पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जवाहरलालजींना वाटत होते व तसा प्रस्ताव त्यांनी रावसाहेबांकडे दिला होता असे ऐकले होते. 'ही गोष्ट खरी का?' असे मी शेवटी अच्युतजीना विचारले. त्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाज नव्हता. पण या प्रश्नावर ते मनमोकळे हसले आणि म्हणाले, 'होय, ते खरं आहे. ' 'मग तुम्ही नकार का दिलात?” अच्युतजी म्हणाले, 'इंदिराजी फार महत्त्वाकांक्षी आहेत, हे तेव्हाही दिसत होतं, त्यांच्याशी माझं जमेल, असं मला त्या क्षणी वाटलं नाही, म्हणून मी नकार दिला. ' औचित्याचा भाग म्हणून मी त्यावेळी ह्या प्रश्नाचा वृत्तान्तात समावेश केला नव्हता, पण आज हे आवर्जून नमूद करावेसे वाटते, दशरथ पारेकर, कोल्हापूर (फेब्रुवारी २०१७) एका सांस्कृतिक चळवळीचा शेवट 'सांस्कृतिक समृद्धीसाठी' असे समर्पक, अर्थपूर्ण बोधवाक्य असलेले, गेली तेवीस वर्षे वाचकांना खऱ्या अर्थाने श्रीमंत करणारे 'अंतर्नाद' मासिक स्वरूपात बंद होण्याच्या मार्गावर आहे हे ऐकून धक्का बसला वाईट वाटले. एका वर्षापूर्वीच्या पुण्यातील भेटीत भानू काळे ह्यांनी ह्या बातमीचे सूतोवाच केले होते, पण काहीतरी मार्ग निघेल ह्या आशेपोटी मी ते गांभीर्याने घेतले नव्हते. परंतु काही दिवसांपूर्वी फोनवर झालेल्या चर्चेत संपादकांनी जेव्हा ह्या शक्यतेचा पुनरुच्चार केला, तेव्हा मात्र मन खंतावले, अंतर्नादने आपले आगळे-वेगळे वैशिष्ट्य पूर्वीपासून सातत्याने जपले. बाजारू पद्धत न अवलंबता, गुणवत्तेशी तडजोड न करता सकस, वैचारिक, लालित्यपूर्ण साहित्याचा निर्भेळ आनंद वाचकांना दिला. एकेकाळी सत्यकथा वाचणाऱ्यांचा जसा 'वेगळा' वर्ग होता तसाच 'अंतर्नाद' वाचणाऱ्यांचादेखील एक खास वर्ग निर्माण झाला. हे वाचक संख्येने मोजके असले (कारण भरपूर संख्या असती तर अंतर्नाद बंदच पडले नसते!) तरी दिल्ली, बंगलोर, मध्यप्रदेश, कोकण, अमेरिका, ब्रिटन अशा विविध भागांत ते जगभर पसरलेले होते, मासिकाची समृद्धी अन् श्रीमंती ही बहुतांशी संपादकाच्या वैचारिक श्रीमंतीवर अवलंबून असते. त्या दृष्टीने काळे पती-पत्नींचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अंतर्नादच्या जडणघडणीत अन् संवर्धनात भानू काळे ह्यांच्याइतकाच वर्षा काळे ह्यांचाही हातभार आहे ह्याची अंतर्नादचा लेखक/वाचक ह्या नात्याने मला पुरेपूर जाणीव आहे. अंतर्नादच्या साहित्याची चोखंदळ निवड हे ह्या मासिकाच्या सांस्कृतिक समृद्धीचे खरे रहस्य आहे. कोणे एके काळी सत्यकथेत आपले साहित्य प्रसिद्ध व्हावे असे ज्याप्रमाणे काही लेखकांना वाटत असे, तोच मान अंतर्नादलादेखील गेल्या दोन दशकांत मिळाला हे निश्चित, एवढेच काय, आपले साहित्य स्वीकारले गेले नाही, तरी त्याचे वाईट न वाटता, तो संपादकांचा ग्राह्य अधिकार मानून ही अस्वीकृतीसुद्धा खेळकरपणे, चोखंदळपणे स्वीकारण्याची सवय एव्हाना अंतर्नादच्या लेखकांच्या पचनी पडली आहे! ५०६ निवडक अंतर्नाद या मासिकाच्या मुख्यपृष्ठाची निवड चोखंदळपणे तज्ज्ञांकडून केली जाते, एवढेच नव्हे, तर ते मुखपृष्ठ आस्वादक पद्धतीने समजावून दिले जाते, हेसुद्धा अंतर्नादचे खास आगळेवेगळे वैशिष्ट्य. एरवी सामान्य रसिकांना रंगरेषांतून साकारलेले कलाकौशल्य सहजपणे समजायला जडच जाते. मुखपृष्ठच नव्हे तर 'प्रतिसाद' ह्या सदरातील वाचकांचा पत्रव्यवहार हाही केवळ औपचारिक रिस्पॉन्स न राहता त्याला वैचारिक चर्चेचे व्यासपीठ देण्यात संपादकांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळे संपादकांवरसुद्धा मोकळी, स्पष्ट टीका (जशीच्या तशी काटछाट न करता) ह्या 'प्रतिसाद'मध्ये प्रसिद्ध झाली आहे. टीकेबरोबरच मूळ लेखकाचे उत्तरदेखील प्रसिद्ध करून इथे दोन्ही पक्षी न्याय दिला गेलाय. त्यामुळे ह्या वादविवादाला गेल्या दोन दशकांत अविचारी भांडणाचे स्वरूप कधीच आले नाही. उलट प्रतिसादमधील पत्रे वाचणे हीदेखील बौद्धिक मेजवानी ठरली. भानू काळे ह्यांच्या संपादक-लेखक ह्या नात्याच्या जपणुकीविषयी खास उल्लेख करणे गरजेचे आहे. पाठवलेल्या साहित्याची पोच न देणे, महिनोन्महिने निर्णय न कळवणे, अंक, मानधन न पाठवणे असे प्रकार लेखकाच्या अनुभवाला येतात. या संदर्भात 'झाकली मूठ सव्वा लाखाची' म्हणतात. पण भानू काळे ह्यांच्या संपादकीय कारकीर्दीला एक प्रोफेशनल टच आहे. ●अंतर्नादमध्ये कवितेलासुद्धा तीन अंकी मानधन दिले जाते, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. प्रश्न पैशाचा नसला तरी लेखकाच्या बौद्धिक संपदेचा सन्मान करण्याचा आहे तो ह्या संपादकांनी निश्चितच केला आहे. अंतर्नादची छपाई, मासिकाचे वितरण कधीही दिरंगाईने झाले नाही. दरमहा एक तारखेच्या आतच हा अंक वाचकाच्या हाती पडतो. लेखकाची प्रत, मानधन हेदेखील तत्परतेने पाठवले जाते. हे सारे आजकाल दुर्मिळ झाले आहे, म्हणून मुद्दाम नमूद करावेसे वाटले. यास्मिन शेख या वयोवृद्ध तज्ज्ञ अंतर्नादच्या व्याकरण सल्लागार या नात्याने प्रत्येक लेखनाचे व्याकरण तपासतात. लेखकाला फोन करून शंकानिरसन करतात. एवढा काटेकोरपणा, परफेक्शनविषयी तळमळ आजकाल क्वचितच अनुभवास येते. त्यामुळे अंतर्नादचे अन् संपादकांचे वेगळेपण उठून दिसते. अंतर्नाद बंद होऊ नये म्हणून कुणाला नेमके काय करता येईल हा वेगळा चर्चेचा विषय, खरे तर, मराठी वाचणारे काही काळाने किती उरतील हासुद्धा चिंतेचाच विषय आहे. कारण नव्या पिढीचे सगळेच काही बदलले आहे. भाषादेखील! तरीपण अंतर्नाद बंद होण्याचे दुःख आमच्यासारख्यांना होणारच. ह्या दुःखाला सांत्वन नाही हे माहिती असूनसुद्धा. ( अंतर्नादच्या संदर्भात गेल्या काही दिवसांत अनेक जणांनी पत्रे पाठविली. त्यातील हे एक पत्र प्रातिनिधिक म्हणून प्रकाशित करत आहोत.) डॉ. विजय पांढरीपांडे, हैद्राबाद (दिवाळी २०१७)