पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतर्नादची कमाई चांगले साहित्य चांगल्या वाचकांपर्यंत पोचवणे हे कुठल्याही मासिकाचे जीवितकार्य, डावे-उजवे, दलित सवर्ण, ग्रामीण-शहरी, मित्र परका, मदतशील खडूस, स्वत:ला व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त वा अनुपयुक्त प्रस्थापित नवोदित वगैरे कुठचेही साहित्यबाह्य निकष लेखकांना न लावता, शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे, प्रत्यक्ष साहित्य वाचून वाचकांना चांगले साहित्य द्यायचा, एक किमान दर्जा राखायचा, अंतर्नादने सातत्याने प्रयत्न केला आहे. शेक्सपीअर विशेषांक, कालिदास विशेषांक, रवीन्द्रनाथ विशेषांक, धार्मिक सलोखा विशेषांक असे अनेक विशेषांक अंतर्नादने काढले. कथालेखनाला उत्तेजन द्यावे म्हणून कथास्पर्धा घेतल्या. पुणे विद्यापीठ, राज्य मराठी विकास संस्था वगैरे अनेक संस्थांच्या सहकार्याने कवितावाचन, मुलाखती, कथालेखकांसाठी निवासी शिबिरे इत्यादी उपक्रम राबवले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले. वेगवेगळ्या गावी केले. अंतर्नादमधल्या बऱ्याच लेखनाची इतर प्रसार माध्यमांनी ही वेळोवेळी बऱ्यापैकी दखल घेतली. उदाहरणार्थ, 'एक करपलेला झंझावात हा राम शेवाळकर यांचा सुरेश भटांवरील लेख. 'महाराष्ट्र टाइम्स मध्ये या लेखाचा विस्तृत आढावा घेताना 'कलंदर' नी लिहिले होते, "शेवाळकरांनी भटांची कविता व त्यांचे व्यक्तिमत्त्व याबद्दल इतका मार्मिक आणि अभूतपूर्व लेख लिहिला आहे, की तो लेख म्हणजे जणू एक अपूर्व गद्य गझलच झाला आहे.” कलाकृती आणि कलावंताचे व्यक्तिगत जीवन यांचे नेमके काय नाते असते हा एक महत्त्वाचा प्रश्न या संदर्भात चर्चेत आला. अंतर्नादमधल्या इतरही अनेक लेखांच्या बाबतीत हे म्हणता येईल. अंतर्नादमधल्या अनेक सदरांची पुढे वेगवेगळ्या प्रकाशकांनी पुस्तके काढली. यशवंत रांजणकर यांचे 'अ-पूर्व चित्रगाथा', लक्ष्मण लोंढे यांचे 'लक्ष्मणझुला', अरविंद गजेंद्रगडकर यांचे 'स्वरांची स्मरणयात्रा', शान्ता शेळके यांचे 'कविता स्मरणातल्या' इत्यादी. नवोदितांनाही अंतर्नादने जवळजवळ प्रत्येक अंकात आवर्जून स्थान दिले. मुखपृष्ठाबाबत वेगवेगळे प्रयोग केले. अनेक उत्तम चित्रे वाचकांपुढे आणली अनुवादित साहित्यही भरपूर छापले. कविता व कविताविषयक गंभीर लेखनही छापले. वृत्तपत्रांत विस्तृत पुस्तकपरीक्षणांना पुरेशी जागा मिळत नाही, म्हणून ती अंतर्नादमध्ये जाणीवपूर्वक दिली; चार चार, सहा-सहा पानी पुस्तक परीक्षणेही छापली. वाचकांनाही अंतर्नादने नेहमीच मानाचे स्थान दिले. वाचकपत्रांना इतकी जागा देणारे दुसरे मासिक बहुधा पटकन सांगता येणार नाही. खरे तर अशा प्रकारे व्यक्त होण्याची मराठी वाचकांना फारशी सवयही नाही. अंतर्नादने हा एक नवा पायंडा पाडला, असे विनयाने सांगावेसे वाटते. 'प्रतिसाद' हे सदर आता अंतर्नादचा एक अविभाज्य भाग बनले आहे. लेखनाशेवटी लेखकाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आम्ही छापत असतो. आपले लेखक इतर नियतकालिकांनी हिरावून नेण्याची शक्यता असूनही! वाचकांना लेखकांशी त्यामुळे थेट संवाद साधता येतो व असा परस्परसंपर्कही वाङ्मयीन संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आमच्या सर्व लेखकांचे, व पत्रलेखकांचेही, आम्ही मनापासून आभारी आहोत. मागे वळून पाहताना जाणवणारी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अंतर्नादला लाभलेला वर्गणीदारांचा विश्वास वाचकांशी • बांधिलकी, संपादकीय जबाबदारीचे भान, दर्जेदार निर्मिती आणि व्यवहारातील चोखपणा ही चार मूल्ये पाळायचे पहिल्याच अंकात दिलेले आश्वासन पाळायचा अंतर्नादने जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे दर महिन्याच्या एक तारखेला अंक हाती पडेल याची या वर्गणीदारांना खात्री वाटते. ही नियमितता कायमच पाळली गेली आहे एकदा अंक पोस्टात दिल्यावर मात्र पुढच्या वितरणावर आमचे काहीच नियंत्रण नसते व त्यामुळे 'अंक मिळाला नाही' अशा साधारण वीस-पंचवीस तक्रारी दरमहा येतात; पण त्या प्रत्येकाला दुसरा अंक आम्ही निश्चित पाठवतो, खूपदा कुरीअरचा खर्च करावा लागला तरी पाठवतो. बहुधा अशाच काही कारणांमुळे अनेक वर्गणीदारांना अंतर्नाद 'आपला' वाटतो. "प्रत्येक वर्गणीदाराने एक अधिक वर्गणीदार मिळवून दिला, तरी वर्गणीदारांची संख्या दुप्पट हाईल,” अशी केवळ सूचना करून स्वतः वर्गणीदार असलेले एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विद्यापीठाचे उपकुलगुरू थांबत नाहीत; आपल्या वीस मित्रांचे पत्ते वर्गणीच्या एकत्रित चेकसह दुसऱ्याच दिवशी पाठवून देतात. "अहमदाबादच्या चारुल- विनयवरचा लेख आवडला दरमहा तुम्ही एखादा छोटा कार्यक्रम करता; एखाद वेळी त्यांनाही बोलवा. चांगला हॉल घेऊन तो कार्यक्रम करा," अशी केवळ सूचना करून एक ज्येष्ठ वकील वर्गणीदार थांबत नाहीत. कार्यक्रमाच्या सर्व खर्चाची रक्कमही आगाऊ व घरपोच देतात. हे सगळे पुन्हा स्वतःचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर, अंतर्नादविषयीच्या ममत्वातूनच हे घडू शकते. 'अंक पसंत नसेल तर वर्गणीचा उर्वरित हिस्सा परत केला जाईल, असे अंकातून जाहीर केले असतानाही जवळपास कोणीच कधी वर्गणी परत घेतलेली नाही, वर्गणी नूतनीकरणाचे प्रमाणही साधारण ७५ टक्के राहिले आहे, ही वर्गणीदारांनी दिलेली एक पसंतीची पावतीच आहे. मराठी साहित्य लिहूनच मोठ्या झालेल्या आणि तरीही वाचकांपासून फटकून राहणाऱ्या काही साहित्यिकांपेक्षा अशा सर्वसामान्य वर्गणीदारांचे साहित्यप्रेम अधिक सच्चे असते. असो. वर्गणीदारांचा विश्वास ही अंतर्नादची मोठी कमाई आहे. हा विश्वास अंतर्नादमधून प्रतीत होणाऱ्या एका विशिष्ट जीवनदृष्टीवरचा विश्वास आहे, याचीही जाणीव आम्हांला अर्थातच आहे अंतर्नादच्या मर्यादा पण हे सगळे खरे असले, तरीही आज अंतर्नादच्या वर्गणीदारांची एकूण संख्या फक्त १५६० एवढीच आहे, हे कटू सत्य नजरेआड करता येत नाही. विक्रेत्यांमार्फत सरासरी ३५० प्रती दरमहा विकल्या जातात. म्हणजे एकूण खप १९१० झाला. ( या व्यतिरिक्त दरमहा ८० प्रती 'सप्रेम भेट म्हणून पाठवल्या निवडक अंतर्नाद ४६७