पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनमिळाऊ होते, यात शंकाच नाही. पण त्यांच्या एका गोष्टीचा उल्लेख कोणीच केला नाही. तो येथे नमूद करतो, भेण्डे यांनी निवृत्त झाल्यावर एक लाख रुपयांची देणगी 'द गोवा हिंदू असोसिएशन'ला दिली. त्या रकमेच्या व्याजातून एक वर्षाआड उत्कृष्ट अनुवादासाठी व उत्कृष्ट नाट्यसंहितेसाठी पारितोषिक देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांनी पारितोषिकाला स्वत:चे किंवा आपल्या कोणा पूर्वजाचे नाव दिले नाही, श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात यावा, अशी त्यांची अट होती. साधी फोटोफ्रेम जरी दिली तरी त्यात देणगीदार म्हणून स्वत:चे नाव ठळकपणे लिहिणारे लोक असतात. या पार्श्वभूमीवर भेण्ड्यांसारखी व्यक्ती दुर्मिळचा 'हिंदी वाक्यम् प्रमाणम्' हा सलील कुलकर्णी यांचा लेख अत्यंत भावला. कोणीतरी 'इंडस्ट्रियल प्लांट'चे भाषांतर 'औद्योगिक झाड' असे केल्याचा उल्लेख त्यांच्या पत्रात आहे या निमित्ताने भाषांतराच्या काही मोठ्या चुका आठवल्या, 'नेचर ऑफ धिस प्रॉब्लेम'चे भाषांतर 'या प्रश्नाचा निसर्ग' असे केले होते! दिब्रुगढ येथे पावसामुळे व पुरामुळे रेल्वेचे शेकडो 'स्लीपर्स वाहून गेले याचे भाषांतर रेल्वे रुळावर झोपलेले शेकडो लोक वाहून गेले' असे एका महाभागाने केले होते! अशोक जैन, अंधेरी, मुंबई (मे २०११ ) अराजकीय कार्याच्या मर्यादा डॉ. बंग दांपत्य, डॉ. आरोळे दांपत्य, आमटे कुटुंब यांनी वैयक्तिक कर्तबगारी, समाजातील तळागाळातील माणसांबद्दल वाटणारे प्रेम व आपल्या कार्यात इतर तरुणांना सहभागी करण्यातील यश यांच्या जोरावर हजारो आदिवासी, खेडूत आणि कुष्ठपीडित लोकांना मदत केली, जीव वाचवले, त्यांची आरोग्यवृद्धी केली व त्यांना स्वावलंबी आणि शिक्षितही बनवले. पण त्यांचे काम ठरावीक लहान परिसरात मर्यादित राहिले व सर्व आयुष्यभर काम करून, काही हजार व्यक्तींच्या जीवनातच त्यांना बदल घडवून आणता आला. या सर्वांचे काम इतके व्यक्तिवैशिष्ट्यांवर आधारित होते, की जागोजागी अशा कार्याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. आपल्या खंडप्राय, विस्तीर्ण देशामध्ये व त्यात राहणाऱ्या १२० कोटी लोकांच्या जीवनामध्ये, या सर्वांच्या कार्याने, जवळपास काहीच फरक पडला नाही, हे सत्य अप्रिय असले तरी मान्य केले पाहिजे, याउलट श्रीमती मेधा पाटकर यांनी धरणग्रस्तांसाठी केलेल्या राजकीय चळवळीमुळे देशभरातल्या प्रकल्पग्रस्तांच्या आत्मविश्वासात भर पडली. राज्यकर्त्यांना पुनर्वसनासाठी नवीन कायदेकानू करावे लागले. एकूण, देशाच्या कानाकोपऱ्यांत पोचणारा व दीर्घकाळ टिकणारा फायदा मेधा पाटकर यांच्या राजकीय चळवळीमुळे झाला. एक प्रकारचा व्यवस्था बदल झाला, ज्याचा परिणाम दिसण्यासाठी प्रत्येक जागी मेधा पाटकर यांनी व्यक्तिश: हजर असणे आवश्यक नाही. श्री. शरद जोशी यांच्या शेतीमालाच्या किमतीबद्दलच्या राजकीय चळवळीमुळेदेखील असा विस्तृत प्रदेशात व दीर्घकाळ टिकणारा बदल झाला व त्याचा ५०० निवडक अंतर्नाद फायदा मोठ्या लोकसंख्येला मिळाला, मिळणार आहे. अशाच प्रकारचे चांगले व्यवस्थात्मक बदल टी. एन. शेषन (निवडणूक आयोग), श्री. श्रीधरन (कोकण रेल्वे कॉर्पोरेशन), श्री. चंद्रशेखर भावे (सेबी) यांनी घडवून आणले, कारण त्यांनी उपलब्ध व्यवस्थांचा वापर करून निवडून आलेल्या राजकारण्यांच्या प्रभावापासून मुक्तता-स्वायत्तता मिळवली. श्री. अण्णा हजारे यांच्या प्रयत्नाने झालेल्या माहितीचा हक्क कायद्यामुळे एक प्रकारचे मन्वंतरच झाले आहे. यापेक्षाही अनेक पटींनी चांगले बदल, चांगले राजकीय नेते जर प्रधानमंत्री / मुख्यमंत्री बनले तर घडवून आणू शकतात. सहज डोळ्यांसमोर येणारी नावे म्हणजे प्रधानमंत्री नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, वाय, एस. रेड्डी, हे राजकीय नेते कोट्यवधी जनतेच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. अर्थात वाईट नेता मुख्यपदी आल्यास प्रचंड नुकसानदेखील घडवून आणू शकतो. सातत्याने चांगले, निदान बरे नेते सत्तेवर आणणे ही लोकशाहीची कसोटी आहे राजकीय नेत्यांच्या खालोखाल परिणामकारकता टाटा, किर्लोस्कर, अंबानी, नारायणमूर्ती, डॉ. रेड्डी या उद्योग-स्थापकांची दिसते. या लोकांनी लाखोंना रोजगार दिला. जनतेची कार्यसंस्कृती, अर्थसंस्कृती यांत बदल केला व देशाच्या केवळ अर्थव्यवस्थेलाच नाही, तर सर्वांगीण बदलाला चालना दिली. डॉ. बंग, डॉ. आमटे, डॉ. आरोळे यांची कामे उत्तम व प्रशंसनीय आहेतच; पण ज्यांना देशातील एकूण जनतेच्या जीवनात लक्षणीय बदल घडवायचा असेल, त्यांना राजकीय किंवा औद्योगिक वाटांनीच जावे लागेल. डॉ. सुभाष आठले, नागाला पार्क, कोल्हापूर (जुलै २०११) यामुळे मराठी भाषेचेच नुकसान! 'शहीद नव्हे, हुतात्मा' या शीर्षकाखालील अंतर्नादच्या एप्रिल अंकातील पत्र वाचले. समाजातील कट्टरपंथीय हिंदूंमधील इस्लाम धर्मीयांबद्दलच्या खोलवर रुजलेल्या विद्वेषाचे अस्तित्व त्यातून निदर्शनास आले. 'हुतात्मा' शब्दाऐवजी 'शहीद' शब्द वापरल्यामुळे इस्लामी संकल्पना व्यक्त होते असा अर्थ काढणे व शहीद म्हणजे 'जिहादमध्ये मेलेला मुस्लिम' असा मुख्य अर्थ काढणे, हे सरळसरळ कट्टर धार्मिक द्वेषाचे लक्षण आहे. अशा संकुचित मनोवृत्तीमुळेच वेळोवेळी स्वतंत्र भारताची जगभर बदनामी होत आहे. एवढेच नाही, तर सावरकरांचे नाव घेऊन अशा भाषाशुद्धीच्या अतिरेकी आग्रहामुळे मराठी भाषेचेही आत्तापर्यंत प्रचंड नुकसान झाले आहे. आज पुण्यातील 'म्युनिसिपालिटी' च्या मराठी शाळांची संख्याही घटू लागली आहे. इंग्रजी भाषेच्या 'ऑक्सफर्ड' शब्दकोशात मराठीसह अनेक भारतीय भाषांमधले शेकडो शब्द आदरपूर्वक समाविष्ट झाले आहेत. म्हणूनच 'शहीद भगतसिंग' या शब्दांनी देशभर निःसंकोचपणे व्यक्त होणारा देशभक्तीचा आदर, तसेच लता मंगेशकर यांच्या 'ए मेरे वतन के लोगों' या गीताने जागवलेली