पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपादकीय प्रत्यक्षाहुनि प्रतिमा अद्भुत भानू काळे आपल्या अनेक धारणा वास्तवापेक्षा माध्यमांमार्फत मनावर उमटणाच्या प्रतिमांवरच अधिक बेतलेल्या असतात. सोमवार, ४ फेब्रुवारी २००८. सहज टीव्ही लावला आणि उत्तर भारतीयांविरुद्ध मुंबईत जोरदार आंदोलन सुरू असल्याची बातमी समोर आली. वेगवेगळ्या माणसांच्या प्रतिक्रिया दाखवल्या जात होत्या. 'आमचा गुन्ह्य तरी काय?' - भयभीत झालेले उत्तर भारतीय विचारत होते. मुंबई फक्त मराठी माणसांचीच आहे का, परप्रांतातल्या दोन कोटी मराठी माणसांवर असे हल्ले झाले तर, यांसारखे प्रश्न उपस्थित केले जात होते. निवेदकाचा स्वर गंभीर होता. याच वेळी पडद्याच्या अर्ध्या भागात प्रत्यक्ष दंगलीची दृश्ये दाखवली जात होती. काचा फुटलेल्या टॅक्स्या, फेरीवाल्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवत असलेले दंगेखोर, काठ्या परजत धावणारे हेल्मेटधारी पोलीस, सायरनचे आवाज, दगडफेक... - त्यावेळी मी नुकताच मुंबईहून परतलो होतो. वा. रा. ढवळे जन्मशताब्दी निमित्त मुंबई मराठी साहित्य संघात संपादन: दृष्टी आणि कौशल्य' या विषयावरील एका परिसंवादात भाग घ्यायचे आमंत्रण होते. त्या निमित्ताने इतरही काही कामे करावीत म्हणून तीन दिवस मुंबईतच मुक्काम होता. तेव्हा तर सगळीकडे शांतता होती. राहायलाही एका उत्तर भारतीय मित्राच्याच घरी होतो. तिथेही कुठला तणाव आढळला नव्हता. आदल्या दिवशी म्हणजे रविवारी, तर योगायोगाने शिवाजी पार्कलाच होतो म्हणजे मुख्यतः ज्या परिसरात ही दंगल चालली होती असे चित्र निर्माण केले गेले होते, तिथेच. तेव्हाही एकूण वातावरण नेहमीसारखेच दिसले होते. ज्यांच्या घरी गेलो होतो तिथे व्यवस्थित गप्पागोष्टी रंगल्या होत्या. रस्त्यावर वाहनांची नेहेमीचीच वर्दळ, बाजारहाट करणारे लोक; आमची पुण्याची बसही अगदी वेळच्या वेळी दादर बसस्टँडवरून सुटली होती. त्यामुळे सोमवारी पुण्यात टीव्ही बघताना आपल्याला कसं नाही यातलं काही दादरमध्ये दिसलं, याचे साहजिकच कुतूहल वाटून त्या बातम्या उत्सुकतेने बघू लागलो. आणि काही मिनिटांतच लक्षात आले, की हे सगळे मिडियानाट्य दिसते आहे; म्हणजे प्रत्यक्ष घटना खऱ्या असतीलही, पण ज्या नाट्यपूर्ण पद्धतीने त्या पडद्यावर साकार केल्या जात होत्या, ते केवळ मिडियाचे कसब होते. पुढची काच फुटलेली एकच टॅक्सी पुनःपुन्ह्य दाखवली जात होती, मारझोड केला जाणारा एकच बापडा फेरीवाला पुन:पुन्हा दाखवला जात होता. असल्या दोन-चार दृश्यांचेच फूटेज एकसारखे दाखवून, वेगवेगळ्या लोकांचे बाइट्स मधून मधून पेरून, जणू एक चित्तथरारक चित्रपटच प्रेक्षकांपुढे सादर केला जात होता. बातम्या देणाऱ्याच्या आवाजातला कमावलेला चढउतार, स्वरातली उत्कंठा, पार्श्वसंगीताची जोड, क्लोजअप्सचा कुशल वापर, पार उत्तर प्रदेश बिहारमधल्या हिंदी नेत्यांच्या घाईघाईने घेतलेल्या व 'संतप्त वाटाव्या अशा प्रकारे संपादित केलेल्या प्रतिक्रिया आणि या सगळ्यांची परिणामकारकता वाढवणारा, जनतेला आपणच 'सत्य' परिस्थिती सांगत असल्याचा आविर्भाव, या सगळ्यांतून त्या बातमीपत्राचे 'टीआरपी' चांगलेच वाढले असणार आणि आजच्या धंदेवाईक माध्यमांच्या दृष्टीने तीच खरी महत्वाची बाब असते. कारण मुळात, शिवाजी पार्कवरच्या ज्या सभेच्या निमित्ताने हा सगळा प्रकार घडला, ज्या सभेला भरपूर गर्दी होती, ज्या सभेत अनेक मोठे हिंदीभाषक राष्ट्रीय नेते बोलले, त्या प्रत्यक्ष सभेची बातमी मात्र अगदी जेमतेमच दिली गेली होती - सगळा भर होता तो भडकपणे दाखवल्या गेलेल्या मूठभरांच्या दंगेखोरीवर या सगळ्या आंदोलनामागची सामाजिक-राजकीय कारणे काय असतील, त्यातून कोणाच्या करिअरला किती 'पुश' मिळेल, कोण किती 'मायलेज' काढेल हा सगळा स्वतंत्र चर्चेचाच विषय आहे; पण एखादी बारीकसारीक घटनाही प्रसारमाध्यमांतून अतिशय भडकपणे कशी सादर केली जाऊ शकते, सुतावरून स्वर्ग गाठावा तसे तिच्यावरून व्यापक निष्कर्ष कसे काढले जातात, आणि अशा नाट्यपूर्ण सादरीकरणातून लोकांच्या मनावर ठसल्या जाणाऱ्या प्रतिमा प्रत्यक्षापेक्षा कितीतरी जास्त 'अद्भुत' कशा असतात, याचे हे एक ताजे उदाहरण आहे. या बातम्या चार-पाच वेळा सलग पाहिल्या, की बघणाऱ्याच्या मनावर अशीच प्रतिमा ठसणार होती, की जणू अख्खी मुंबई उत्तर भारतीयांविरुद्ध पेटून उठली आहे. त्यामुळे भडकून काही उत्तर भारतीय तरुणांनी अन्य प्रांतांतल्या दोन कोटी मराठी माणसांविरुद्ध आंदोलन निवडक अंतर्नाद ४७७