बेअरर, कुक रेल्वेनं नियोजित केलेले असतात. आपण गेल्यावर असेल त्या बेडवर बेअरर आपल्यासाठी एक बेडशीट अंथरतो. एका रूममध्ये साधारण ४ ते ५ बेड असतात. प्रत्येक बेडवर वेगवेगळ्या वेळी झोपणारा आणि उठणारा असतो. प्रत्येकाच्या गाड्या निराळ्या असतात.