पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

की संगीतकार सत्यजित यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे? त्यावर ते म्हणाले, "सत्यजित हे सक्षम संगीतकार आहेत. त्यांना काय हवे ते ते चांगल्या प्रकारे जाणतात. शिवाय त्यांचा पाश्चात्त्य संगीताचा अनुभवही मोठा आहे. " चित्रपटाचे प्रत्येक अंग कसे असावे याबद्दल दिग्दर्शकाचे मत अंतिम असते हे पंडितजींनी मान्य केले होते. 'सत्यजित यांनी स्वत:च संगीत देण्यास का सुरुवात केली असे विचारल्यावर रविशंकर म्हणाले, "चित्रपट दिग्दर्शकाचे मन हे आईच्या मनासारखे असते. दुसऱ्या कुणीतरी तिच्या मुलीची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेले तिला आवडत नाही. जर आईजवळ वेळ असेल व करण्याची क्षमता असेल तर आपल्या मुलाचे संगोपन तीच करील.” सत्यजित आणि रविशंकर यांचा एकमेकांशी परिचय वाढल्यानंतरच्या दिवसांतच कधीतरी सत्यजित यांच्या मनात रविशंकर यांच्यावर एक डॉक्युमेंटरी तयार करण्याचा विचार आला. राय यांची चरित्रकार मेरी सेटन हिच्या मते ही डॉक्युमेंटरी काढण्याची कल्पना राय यांच्या मनात १९५१-५२ साली आली. पण 'पाथेर पांचाली' चे संगीत देण्याचा विचार सुरू झाल्यावरच, म्हणजे १९५४ साली राय व पंडितजींचे संबंध घनिष्ठ बनले. त्यामुळे ही कल्पना तितकी जुनी असणे शक्य नाही. रविशंकर यांच्याशी चर्चा करत असताना, त्यांचे सतार वाजवणे लक्षपूर्वक निरखीत असताना राय यांच्या मनात जी चित्रे उमटली ती त्यांनी कागदावर रेखाटून ठेवली. संगीताचे एक जाणकार, शंकरलाल भट्टाचार्य यांनी १९७७ साली रविशंकर यांची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत या संदर्भात रविशंकर म्हणतात, "होय. त्यांच्या मनात तसा विचार होता हे खरे आहे. ही गोष्ट त्यांनी त्यांचा दुसरा चित्रपट 'अपराजितो' चे चित्रण सुरू केले त्यापूर्वीची आहे. त्यांनी या डॉक्युमेंटरीसाठी एक संपूर्ण अल्बम भरेल एवढी रेखाचित्रे चितारली होती. तो अल्बम मी पाहिलेला आहे. त्यात त्यांनी माझ्या एका काल्पनिक मैफिलीची रेखाटणे केली होती. मी सतार वाजवतो आहे... मी वेगवेगळे राग वाजवतो, असे दाखवताना माझ्या भावमुद्रांना वादळ, वारा, पाऊस, ढग यांच्या प्रतिमांची त्यांनी जोड दिली होती. हा एक वेगळाच प्रयोग होता. त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक, तो प्रोजेक्ट बाजूलाच पडला. त्या विषयावर आम्ही त्यानंतर बोललोही नाही.” खूप वर्षांपर्यंत या प्रकल्पाविषयी फारशी काही माहिती कुणालाच उपलब्ध नव्हती. २०१४ साली सत्यजित यांनी काढलेल्या मूळ रेखाटनांच्या वहीचा शोध लागला व ती ४५८ निवडक अंतर्नाद ' Society for the preservation of Satyajit Ray Archives' या संस्थेने एका देखण्या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित केली. या रेखाटनाची सुरुवात राय यांनी रविशंकर यांच्या एका क्लोजअपने केली आहे. रविशंकर तन्मय होऊन राग तोडी वाजवत आहेत. यानंतर जवळून आणि दूरवरून, वेगवेगळ्या कोनांतून काढलेली अनेक लहान लहान रेखाचित्रे आपल्याला दिसतात. एका चित्रात तबला वाजवणारे हात दिसतात. यानंतर रायनी या रागाशी संबंधित निसर्गातील काही दृश्यांची रेखाचित्रे काढलेली आहेत. आकाशात विहरणारे ढग, गळून पडलेली पाने, पाण्याच्या लाटांवर तरंगणारी कमळे, वादळात थरथरणारी झाडे.... संगीत ऐकताना रसिकाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रतिमा... पण या साऱ्यांतून राय यांना कोणत्या दिशेने पुढे जायचे होते ते समजत नाही. या चित्रांसोबत त्यांनी काही नोंदी लिहून ठेवलेल्या नाहीत. चित्रे, किंवा कॅमेऱ्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमा आणि संगीत यांची जुगलबंदी त्यांना दाखवायची असावी, मात्र हा अनोखा प्रकल्प कधीच पूर्णत्वाला गेला नाही, याचे महत्त्वाचे कारण या दोघांत निर्माण झालेला दुरावा हेच होते. रविशंकर एकदा या संदर्भात म्हणाले, "सत्यजित राय यांनी एका ठिकाणी असे मत व्यक्त केले की मी बॅलेचे संगीत उत्तम देऊ शकतो, पण चित्रपटसंगीत हा माझा प्रांत नाही. या व्यक्तव्यामुळे मी काहीसा दुखावलो गेलो.” असे असले तरी व्यक्तिगत जीवनात हे दोघे कलावंत एकमेकांचे मित्रच राहिले. दोघेही आपल्या कामात अतिशय व्यग्र असल्यामुळे दुर्दैवाने रविशंकर यांना १९७४ साली व सत्यजित यांना १९८३ साली हृदयविकाराचे झटके आले व त्यांची प्रकृती अधू बनली. यानंतर त्यांच्या भेटीही कमी झाल्या. तरीही कलकत्त्याला आले म्हणजे पंडितजी वेळात वेळ काढून सत्यजित यांना भेटून जात, रायबाबूंना फोन करून ते म्हणत, 'चला, आपण भेटू आणि गप्पा मारू' अनेक विषयांवर दोघांच्या छान गप्पा चालत. सत्यजित राय यांचे १९९२ साली निधन झाल्यानंतर रविशंकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'Farewell My Friend' या नावाच्या एका रेकॉर्डची निर्मिती केली. या रेकॉर्डमध्ये त्यांनी 'अपु त्रिवेणी' मधील संगीताचा वेगळ्या पद्धतीने वापर केला होता. आपल्या मित्राची आठवण काढताना त्यांच्या मनात तेच संगीत झंकारणे अपरिहार्य होते. (दिवाळी २०१९)