पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आठवतं की, त्याने आपल्या आत्मचरित्रात सावरकरांचा उल्लेख केला आहे. 'मी ऐकलेले सर्वांत प्रभावी वक्ते' असे सावरकरांचे वर्णन त्याने केले आहे. बॅ. विठ्ठलराव न. गाडगीळ, शहाजहान रोड, नवी दिल्ली (ऑगस्ट १९९७) अकस्मात मिळालेलं समाधान आज अकस्मात समाधानाची चार फुलं वेचली, सकाळी अकरा वाजता ज्ञानमाता दुर्गा भागवतांचा फोन आला, म्हणाल्या, "अंतर्नादमधील तुमची कथा 'जमुना' वाचली. मला आवडली. तुमच्या इतर लेखनासारखी ती नाही, वेगळी आहे. मी आभार मानले. दुर्गाबाईंनी चांगलं म्हणणं आणि मुद्दाम टेलिफोन करून वळवणं, हे सुख अनुपमेय आहे. यापुढे जुळवून आणलेले पुरस्कार वगैरे फिके आणि फोल वाटतात. त्यांचं 'गोधडी' हे ताजं पुस्तक नि विशेषत: त्यातला ज्ञानकोशकार केतकरांवरचा जेमतेम वीतभर लांबीचा आखूड पण आशयगर्भ लेख, मला फार हृद्य वाटल्याचं मी बाईंना सांगितलं. त्यांना ज्ञानकोशकार हा आवडीचा विषय मिळाला. मग त्यांनी मला त्यांच्या अनेक गोष्टी ऐकवल्या, ज्ञानकोशकार केतकर, म. गांधी, आचार्य अत्रे, असे अनेक विषय त्यांनी त्यांच्या पद्धतीने अक्षरश: घुसळून काढले. नंतर आचार्य अत्रेविषयी एक आठवण सांगून त्यांनी फोन ठेवला, नंतर पुन्हा फोन करून त्या जे म्हणाल्या ते पुढे शब्दश: देत आहे : "मला 'अंतर्नाद' मासिक आवडलं. मला त्यांची वर्गणीदार होण्याची इच्छा आहे. पण सध्या माझा हात अवघडला आहे, त्यामुळे मी अर्ज वगैरे लिहू शकत नाही. तुमची 'अंतर्नाद' शी ओळख आहे काय? मग माझं एक काम करा. त्यांना म्हणावं, मला अंक व्ही. पी. ने पाठवा, म्हणजे मी तो इकडे सोडवून घेऊ शकेन. माझ्याकडे कॅश आहे तुम्ही एवढं त्यांना कळवाच. ती माणसं एका जागी बसून चांगलं काम करीत आहेत. त्यांचा अंक वाचून आपल्याला आनंद होतो. आणखी काय हवं?” तेव्हा तुमच्या धोरणात बसेल तसं करा. बाई ८७ वर्षांच्या आहेत. तब्बेत बरी नाही. कायम घरी असतात, केव्हातरी फोनवरून संपर्क साधा. किंवा पत्र लिहा, मात्र कदाचित त्या पत्रोत्तर लिहू शकणार नाहीत. केवळ 'अंतर्नाद'मुळे मला दुर्गाबाईंची शाबासकी मिळाली! बाकी श्रीरामकृपा! रवींद्र पिंगे, हनुमान रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई (ऑगस्ट १९९७) विद्याधर पुंडलिक : एक आठवण अंतर्नादचे अंक उत्सुकतेने वाचतो, वाचकांना काही नवं द्यावं या ईष्येतून तुम्ही अंक संपादित करता हे लक्षात येतं. वाचकांचा प्रतिसादही वाचनीय असतो. मार्च १९९८ च्या अंकात डॉ. प्रल्हाद वडेर यांचं चंद्रकांत वर्तकांनी राम पटवर्धनांवर लिहिलेल्या लेखाच्या संदर्भातलं पत्र प्रसिद्ध झालं आहे. 'सत्यकथा'च्या लेखकांना पटवर्धन अनेक वेळा पुनर्लेखन करायला लावीत, आपल्या चौकटीत लेखकाला ठोकून ठोकून बसवीत, असं वडेरांनी लिहिलं आहे. स्वत:च्या चौकटीत जे बसेल तेच सत्यकथेनं छापलं. 'जो जे वांछिल तो ते लिहो' यावर पटवर्धन व अन्य यांचा विश्वास नव्हता, संपादकीय संस्करणाविषयी विचित्र कल्पना या मंडळींनी उरी बाळगलेल्या होत्या. स्वत: वडेर 'सत्यकथा' परिवारातले; त्यामुळे त्यांचं हे निरीक्षण लक्षणीय वाटलं, के. विद्याधर पुंडलिकसारखा चांगला लेखक त्या चौकटीतच समाधान मानून राहिला व परिणामी तो खुरटला, या वडेरांच्या विधानाच्या संदर्भात माझी आठवण सांगतो, पुण्याहून मुंबईला आले की पुंडलिक अनेकदा माझ्याकडे उतरत असत. दिवाळी अंक जवळ आले की पुंडलिक सत्यकथेची कथा घेऊन मुंबईला येत. 'सत्यकथा' कचेरीत जाऊन संध्याकाळी हस्तलिखित घरी आणत, "पटवर्धनांनी थोडे बदल सुचविले आहेत," असे सांगत. रात्री जेवण झाल्यावर गप्पाटप्पा यळून टेबलापाशी बसत. कथेशी झटापट सुरू होई. एकदा दोन वाजता मला जाग आली तर पुंडलिक लिहिण्यात मान, वर पंखा फिरत असून घामाघूम झालेले! "काय पुंडलिक, चाकू-ब्लेड काही देऊ का?" मी विचारी, "कशासाठी?" "कथेला टोक वगैरे काढण्यासाठी!" मी म्हणे. ते हसून लेखन सुरू ठेवीत. कधी झोपेत कोण जाणे! हे पाठोपाठ दोनतीन दिवस चालत असे. दुपारी खटाववाडी, रात्री जागरणं, मला त्यांची दया येई. सकाळी चहा पिताना कथा- दुरुस्तीच्या मॅरेथॉन प्रकल्पावर आमची चर्चाही होत असे. पुंडलिक दुरुस्तीचे तावातावानं समर्थन करीत. त्यांचं म्हणणं पटत नसे, पण त्यांच्या सत्यकथा-निष्ठेचं मनोमन कौतुक करत त्यांचं बोलणं मी मुकाट्याने ऐकून घेई, असं तीन वर्ष घडलं. सत्यकथा बंद पडल्यावर पुंडलिक येईनासे झाले. 'सत्यकथा का बंद पडली?' यावर लवकरच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात चर्चा झाली, राम पटवर्धन यांनी चर्चेला उत्तर देताना विधान केलं, "विद्याधर पुंडलिकांसारखे दुय्यम दर्जाचे कथालेखक सत्यकथेला सांभाळावे लागले. " 'माणूस' मध्ये हा वृत्तांत सविस्तर प्रसिद्ध झाला, पुंडलिकांच्या तो वाचनात आला. मी पुण्याला गेलो की त्यांना न चुकता भेटत असे. एकदा पर्वतीकडे फिरायला जाताना, गप्पा मारताना, ते मध्येच थांबले. मला विचारू लागले, "तू पटवर्धनांचं भाषण ऐकलंस?" मी होकारार्थी मान हलवली. "त्यांनी माझ्याबद्दल तसं विधान खरंच केलं?" मी "हूं" केलं आणखी काही बोललो नाही. त्यांचा विवर्ण चेहरा आजही डोळ्यांपुढं येतो... डॉ. सुभाष भेण्डे, साहित्य सहवास, बांद्रे (पू.), मुंबई, (मे १९९८ ) निवडक अंतर्नाद ४८७