पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाचकांच्या प्रतिसादाबाबत थोडे मूळ १०० पुस्तकांच्या निवडीबाबत बहुतेक वाचक समाधानी होते, परंतु काहींनी असमाधान व्यक्त केले होते हे नमूद करायला हवे. उदाहरणार्थ, नांदेडहून विजय पाडळकर यांनी लिहिले होते, "मराठीतील निवडक १०० पुस्तकांचा शोध घेण्याची कल्पना आवडली. अर्थात अशा यादीतील पुस्तकांबद्दल मतभेद नेहमीच असतात. उदाहरणार्थ, त्र्यं. वि. सरदेशमुखांची डांगोरा एका नगरीचा' ही असामान्य कादंबरी या यादीत असायला हवी होती. 'संध्याकाळच्या कविता' हे असेच एक 'अ'टळ नाव. कथेत पानवलकरांना वगळून चालणार नाही..." - इतरही अनेक लेखकांचा / पुस्तकांचा उल्लेख वाचकांकडून झालेला आहे. त्यांच्या मतांविषयी पूर्ण आदर आहे; पण ही मतभिन्नता अपरिहार्यच आहे. "पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना, कुण्डे कुण्डे नवं पयः। जातौ जातौ नवाचारा, नवा वाणी मुखे मुखे॥” यातली विविधता हे सामर्थ्य आहे, तशीच मर्यादाही! क्रिकेट संघात समावेश व्हावा असे अनेक असतात, पण शेवटी अकराच खेळाडू निवडायचे असतात - तसेच काहीसे हे आहे. काही जणांना वीसपेक्षा अधिक पुस्तके निवडणे अपरिहार्य वाटले. उदाहरणार्थ, नाशिकच्या डॉ. चंद्रकांत वर्तकांनी २६ पुस्तके निवडली होती. उपक्रम अधिक चांगला व्हावा म्हणून काही काही वाचकांनी स्वत: पुढाकार घेऊन वेगवेगळे मार्ग चोखाळले. उदाहरणार्थ, बुलडाण्याचे एक ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांनी स्वतःची निवड कळवण्याबरोबरच वाचनालयाचे इतरही चांगले वाचक हेरून त्यांच्यापैकी बारा जणांची निवडपत्रे पाठवली. पुण्यातले एक आर्थिक सल्लागार सु. रा. थिगळे यांची प्रतिक्रिया एक प्रातिनिधिक वाचक म्हणून बोलकी आहे. आपली निवड कळवताना हे लिहितात : "प्रथम मनमोकळेपणे, मनावर कोणतेही दडपण अथवा बंधन न ठेवता, मला आवडलेल्या पुस्तकांवर खुणा केल्या. ती एकूण ३७ पुस्तके झाली. त्यातून शेवटी वीस पुस्तके निवडताना - व इतर पुस्तके गाळताना - मनाची खूपच घालमेल झाली. गाळलेल्या पुस्तकांच्या लेखकांवर आपण अन्याय करत आहोत, ही अपराधीपणाची भावना मनाला सतत बोचत होती. 'तुमच्या एकूण अपत्यांपैकी तुमची आवडती अपत्ये सांगा,' असे एखाद्या मातेला विचारल्यावर तिच्या मनाची जी स्थिती होईल, तशीच स्थिती माझ्या मनाची झाली. पण यानिमित्ताने गेले पंधरा-वीस दिवस वाचलेल्या पुस्तकांची कथानके, त्यांच्या वाचनाने त्या त्या वेळी मिळालेला आनंद, पुस्तक वाचतानाचा काळ, या सगळ्याची परत उजळणी झाली व त्यामुळे एक निराळाच आनंद उपभोगता आला. " वाचकांनी या उपक्रमाकडे किती गांभीर्याने पाहिले, याचे हे एक द्योतक म्हणता येईल. या सर्व वाचकांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. वीस पुस्तकांची निवड केल्यानंतर या उपक्रमाचा पुढचा टप्पा होता वाचकांपुढे ही पुस्तके आणण्याचा. त्यासाठी एकाच जाणकार लेखकाने सर्व लेख लिहिणे हा एक पर्याय होता, व्यवहार्यतः तो अधिक भावणारा होता. ( गंगाधर गाडगीळ यांचे 'साहित्याचे मानदंड' हा अशा लेखनाचा एक आदर्श मानता येईल.) पण त्या पर्यायात सर्व पुस्तकांचे मूल्यमापन एकाच नजरेतून, एकाच विशिष्ट अभिरुचीतून झाले असते. पुस्तकांची विविधता पाहता, त्यांच्यावर लिहिण्याची जबाबदारी वीस वेगवेगळ्या लेखकांवर सोपवणे अधिक श्रेयस्कर वाटले. या परिचयपर लेखांपासून पुढील अपेक्षा होत्या : १. पुस्तकाचा साधारण आशय गोषवारा या लेखांतून वाचकांना कळावा. 'मला हे पुस्तक का आवडले हे परिचयकर्त्यांने ३५०० ते ४००० शब्दांत (अंतर्नादची सुमारे सहा पाने ) सर्वसामान्य वाचक डोळ्यांपुढे ठेवून मांडावे. २. पुस्तकाचे साहित्यगुण, विषयाचे नावीन्य, आशय आणि अभिव्यक्तीतील वेगळेपण लेखात मांडले जावे. ३. पुस्तकाचे एकूण मराठी साहित्यातील स्थान व त्या लेखकाच्या एकूण लेखनातील या पुस्तकाचे स्थान यांचा ऊहापोह व्हावा. लेखकाविषयीही नव्याने काही सांगता आले तर ते सांगितले जावे. ४. या पुस्तकांविषयी पूर्वीही बरेच लिहिले गेले असणार, त्याच्यापेक्षा वेगळे काही सांगण्याचा प्रयत्न असावा. ५. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर श्रेष्ठ कलाकृतीचे सौंदर्य रसिकाला वेगवेगळ्या अंगांनी प्रतीत होते. किंबहुना रसिकाला अशी वेगवेगळ्या अनुभूतींची प्रचिती द्यायचे सामर्थ्य हे कलाकृतीच्या श्रेष्ठत्वाचेच एक लक्षण आहे. आज काही वर्षांनंतर पुन्हा एकदा हे पुस्तक वाचताना नव्याने असे काय गवसते, पुस्तकाचे स्वतःच्याच मनाशी कळत-नकळत पुनर्मूल्यमापन होते का याचाही वेध घ्यावा. पुस्तकपरिचय करून देण्यासाठी किमान सहा महिने वेळ मिळावा म्हणून मार्च महिन्यातच त्या त्या विशिष्ट पुस्तकासाठी सर्व दृष्ट्या योग्य असे वीस नामवंत लेखक / समीक्षक निश्चित केले गेले, त्यांच्याशी चर्चा झाली व आमच्या स्वतःच्या उपरोक्त अपेक्षा व्यक्त करणारे पत्रही त्यांना पाठवले गेले. काही अपरिहार्य व्यक्तिगत कारणांमुळे त्यांतल्या तिघांना हे काम जमू शकले नाही व त्यांच्याऐवजी अन्य लेखकांवर ही जबाबदारी सोपवावी लागली. प्रत्येक समीक्षकाची जाण-भूमिका- लेखनशैली ही अपरिहार्यपणे वेगळी होती व त्यामुळे प्रत्येक लेखाला येणारे वेगळेपण आम्हांलाही जाणवत होते. प्रासादिकता, सोपेपणा हा काहींच्या लेखनाचा एक उपजत गुण होता; काहींच्या लेखनाची सामर्थ्यस्थळे वेगळी होती. हे अभिव्यक्तीचे वेगळेपण एकूण पुस्तकांमधील वैविध्याचाही एक सहजाविष्कार आहे; ते वेगळेपण अशा लेखमालिकेचे एक वैशिष्ट्यही मानता येईल. ही सर्व परीक्षणे या दिवाळी अंकातून वाचकांपुढे ठेवत आहोत. गेले वर्षभर चालू असलेल्या अंतर्नादच्या एका उपक्रमाची ही तशी स्वाभाविक सांगता आहे. निवडक अंतर्नाद •४७५