पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अखेरचं अवधान अवधूत परळकर "ज्या समाजात वाचन ही बिनमहत्त्वाची गोष्ट समजली जाते; ज्या समाजात ज्ञानपीठविजेत्या व्यक्तीपेक्षा टीव्ही मालिकेतला नवा कलाकार अधिक पैसा, प्रतिष्ठा मिळवून असतो, त्या समाजात कुणाही लेखकाला निराशेनं ग्रासलं तर नवल नाही. " सलग चार वर्षे चाललेल्या अवधान या सदरातील समारोपाचा लेख. हे शेवटचं 'अवधान'. 'अवधान' सुरू करण्याचा निर्णय संपादकांचा होता. पण हे सदर थांबवायचा निर्णय मात्र त्यांनी माझ्यावर सोपवला. "अवधान सदर 'अंतर्नाद' च्या अखेरच्या अंकापर्यंत चालवायला आम्हांला आवडेल. मात्र तुमची इच्छा होईल तेव्हा ते तुम्ही बंद करू शकता," असं ते मला नेहमी म्हणायचे, अलीकडल्या भेटीत त्यांनी हे वाक्य पुन्हा उच्चारताच, त्या वाक्याची वाट पाहत असल्याप्रमाणे, सदर याच महिन्यात संपवावं असं मला वाटत असल्याचं त्यांना बोलून दाखवलं, निरोपादाखल अखेरचं एक 'अवधान' लिहून त्यात सदर समाप्तीची घोषणा करावी असं ठरलं. 'अवधान' लिहिणं थांबवावं असं मला का वाटावं? लिहायची तर मला चांगलीच हौस आहे. मग, संपादकांची काही तक्रार नसता, मला हे सदर थांबवावंसं का वाटलं? या अखेरच्या 'अवधान' मधून मी स्वतः या प्रश्नाची उत्तरं शोधू पाह्यतोय. उत्तरं शोधू पाहण्याच्या या प्रक्रियेत स्वतः विषयी बोलणं आलं; जी गोष्ट मला अजिबात आवडत नाही. मग हे कसं जमायचं? एका मित्राच्या सांगण्यानं हे अवघडलेपण बरंच दूर झालं, मित्र म्हणाला, "विचार करून बघ, आपल्याला स्वत:विषयी बोलायला आवडत नाही, आत्मप्रौदी रुचत नाही, असं बोलणं हेही स्वतः विषयी आत्मप्रौढीनं बोलणंच नाही का? आपल्याला कोणत्याही प्रकारचा गर्व नाही असं छाती पुढं काढून बोलणं हे काय असतं? गर्वच नाही काय तो एक प्रकारचा?” मित्राचं बोलणं एकदम पटून गेलं. स्वतःविषयी बोलायला पुरेसं नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं. मला लिहायची हौस आहे असं आधी म्हणून गेलो, ते अर्धवट सत्य आहे. मला लिहायला आवडतं म्हणजे विचार प्रकट करायला आवडतात, पण ते विचार नीटपणे कागदावर उतरवणं मला नेहमीच कठीण वाटत आलं आहे जसं आता मला अवधान थांबवायचं एकच एक ठाम कारण सांगणं कठीण होऊन बसलं आहे. काय करावं? आपल्या आळशीपणाची जाहीर कबुली कशी द्यायची? थोडा विचार केला, तेव्हा आणखी काही मुद्दे मिळत गेले. उदाहरणार्थ : माझी तक्रार लिहिण्यासंबंधी नाही; लिहायला वेळेचं बंधन असण्यासंबंधी आहे विशिष्ट मुदतीत विशिष्ट मजकूर लिहिणं ही मला शिक्षा वाटते. शाळेत मला निबंध लिहायला आवडायचा; पण शाळेच्या परिक्षेत निबंध लिहिणं मला संकट वाटायचं. लेखनासाठी कालमर्यादा नकोशी वाटायची. 'अवधान' चा तीन पानी मजकूर लिहायला मी सात सात दिवस घेत असे. माझा लिहायचा वेग कमी आहे. लिहिण्याआधी विषयावर विचार करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. माझा विचार करण्याचा वेळ तर माझ्या लिहिण्याच्या वेगाहून कमी आहे. हे मी माझा मोठेपणा किंवा कमीपणा म्हणून तुमच्यापुढं ठेवत नाही. माझ्या बऱ्या वाईट स्वभावाचं वास्तव म्हणून हे तुमच्यासमोर मांडतोय. लिहिणाऱ्याचा स्वभाव, आवडीनिवडी त्याच्या लेखनातून वाचकांपुढं येत राहतात असं म्हटलं जातं. पण ते पूर्ण सत्य नाही. लिहिणारे (आणि न लिहिणारे लोकदेखील) अनेकदा स्वतःला व्यक्त करण्याऐवजी स्वतःचं अंतरंग लपवण्यासाठी शब्द वापरतात. अंजली कुलकर्णीनं आपल्या कवितेत म्हटलंय 'बरे झाले निर्माण झाली भाषा संकरातून म्हणूनच शब्द आले माणसाच्या तैनातीसाठी अन्यथा कसे दडवले असते आपण सत्य पोटी?' - तर एकूणच लिहिता-बोलताना आपली अशी दडवादडवी बरीच चालते. कारणांचा शोध घेऊ या असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण त्या संशोधन कामासाठी अप्रत्यक्षपणे वाचकांच्या सहकार्याची मागणी करत असतो. सहकार्य कोणते? तर आपण वाचकांना जे सांगू पाहत असतो, त्यामागील प्रामाणिकपणा समजून घ्यायचा वाचकांनी प्रयत्न करावा हे. निवडक अंतर्नाद ४७