पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'दीप-शिखा मॅनेजर्स' श्री. शरू रांगणेकर यांच्या 'दीप-शिखा मॅनेजर्स' या मूळ इंग्रजी लेखाचा श्री. अ. पां. देशपांडे यांनी केलेला अनुवाद आवडला. लेखातील रांगणेकर यांचा माझ्याविषयीचा गौरवपर उल्लेख अंगावर मूठभर मांस चढवून गेला! (आणि ते शरीरावर नको त्या ठिकाणी चढत असतं, हे मी सोयीस्करपणे विसरलो!) रांगणेकर यांचं व्यवस्थापन क्षेत्रातील योगदान मोठं आहे. त्यांना मी मानतो, पण एक प्रश्न पडला- त्यांच्या लेखाचं शीर्षक अंतरंगाला विसंगत तर नाही? रांगणेकर यांनी 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर'ला १९८१ च्या सुमारास भेट दिली. माणूसकेंद्रित व्यवस्थापन संस्कृती मागे ठेवून साराभाई गेल्याला तेव्हा दहा वर्ष झाली होती. मी एका कामगाराबाबत जे केलं असं रांगणेकर म्हणतात, तो खास साराभाईंच्याच कार्यसंस्कृतीचा आविष्कार होता, आमच्यासारखी हजारो माणसं साराभाईंच्या व्यवस्थापन पद्धतीत आनंदाने डुंबत होती, जेव्हा शरू रांगणेकर यांनी आम्हाला पाहिलं, त्याच्या आधी दहा वर्ष (म्हणजे साराभाई असताना त्यांनी आम्हाला पाहिलं असतं तर, कदाचित तेही आमच्याबरोबर नाचले असते! 'विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रा'चा संचालक म्हणून बरीच वर्ष काम केल्यावर मी दिल्लीला बढतीवर गेलो. साराभाईंना जाऊन तेव्हा जवळजवळ १५ वर्ष झाली होती. आज ३३ वर्ष झाली आहेत. साराभाई संस्कृतीची मूळ झळाळी आज थोडी ओसरलीय; पण तरीही, भारत सरकारच्या अगडबंब नोकरशाहीत 'अंतरिक्ष विभाग' आजही सर्वांत कार्यक्षम व देशाची शान सतत उंचावत ठेवणारा आहे असं एकमुखानं म्हटलं जातं. ज्यांनी या कार्यसंस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली आणि ती माणूसकेंद्रित असतानाही वस्तुनिष्ठ राहावी यासाठी अनेक निकोप रीतिरिवाज रुजवले, ते विक्रम साराभाई आदर्श मॅनेजर होते, पण 'दीप शिखा' नव्हते, त्यांच्यासारखा मॅनेजर, रांगणेकर म्हणतात त्याप्रमाणे ध्येयनिष्ठा, कृतिशीलता व स्वामिनिष्ठा अशा तिन्ही गुणांनी संपन्न हवाच; कालिदासाच्या उपमेतील इंदुमतीसारखा तो देखणा व 'आधुनिक राजेरजवाड्यां'च्यावर छाप टाकणारा असेल तर फारच उत्तम, पण तो इंदुमतीसारखा, जिथे जाईल तिथलाच भाग तेवढा उजळवून टाकणारा व पुढे गेल्यावर मागचा भाग काळोखात लोटणारा असा नको. कारण तसा तो असेल तर विधायक, पद्धतशीर कार्यप्रणालीची परंपरा तो निर्माण करू शकणार नाही. अराजकता माजलेल्या देशात एखाद्या लष्करी हुकूमशहाने काही काळ शिस्त आणावी आणि तो काळाच्या पडद्याआड गेल्यावर 'येरे माझ्या मागल्या' व्हावं, अशा पद्धतीचा 'दीप-शिखा' मॅनेजर शरूजींना नक्कीच अभिप्रेत नसावा. फक्त इंदुमतीच्या काव्यमय उपमेमुळे 'आदर्श मॅनेजर'चा अपभ्रंश दीप शिखा मॅनेजर' असा कदाचित झाला असावा. थोडक्यात, माणसाला उच्च-नीचतेच्या चष्म्यातून न बघणारी, माणसाला माणूस असं मानणाऱ्या व्यवस्थापन संस्कृतीची पेटती पणती आमच्यासारख्यांच्यासाठी मागे ठेवणारी विक्रम साराभाई, सतीश धवन यांच्यासारखी माणसं मला खरी आदर्श मॅनेजर्स वाटतात. शरू रांगणेकर यांच्यातील व्यवस्थापन तज्जाला त्रिवेंद्रमच्या भेटीत ती संस्कृती जाणवली आणि म्हणून वीस वर्षांच्या प्रदीर्घ कालानंतरही त्यांना विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रांतली माणसं आठवली, असं मी मानतो. डॉ. वसंत गोवारीकर, मॉडेल कॉलनी, पुणे ( एप्रिल २००५) दुर्बोध कविता जानेवारी २००५ अंकातील प्रा. विलास पाटील यांचे आधुनिक कवितेतील दुर्बोधतेबद्दलचे पत्र वाचल्यानंतर मराठी कवितेवर प्रेम करणाऱ्या अनेक रसिकांना आपल्याच भावनांना या पत्राने तोंड फोडले आहे असे वाटेल. पत्र फारच अर्थपूर्ण आणि कविप्रेमींच्या दुखण्यावर नेमके बोट ठेवणारे आहे. मी यंदाचे निवडक आणि दर्जेदार असे दहा बारा दिवाळी अंक वाचले. अंक उघडल्यावर प्रथम मी सर्व कविताच वाचते. अंकातील निदान तीन चार कविता माझ्या डोक्यावरून, एकही केस बाका न करता, भराभर पार झाल्या नेहमी जुन्या नव्या कविता वाचणाऱ्या (क्वचित स्वत:ही बरे-वाईट, पांढऱ्यावर काळे करणाऱ्या) माझ्यासारख्या काव्यरसिकाला अलीकडच्या कवींच्या कविता अजिबात कळू नयेत, ही व्यथा मला फार त्रास देते. आपण स्वत:च या कवितांबाबत कमी पडतो, असे समजून मी हा विचार बाजूस सारते. माझेच दुर्दैव!! असो, पद्मा लोकूर, प्रभादेवी, मुंबई ( एप्रिल २००५) नियतकालिके बुडण्याचे एक कारण जानेवारी महिन्यात 'साधना मीडिया सेंटर' मध्ये मी अंतर्नादबरोबरच इतर सात मराठी नियतकालिकांची वर्गणी भरली. बरेच दिवस अंकांची वाट पाहून संबंधितांना 'साधना' व मी (अशा दोघांनीही) पत्रे लिहिली; आठवण केली. पण मंडळी काही आजपर्यंत हललेली नाहीत. वर्गणी गिळून, सुस्तावून पडून आहेत. पत्राचे साधे उत्तर देण्याचेही सौजन्य नाही. यातली काही नियतकालिके खास आणि खास करून पुरोगामी चळवळीतली आहेत, असे त्यांचे सगेसोयरे सांगत असतात. मराठी नियतकालिके बुडतात, चालत नाहीत, त्यामागचे एक कारण हे सामाजिक नीतिमत्तेचा अभाव. आणि जाणत्या, रसिक वाचकांसंबंधीची बेमुर्वतखोर वृत्ती! पुढे-मागे यावर एक लेखच लिहावा असा विचार आहे. 'अंतर्नाद'बद्दल आनंद प्रकट करतो तो अशासाठी की असा ताप त्यांच्याकडून झाला नाही, अंक नियमितपणे येत आहेत. व्यावसायिक निष्ठा हे व्यवसायवृद्धीचे मायपोट असते. या निमित्ताने अभिनंदनाची संधी साधून घेतो. प्रा. डॉ. एस. एस. भोसले, सिडको, औरंगाबाद ( सप्टेंबर २००५) निवडक अंतर्नाद ४९१