पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादकीय अंतर्नादची दशकपूर्ती: थोडे प्रकट चिंतन अंतर्नादची संपादकीये म्हणजे वाचकांशी साधलेला संवादच असायचा. नमुना म्हणून चार संपादकीये या संकलनात समाविष्ट करत आहोत. सर्वप्रथम ऑगस्ट २००५ मध्ये अंतर्नादच्या वाटचालीला दहा वर्षे पूर्ण झाली त्या वेळी घेतलेला हा एक आढावा. त्या वेळच्या अनेक अडचणी काळाच्या ओघात दुर्दैवाने अधिकच बिकट होत गेल्या आणि दुःखद शेवट अपरिहार्य ठरला. अंतर्नादचा हा दशकपूर्ती विशेषांक वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. अडखळत पडणारी पावले आता थोडीफार स्थिरावत आहेत, पण वाटेत खाच-खळगे आहेतच. "दहा वर्षं कशी गेली, कळलंच नाही" असे म्हणण्याइतकी काही ही वर्षे सुरळीत पार पडली नाहीत, पण हस्तलिखित ते छापील हा प्रवास मूलत: आवडीचा असल्याने अडचणींचा फारसा वैतागही कधी आला नाही; आज तरी या उपक्रमात अडचणीपेक्षा आनंदाचा भाग अधिक आहे. एखाद्या मासिकाने अकराव्या वर्षात पदार्पण करणे यात उपक्रमाशी थेट संबंध नसलेल्यांनी दखल घ्यावी, असे फारसे काही नाही. पण आपण कुठे चाललो होतो आणि आता कुठे आहोत, याचा आढावा घ्यायची संबंधित व्यक्तींना ही एक संधी असते. असे सिंहावलोकन करताना आज दहा वर्षांनंतर काय वाटते? सर्वप्रथम मनात दाटते ती अनेकांविषयीची कृतज्ञतेची भावना, मागचा साधारण शंभर वर्षांचा कालखंड विचारात घेतला तर मनोरंजन - करमणूक - विविध ज्ञानविस्तार चित्रमयजगत- ज्योत्स्नापासून किर्लोस्कर स्त्री अभिरुची सत्यकथा- हंसपर्यंत अनेक मराठी मासिकांनी अंतर्नादच्या पूर्वीच मराठी नियतकालिकांच्या वाटचालीत अनेक मैलाचे दगड निर्माण करून ठेवले आहेत. एकूण साहित्यसृष्टीला त्यांनी दिलेले योगदान वादातीत आहे. पण त्याचबरोबर हेही खरे, की नियतकालिकांना व एकूणच साहित्यनिर्मितीला एकेकाळी बऱ्यापैकी पूरक असलेले वातावरण साधारण १९८० नंतरच्या कालखंडात झपाट्याने बदलत गेले. लेखकाचे - व साहित्याचे समाजातील अग्रस्थान नाहीसे झाले. दृक्श्राव्य माध्यमाचा विकास, वृत्तपत्रांच्या घरपोच येणाऱ्या भरगच्च पुरवण्या, इंग्रजीचे प्राबल्य, नागरी जनजीवनातील वाढती स्पर्धा व त्यातून हरपलेले मानसिक स्वास्थ्य या व अशा इतरही अनेक कारणांनी मासिकांची पडझड होत गेली. सामाजिक परिस्थितीचा लाभ मिळणे तर सोडाच, एकूणच मासिक चालवणे म्हणजे उघडउघड प्रवाहाविरुद्ध पोहणे बनले. त्यात दमछाक होऊन अनेक मासिकांनी मान टाकली बहुतेकांचे अस्तित्व केवळ दिवाळी अंकापुरतेच उरले. ४६६ • निवडक अंतर्नाद मराठी मासिकांच्या - व एकूणच वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने अतिशय प्रतिकूल अशा या परिस्थितीत अंतर्नादने जन्म घेतला. वाट बिकट आहे याची कल्पना होती, पण अनेकांनी दिलेल्या निरलस सहकार्यामुळेच ती थोडीफार सुकर झाली. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. - सुरुवात लेखकांपासून करायला हवी. "लेखक एवढ्या- तेवढ्याने दुखावले जातात, कारण ते खूप संवेदनाक्षम असतात. लेखकाची अस्मिता सांभाळून त्याच्याकडून हवं तसं लेखन करून घेणं हे संपादकापुढचं सर्वांत कठीण काम आहे,” असे अंतर्नादच्या प्रथम अंक प्रकाशन समारंभात ज्येष्ठ संपादक मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते. याचीही सत्यता यथावकाश पटली. दोन-तीन लेखक, व इतरही काही परिचित, दुरावले, का, ते कधीच स्पष्ट झाले नाही, पण अंतर पडले हे खरे, नंतर प्रयत्न करूनही ते साधता आले नाही, याचे आता मागे वळून पाहताना खूप वाईट वाटते. पण असे अनुभव अपवादस्वरूप आहेत. सामान्यतः लेखक व इतरही व्यावसायिक सहकाऱ्यांचे अंतर्नादला चांगले सहकार्य मिळाले. नावानिशी उल्लेख करत नसलो तरी त्यांच्याशी असलेले नाते हे नेहमीच आपलेपणाचे राहिलेले आहे. श्रेयनामावलीत 'व्याकरण- सल्लागार' हे बिरुद असणारे दुसरे मराठी मासिक बहुधा नसावे, अंतर्नादमध्ये व्याकरणाच्या चुका फारशा आढळत नाहीत, याचे मोठे श्रेय यास्मिन शेख यांना द्यावे लागेल. निरंजन घाटे, मानसी मागीकर, मयूर जोगळेकर, प्रसाद मणेरीकर, सुशील धसकटे, स्नेहा अवसरीकर हे अंतर्नादचे वेळोवेळीचे कार्यालयीन सहकारी त्यांचे सहकार्यही खूप मोलाचे होते आहे. ज्यांनी अंतर्नादला वेळोवेळी जाहिराती दिल्या त्यांचाही उल्लेख इथे कृतज्ञतापूर्वक करायला हवा. स्वतःचा कुठलाही व्यावसायिक फायदा नसतानाही त्यांनी हे सहकार्य दिले. पत्नी वर्षाचा उल्लेख तर कुठल्या शब्दांत करायचा? तिच्या पूर्ण सहभागाशिवाय हा उपक्रम इतकी वर्षे चाललाच नसता; किंबहुना सुरूच झाला नसता.