पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वडील... सारे सारे एका त्या दीडह्यत मूर्तीमध्ये सगुण साकार झाल्याचे जाणवते आणि एकूणच दृष्टिसुख कैवल्याचे होते. आता श्री विठ्ठलाला दह्या-दुधा- जळाची आंघोळ सुरू झाली होती. अत्तराची एक मोठी कुपी त्याच्या अंगावर उपडी केली होती, दूध, तूप, दही, मध, पाणी या साऱ्यांनी मूर्ती सुस्नात केली जात होती. विठ्ठलाची काया नितळ नव्हती. त्या खडबडीत कायेला दुधातुपाच्या आंघोळीने तकतकी आली होती. दुधाच्या चरव्यामागून चरव्या ओतल्या जात होत्या, पायतळी एक चांदीच्या चरणांचे मोठे चौरंगधारी तबक होते. विठ्ठलाच्या चरणाऐवजी चांदीच्या चरणांवर दूध ओतले जात होते. स्वच्छ वस्त्राने ते पुन्हा पुन्हा पुसले जात होते. त्या चांदीच्या कवचामुळे विठ्ठलाचे मूळ पाय, त्या समचरण पादुका मूळ स्वरूपात शाबूत राहिल्या होत्या. पांडुरंगाचे दूधदहीतीर्थोदकाने स्नान पूर्ण झाले आणि त्याच्या अंगावरील घट्ट चंदनाचे जे टिळे आधीच काढण्यात आले होते, त्याची एक सुपारीएवढी गोळी आम्हांला देण्यात आली. पांडुरंगाच्या देहावरचे चंदन आमच्या हातात आले! मग आणखी काही उपचार झाल्यानंतर प्रत्यक्ष पूजेला सुरुवात झाली. आमच्या हातून पूजा करविण्यात आली. प्रसादाचे ताट समोर धरण्यात आले. आम्ही पांडुरंगाच्या मूर्तीला सर्वांगी स्पर्श केला. त्याच्या छातीवरील जखमेची खूण, कौस्तुभ, कवचकुंडले, नाभिकमळ, पितांबराचा शेव, झिजलेले पण गोजिरे चरण, या साऱ्याला आम्ही उभयतांनी प्रत्यक्ष स्पर्श केला आणि जन्मजन्मांतरीचे धन्य झालो. मग तुळशीची भरगच्च माळ पांडुरंगाला घातली, त्याचे वस्त्र (उपरणे) गळ्याभोवती गुंडाळले, विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळालेले जरीचे वस्त्र शिरोभागी धरून त्याचा स्वीकार केला. मग पांडुरंगाच्या चरणावर डोके ठेवण्याचा चिदानंद क्षण... तोही आम्ही अनुभवला. मग सर्वप्रथम विठ्ठलाच्या भाळावर चंदनाचा केशरी लंबाकार उभा टिळा मुख्य पुरोहितांनी लावला. हे सारे प पडताच विठ्ठलाला वस्त्रप्रावरणे नेसवण्यास सुरुवात झाली. प्रथम भरजरी पितांबर, तो नेसवण्याची विशिष्ट पद्धत, त्याचे काठपदर, धारी, पट्टेदार रीतीने दोन्ही मांड्यांवर चोपून बसते. त्यावर पुन्हा कमरेभोवती विशिष्ट पद्धतीनेच नेसवलेले शेल्यासारखे राजवस्त्र, छाती दंडावर मखमली, रेशमी, भरजरी वस्त्रे, गळ्यात सुवर्णालंकार, कटीवरील हातांनाही रेशमी वस्त्रे, आणि शेवटी मस्तकावर सोन्याचा मुकुट! तुळशीमाळा गळा कर ठेवुनि कटी, कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी! आता मात्र ते सावळे परब्रह्म मूर्तिमंत श्रीमंत, ऐश्वर्यवान दिसू लागले. तेवढ्यात पुजाऱ्यांनी शंखनाद केला. पाठीमागे कुणी वारकऱ्याचे सुमधुर मंद स्वरांतील फक्त टाळ वीणेच्या साथीने सुरू झालेले, 'तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा!' हे भजन, धूपदीपांनी भारलेली, चांदीसोन्याने मढवलेली गर्भगुडी, चांदीची नक्षीदार प्रभावळ, घंटानाद आणि आरती एका तंद्रीतच आमची पूजा संपली. पुरोहितांनी पुन्हा नमस्कार, हस्तस्पर्श करवून घेतला आणि शेवटच्या ४४ निवडक अंतर्नाद - संकल्पपूर्तीसाठी आम्हांला मुख्य सभामंडपात, जिथे ती भव्य कासवाकृती आहे, तिथे आणले. विठ्ठलाच्या महापूजेचा भाळी अकल्पितपणे लिहिलेला सोहळा अडीच तासांनी संपला, हे अडीच तास आम्ही एका अननुभूत, अपूर्व अशा आनंदात 'चिदानंद' वावरत होतो. म्हणतात तो हाच का? वेडावाकुडा, काळासावळा, ओबडधोबड पांडुरंग अनादी काळापासून कोट्यवधी लोकांना वेड का लावतो त्याचा अल्पसा अनुभव आम्हांला त्याने लावलेल्या वेडातून मिळाला. हा त्याच दिवशी सायंकाळी विठ्ठल मंदिरापासून जवळच असलेल्या पांडुरंग भवनामध्ये एक चूल - एक कुटुंब' हा अभिनव कार्यक्रम होता. पंढरपूरचे आमदार श्री. सुधाकरपंत परिचारक यांनी तो आयोजित केला होता. महिलांची प्रचंड संख्या आणि एकत्रित कुटुंबधर्माचे श्रद्धेने पालन करणारी कुटुंबीय मंडळी. मी अनेक सामाजिक उपक्रम पाहिले. अनेकांना उपस्थित राहून भाषणे केली, पण सामान्यजनांच्या कुटुंबांच्या माध्यमातून समाज एकात्म ठेवण्याचा हा प्रयत्न वेगळा होता. ऐशी नव्वद वर्षांच्या कुटुंबप्रमुख महिलांचा कृतज्ञभावनेने केलेला सत्कार प्रथमच पाहत होतो. त्या सर्वांना, कधी नव्हे ते, व्यासपीठावर सन्मानाचे स्थान मिळाले होते. त्यांना माईकवरून आपले मनोगत सांगण्याची अपूर्वाईची संधी मिळाली होती. त्या सर्वांच्या बोलण्याचे सूत्र एकच होते. पांडुरंगाच्या या नगरीत एकोप्याने राहण्याची बुद्धी आम्हांला तोच देतो! पंढरपुरात अशी किमान पंचवीस तरी विशाल, एकत्र कुटुंबे आहेत जी एकाच चुलीवरील स्वयंपाक जेवतात. सर्व जातिधर्मांची, सर्व थरांतील संतांनी समाजपुरुष एकात्म ठेवण्याचा भक्तिमार्गाने प्रयत्न केला. येथे कुटुंबे एकत्र ठेवण्याचा संतांनीच दिलेला मार्ग ही मंडळी श्रद्धेने चोखाळीत होती. माणसाच्या मनातील श्रद्धा, भक्ती, ममत्व, प्रेम यांच्या आधारावरच तो जगत असतो. तो कितीही बुद्धिनिष्ठ असला तरी त्याला या भावनांना सामोरे जावे लागतेच. त्याला मी तरी अपवाद कसा असणार ? एरवी कधीही पूजेअर्चेला फारसे महत्त्व न देणारा, कर्मकांड न पाळणारा, न मानणारा मी विठ्ठलाच्या दर्शनाने एवढा व्याकूळ का झालो? माझ्या हातून भक्तिभावपूर्वक यथासांग पूजा कशी घडली? माझ्या लेखककुलातील सोनोपंत दांडेकर, गो, नी. दांडेकर, इरावतीबाई, दुर्गाबाई, दि. बा. मोकाशी, तर्कतीर्थ, महामहोपाध्याय पोतदार हे सारे इथे असेच व्याकूळ झाले होते? आणि आमचे कुलस्वामी ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, नामदेव ? मी तर त्यांच्यासमोर अणुरेणूएवढा तरीही व्याकूळ होऊन मला त्यांच्या पंक्तीत एका टोकाला बसण्याचे भाग्य लाभले व मी क्षणार्ध आकाशाएवढा झालो ! श्रद्धा, अश्रद्धा, अंधश्रद्धेच्या कारामध्ये, सीमारेषांवर अडखळणारा माझ्यासारखा सामान्य माणूस शेवटी परब्रह्मदर्शन घेऊन निवांत, ● शांत कसा होतो? हे सारे कोणत्या व्याख्येत बसवणार ? कोणत्या अध्यात्मात? (मार्च २००७)