पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळाला नाही तरी नाउमेद होऊ नका, मासिकाला स्वत:चं व्यक्तिमत्त्व प्राप्त होईपर्यंत काही काळ जावा लागेल. दर्जा सांभाळतानाच वाचकांच्या आवडीनिवडीही लक्षात ठेवणं ही तारेवरची कसरत करावी लागेल. पैशाची बाजू भरभक्कम असेल तर ही कसरत परवडेल. अंतर्नादसाठी मी जरूर लेखन साहाय्य करीन, सुभाष भेण्डे, वांद्रे, मुंबई (ऑगस्ट १९९५) अंतर्नादचा पहिला अंक मिळाला. हल्ली कोणतंही मासिक वाचावसं तर सोडाच पण हातात धरवत नाही. पण अंतर्नादने अपेक्षा वाढवल्या, 'यशवंत जयवंत' (डॉ. राम बिवलकर) हा लेख आणि 'महात्मादेखील माणूस असतो' हा तुम्ही लिहिलेला पुस्तकपरीक्षणाचा लेख खूप आवडला, हरिलाल मोसंब घेऊन बांना भेटतो त्या प्रसंगाने तर डोळ्यात पाणी आले. हल्ली असा अनुभव विरळाच झाला आहे. बरेच दिवस माझी लेखणी अबोल होती. अंतर्नाद वाचून पुन्हा लेखनाची उर्मी आली आहे. पं. अरविंद गजेंद्रगडकर, पर्वती, पुणे (सप्टेंबर १९९५) मराठीत आज एक-एक मासिक बंद पडत असताना आपण 'अंतर्नाद' सुरू केलंय, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज आठ कोटीपेक्षा जास्त मराठी बोलणाऱ्यांची संख्या असतानाही महाराष्ट्रात एकही मासिक धड चालू नये ही परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. मुलांचं मासिक सुरू करून, दोन वर्षांनंतर ते, वाढत जाणारा तोटा सहन करून नाईलाजाने बंद करावं लागलं, हा माझा अनुभव आहे. 'अंतर्नाद' या सगळ्या गोष्टींवर मात करून एक उत्तम मासिक म्हणून चालू शकेल याची खात्री दुसरा अंक बघून येते. अंक वाचनीय झाला आहे. काफ्काची कथा, जे. आर. डी. च्या सहवासात, एक लेखक. कुत्रा होतो त्याची गोष्ट; हे आवडले. नवीन महत्त्वाच्या पुस्तकांचा परिचय यात यावा, बाबा भांड, साकेत प्रकाशन, औरंगाबाद (दिवाळी १९९५) आजच्या भल्या भल्या मासिकांच्या बंद पडण्याच्या काळातही आपण मनस्वी चैतन्याने हे मासिक सुरू केले हे पाहून फार समाधान झाले. त्यामुळे मी ताबडतोब वर्गणी भरायचे ठरवले. अंकातील सर्व साहित्य चांगले वाटले. विशेषत: जेआरडी टाटा यांच्यावरील 'भव्यतेचा यात्रिक' हा आपला लेख मला फार आवडला. डॉ. ललिता व डॉ. निशिकांत मिरजकर, दिल्ली (डिसेंबर १९९५) अंतर्नादचे ऑगस्ट व सप्टेंबरचे दोन्ही अंक नावीन्यपूर्ण असून मजकुरात विविधता आहे. या दोन्ही अंकांत आपण विविध सदरे घेतलेली आहेत. यातील काही सदरे सर्वसामान्य वाचकाला रुचतील काय हा एक प्रश्न आहे. सर्वसामान्य वाचक नजरेसमोर ठेवून मासिकाचे संपादन केले तरच मासिक टिकू शकेल. मी जेव्हा नव्याने कथालेखनाला सुरूवात केली तेव्हा मराठीत बरीच मासिके नियमितपणे निघत होती, नियमित निघणाऱ्या या मासिकांनी मला आणि माझ्यासारख्या इतरही कथालेखकांना घडवलेले आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षांपासून ही मासिके बंद पडलेली आहेत. या मासिकांचे केवळ दिवाळी अंक निघत आहेत. या दिवाळी अंकांत नवोदित लेखकांना स्थान प्राप्त होत नाही. त्यामुळे या लेखकांची सध्या फार मोठी कोंडी होत आहे ही कोंडी फोडण्याचे महत्त्वाचे कार्य अंतर्नादला करावयाचे आहे. प्राचार्य रा. रं. बोराडे, औरंगाबाद (डिसेंबर १९९५) जाणकार वाचकांचा जिव्हाळा अंतर्नाद या आगळ्यावेगळ्या मासिकाच्या अंतरंग दर्शनाने बरे वाटले. अभिनिवेश, अगणित अव्यावहारिक संकल्प आणि सगळ्या अंगभर पसरलेला कृतकतेचा तवंग हेच आजच्या मराठी मासिकांचे भागधेय असते, प्रचार आणि प्रसार या अंगीकृत कार्याच्या वाढीसाठी वेठीला धरल्या जाणाऱ्या मराठी मासिकांच्या प्रभावळीत अंतर्नाद हे मासिक पृथक् कसे आहे हे आजपर्यंत अनेकांनी सांगितले आहे. अंतर्नादने जी जवळीक आणि जो जिव्हाळा जाणकार वाचकांच्या मनात निर्माण केलेला आहे त्याला तोड नाही, हा खरे तर हृदयसंवादच आहे. जवळीकीचा खरा अर्थ अंतर्नादमध्येच उमटला आणि उमगलादेखील! प्रा. डॉ. शशिकांत शां. देशपांडे, फर्ग्युसन कॉलेज, पुणे (एप्रिल १९९६) अंतर्नादचा पहिला अंक वाचल्यावर लगेच पत्र पाठवावे असे मनात आले. पण भाकरी थोडी निवण्याची वाट पहावी असे मुलांना सांगण्याची सवय आड आली. आत्तापर्यंत बहुतेक सर्व अंक वाचले. वाट पहावी अशा मासिकाचा आनंद त्यातल्या खस्तांच्या अनुभवाने विशेषच झाला. तेव्हा प्रथम मन:पूर्वक अभिनंदन! सोबत माझी व माझ्या मुलीची वर्गणी पाठवत आहे. आगीनझाड (वैशाली पंडित) व बागी (राजन खान) या दोन्ही कथा आवडल्या, तसलिमाच्या लेखनाचा अनुवाद मिळवल्याबद्दल खूब खुषी, शांता किर्लोस्कर, संपादन, एरंडवणे, पुणे (मे १९९६) आत्ताच सकाळी सकाळी आपला अंक आणि पत्र मिळाले. अंतर्नादबद्दल ऐकले होते, अनिल किणीकर, ह. मो. मराठे, राजन खान यांनी माझे लेखन तुमच्याकडे पाठविण्याचा सल्ला दिला होता, पण मीच चालढकल करत होतो, अंतर्नाद जगले पाहिजे आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ते जगवले पाहिजे, वाचकांच्या दृष्टीने बुडत चाललेल्या विसाव्या शतकातील हे एकमेव तारू ठरावे. ह्यापेक्षा स्वच्छ काय लिहू? मी कार्यकारी संपादक, संपादक, एका मासिकाचा मालक, मुक्त पत्रकार, लेखक आणि सरतेशेवटी भाजीवाला अशा वेटोळ्यांतून फरफटलो आहे. सध्या भाजीचे दुकानही बंद करून निवडक अंतर्नाद ४८५