पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आनंद होत असला, तरी दुसऱ्या पातळीवर सदर लेखनाच्या रेट्यामधून वैयक्तिक जीवनावर होत असलेले परिणाम त्यांच्यापुढं मोकळेपणानं मांडले. 'अवधान' थांबवायचा निर्णय त्यांना कळवून टाकला. लिहिण्याचा आनंद इतके दिवस घेतला, आता न लिहिण्याचा आनंद घेऊ असा मनात विचार आला. सुटका झाल्यासारखं वाटलं. (कदाचित वाचकांनाही माझ्याप्रमाणेच सुटका झाल्याप्रमाणे वाटलं असेल.) हे निरोपादाखलचं पान 'अवधान' मधल्या लेखांचा आढावा घेण्यासाठी वापरायचं नाही, हे आधीच ठरवलं होतं. बौद्धिक व्यासंगाबद्दल माझी ख्याती नाही, हे 'अवधान च्या वाचकांना सांगायची गरज नाही. दर महिन्याला त्याचा प्रत्यय त्यांना येतच होता. एका अनपढ व्यक्तीच्या हाती एक स्तंभ संपादकांनी इतका दीर्घ काळ चालवायला कसा दिला, याचं अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. स्वत:च्या लेखन गुणवत्तेबद्दल मी स्वतः काही चांगलं- वाईट बोलणं अश्लीलच ठरेल. एक मात्र सांगावं वाटतं, वैचारिक सुस्पष्टता हे 'अवधान चं वैशिष्ट्य कधीच नव्हतं. वैशिष्ट्य असलंच, तर वैचारिक अस्पष्टता हे होतं. सुरुवातीला विषय एका विशिष्ट अंगानं मांडायचा या उद्देशानं मी लिहायला सुरुवात करत असे, पण लिहिता लिहिता विषयाच्या अनेक बाजू दिसायला लागत. सुरुवातीला या प्रकारानं गोंधळ उडायचा. मग विचार केला, की जेवढ्या बाजू दिसताहेत तेवढ्या सगळ्या मांडाव्यात. मनात गोंधळ असेल तर तो जसाच्या तसा कागदावर उतरवावा. काय हरकत आहे? नाहीतरी, आज सगळ्या विचारप्रणालींमध्ये, मूल्यव्यवस्थेमध्ये किती वैचारिक अराजक माजलं आहे समाजजीवनातलं हे अराजक लेखात उतरलं तर त्यात गैर वाटायचं कारण काय ? परिणामी लेखात वैचारिक विस्कळीतपणा येत गेला. विस्कळीतपणा हाच लेखाचा मुख्य विषय असल्याच्या थाटात मी तो मिरवला. एक आग्रहानं सांगितलं पाहिजे, 'अवधान मधले विषय आणि विचार बरे वाईट कसेही असले तरी, ते मांडण्यामागे प्रामाणिकपणा असायचा. खरं तर, प्रामाणिकपणा एवढं एकच भांडवल अवधान लिहिताना माझ्यापाशी असायचं. सदर लिहिण्यासाठी मला ते पुरेसं वाययचं, 'अवधान मधून आपल्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन लिहायचा माझा प्रयत्न असे. प्रत्यक्षात लेख बुद्धीच्या अलीकडे येऊन थांबत असे. एखादा अगदी नवा विषय हाताळला, की त्या विषयाला आपण किती न्याय दिला याची छाननी करण्यापेक्षा आपण नवा विषय हाताळला, याचंच समाधान मला वाटत असे. अल्पसंतुष्टांना नैराश्य येण्याची शक्यता कमी असते, हे लक्षात आल्यापासून मी कायम अल्पसंतुष्ट राहायला धडपडतो आहे. पण नेमक्या याच वृत्तीमुळे विषयाच्या खोलात शिरायचा मी प्रयत्न केला नसावा, माझ्या लिखाणावर उथळपणाचा शिक्का माझेच काही मित्र मारायचे. त्यांच्या टीकेत तथ्य असावं. लेखात अनेक विषयांना उडता स्पर्श असायचा. आपल्याप्रमाणे ५० निवडक अंतर्नाद वाचकांच्या मनात या मुद्द्यांवर विचार तरंग उमटावेत, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी त्यावर विचार करून उत्तरं शोधावीत, अशी माझी भूमिका राहिली. एखाद्या प्रश्नावर सर्वमान्य असं उत्तर शोधून काढणं मला आजच्या कोलाहलात कठीण वाटतं, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी बुद्धी आणि व्यासंग दोन्ही बाबतीत कमी असलो, तरी मला बुद्धिमान मित्रपरिवार लाभलेला आहे. या बाबतीत मी मित्तल, अंबानींहून श्रीमंत आहे. विविध प्रश्नांवर या माझ्या बुद्धिमान मित्रांत अखंड चर्चा चालू असतात. त्या नुसत्या ऐकल्या तरी आपण समृद्ध होऊन जातो. 'अवधान' साठी विषय पुरवण्याचं अप्रत्यक्ष काम या चर्चांनी केलं आहे. हे काहीसं आभारप्रदर्शनासारखं होत असेल तर त्याला माझा नाइलाज आहे. समविचारी वाचकांइतकेच माझ्या विचारांशी सहमत नसलेल्या वाचकांचे आभार मानायला हवेत. सर्वांनीच काही त्वेषानं शाब्दिक हल्ला केला नाही. अनेकांनी माझे वेडेवाकडे विचार सहन केले. काहींनी या बालीश, खुळ्या माणसाच्या नादी कशाला लागा म्हणून दुर्लक्ष केलं. इतरांनी एका असंस्कृत माणसाच्या हाती स्तंभ सोपवल्याबद्दल संपादकांना दोषी धरलं. असो. प्रत्यक्षात 'अंतर्नाद' च्या संपादकांशी माझं फार कमी मुद्द्यांवर एकमत आहे. पण दुसऱ्यांच्या विचारांचा आदर राखण्याचा दुर्मीळ गुण त्यांच्यापाशी आहे. मला हा फार मूल्यवान गुण वाटतो. मी त्यांच्या या गुणाचा विपुल फायदा उठवला आणि बरंच व्रात्य, उनाड लेखन केलं. माझ्या उद्घट लेखनशैलीनं दुखावलेल्या वाचकांचा रोष संपादकांना सहन करावा लागतोय, यानं मी अस्वस्थ होत असे. वाचकांच्या पत्रांनी त्यांना कमी मनस्ताप झाला नसेल, पण तरीही संपादकांनी मला एखाद्या मोठ्या प्रतिष्ठित लेखकाप्रमाणे कमालीच्या आदरानं वागवलं. माझ्या कोणत्याही मजकुरावर त्यांनी कधी सेन्सॉरची कात्री चालवली नाही. लिखाणातला एखादा शब्द बदलायचा झाला तरी ते त्यासाठी फोनवरून माझी परवानगी घेत. माझ्या मूर्तिभंजक लेखनानं नाराज झालेल्या एका वाचकानं मध्यंतरी संपादकांना आर्थिक धमकी द्यायचा प्रयत्न केला होता. "मी तुम्हांला पंचवीस सदस्यांची वर्गणी पाठवतो आहे. 'अवधान' सदर चालू ठेवणार असाल तर मात्र मला हा निर्णय रद्द करावा लागेल,” असं त्यांनी म्हटलं होतं. संपादकांनी आर्थिक लाभ नाकारला; त्या वाचकाच्या धमकीला भीक घातली नाही. आता त्या सद्गृहस्थांनी पंचवीस-तीस सदस्यांची वर्गणी पाठवायला हरकत नाही. (जानेवारी २००८) (यानंतर पुन्हा अंतर्नादच्या वाचकांसाठी अवधूत परळकर यांनी अनवधान या शीर्षकाचे आणखी एक सदर लिहिले. त्यातील एक लेख पुढील पानावर)