पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कामाप्रती असणारी सचोटी, निष्ठा या पिढीपर्यंत पोचली आणि त्याबद्दलची त्यांची कृतज्ञताच त्या उपलब्ध वेळातून व्यक्त झाली. या सर्वांमुळे ते वनवासी राम-सीता बघण्याची अधिकच ओढ मला वाटली. त्या शिल्पाकृतीला 'मास्टर पीस' चा मान असल्याने, या विभागाच्या एका स्टुडीओत त्यासाठी एक जागा निश्चित केली आहे, हे विशेष. गेले तिथपर्यंत मी आवडती शिल्पाकृती बघितली आणि निघाले. अनेक वर्षांनी बघितल्यामुळे आणखी काही वैशिष्ट्ये जाणवली, योग्यता असूनही विशेष नावलौकिक न झालेल्या त्या तत्त्वनिष्ठ मांजरेकरसरांचे योगदान योग्य प्रकारे अधोरेखित न झाल्याचे मनात ठसठसत होते. म्हणूनच अंतर्नादच्या दिवाळी अंकासाठी जेंव्हा संपादकांनी विचारले तेव्हा जन्मशताब्दीनिमित्त शिल्पकार व्ही. व्ही. मांजरेकरांचा परिचय, हाच विषय मी नक्की केला. रामायणातील कांचनमृग कथेची खालील चित्र (वनवासी राम-सीता ) म्हणजे नितांतसुंदर अभिजात अभिव्यक्ती! प्रभू श्रीरामचंद्रांची ही वनवासातील प्रतिमा तरुण, सुकुमार पण क्षात्रतेजही झळकत असणारी आहे. असे क्षात्रतेज शिल्पित करणे सोपे नाही. या प्रतिमेच्या अणुरेणूत ओतप्रोत आत्मविश्वास आहे. तो छातीच्या ठेवणीतून, उभे राहण्यातील सशक्त डौलातून आणि धनुष्य - बाण धरलेल्या हातातून प्रतीत झाला आहे. लक्षात आले • असेल की यात धनुष्याची प्रत्यंचा, बाण प्रत्यक्षात तेथे नाहीत. पण त्या संबंधीत सर्व घटकांचे, हाताचे, बोटाचे बारकावे असे काही आहेत की तो आभास निर्माण होऊ शकतो. रामाजवळ थोडी रेलून उभी राहिलेली सीतेची प्रतिमा, चेहऱ्यावरील भाव निभ्रांत, प्रसन्न, काहीतरी विशेष दिसत असणारी मुद्रा वर गळ्याजवळ नेलेल्या हातामुळे, ती स्वतःच्या कंचुकीसाठी कांचनमृगाच्या कातडीची मागणी करत आहे, अशी कल्पना बघणाऱ्यांच्या मनात नकळत निर्माण होते. म्हणजे ज्यांना ही कथा माहीत आहे त्यांच्या मनात, आत्ताच्या तिशी- पस्तिशीपर्यंतच्या पिढीला, हे कथानक माहीत नसण्याची शक्यता आहे. तथापि हे कथानक माहीत नसले तरी कलाकृतीचे सौंदर्य उणे होणारे नाही. पार्श्वभूमीची झाडेझुडपे थोडीफार निगा असलेली आहेत. यातूनही वनातील निवासाची कुटी जवळपास असल्याचे सुचित होते. संपूर्ण शिल्पाकृतीला लयबद्धता आहे. माफक वस्त्रे, आभूषणे, यांचे कोरीव काम लाजबाब आहे. वनवासी राम-सीता. पहिल्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील सुवर्णपदकविजेती शिल्पकृती - १९५६ (माध्यम-प्लास्टर) ४६० निवडक अंतर्नाद