पान:निवडक अंतर्नाद.pdf/५११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. अंतर्नादचा पूर्णविराम रवी गोडबोले 'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे २०२० मध्ये वर्षानुवर्षे सहजगत्या घडणाऱ्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत. आपल्याकडची पंढरीची वारी असो किंवा जपानमधे होऊ घातलेले ऑलिम्पिक; मग सांस्कृतिक उपक्रम होणे तर दूरच राहिले. पण या सगळ्यात एक गोष्ट सुदैवानं चांगली झाली. ती म्हणजे ज्याला आधुनिक महाराष्ट्राची समृद्ध परंपरा म्हणता येईल असे दिवाळी अंक बहुतांशी प्रकाशित झाले आणि ते डिसेंबरच्या सुरुवातीला मला अमेरिकेतल्या अॅटलांय इथे घरपोच मिळालेदेखील! त्यामुळे घरकैदेने पुरत्या त्रासलेल्या या वाचकाला भरपूर नवीन सामग्री मिळाली. मोठ्या उत्साहानं 'अंतर्नाद' चा अंक वाचायला घेतला खरा, पण संपादकीय वाचतानाच हा शेवटचा अंक याची जाणीव प्रकर्षानं झाली. अर्थात हे माहीत होतंच, परंतु शेवटी ते घडलं •आणि खूप खिन्न झालो. अंतर्नादनं ऐन रौप्यमहोत्सवी वर्षांत अशी ग्रेसफुल एक्झिट घ्यावी ही चोखंदळ मराठी वाचकांच्या दृष्टीनं एक लक्षवेधी व दुर्दैवी घटना आहे. आणि तिची योग्य दखल घेतली जावी याच एका भावनेनं हे मनोगत लिहीत आहे. माणूस खिन्न झाला की जुन्या चांगल्या आठवणींत रमतो हे खरं, त्यामुळे माझं मन अंतर्नादच्या आठवणी काढत बरीच वर्ष मागे गेलं, तसं पहिलं तर वृत्तपत्रं आणि मासिकं यातलं बरंचसं चांगलं वाचन हे योगायोगानं होत असतं. मी पंधरा वर्षांपूर्वी मद्रासला राहात असताना मुंबईला भेटायला आलो की वडील रविवार पुरवण्यांची जपून ठेवलेली कात्रणं मला देत असत. (त्यांना वाटे, मला तिथे मराठी वाचायला कसं मिळणार?) एका पुरवणीत संपादकांनी 'बदलता भारत' या पुस्तकातील भानू काळेंचं मनोगतच छापलं होतं. ते मला खूप आवडलंच, पण त्याचबरोबर 'अंतर्नाद' नावाचं मराठी भाषा आणि संस्कृती याला वाहिलेलं एक छोटेखानी मासिक गेली कित्येक वर्षं काळे पती-पत्नी चालवितात हे प्रथमच कळलं. मग तत्परतेने अंतर्नादचा वर्गणीदार होणं आणि त्यातून छापून येणाऱ्या लेखांचा आनंद लुटणं या गोष्टी ओघाने आल्याच! आता यंदाच्या दिवाळी अंकाबद्दल. २०२०च्या दिवाळी अंकात गेल्या २५ वर्षांतील काही निवडक लेखन आहे. त्यावर एक नजर फिरवली तरी कितीतरी नावाजलेल्या आणि त्याचबरोबर काहीश्या अपरिचित व्यक्तींना अंतर्नादने कसं बांधून ठेवलं, प्रोत्साहित केलं याचा अंदाज येतो. ही पुनर्भेट संग्राह्य झाली आहेच, आणि त्यामुळेच की काय मीदेखील जपून ठेवलेले जुने अंक परवा चाळत बसलो होतो. आणि जाणवलं की जे लेखन, मोठ्या वृत्तपत्रांत किंवा मासिकांत जागेच्या मर्यादिमुळे वा अन्य कारणांमुळे छापलं जाणं शक्य नव्हतं, ते 'अंतर्नाद च्या संपादकांनी आवर्जून छापलं. उदा. पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र राघवेंद्र जोशी यांच्या 'गाणाऱ्याचे पोर' या पुस्तकातील एक प्रकरण, किंवा ५१० निवडक अंतर्नाद ना. सी. फडके यांच्या कन्येने लिहिलेल्या वडिलांच्या आठवणी. या दोन्ही लेखकांनी मनात साचलेल्या भावनांना मोकळेपणाने वाट करून दिलेली आहे आणखी एक साठवण म्हणजे डॉ. सरोजा भाटे यांचा संस्कृत भाषेतली सौंदर्यस्थळं उलगडून दाखवणारा 'निद्रिस्त परी' हा सुंदर लेख. 'तेलगू मराठी घरोबा हा विजय पांढरीपांडे यांचा लेख. हेरंब कुलकर्णी लिखित 'ग्रामीण दारिद्र्याची शोधयात्रा' किंवा 'मालदीव सोडताना' हे ज्ञानेश्वर मुळे यांचं कथन, कवितेवर संपादकांचं खास प्रेम असावं; इतकी जागा अंतर्नाद कवितेसाठी देत असे. कोणताही अंक चाळलात तर त्यांत जागोजागी कविता दिसतात अगदी जाहिरातीतही! कवितांवर आधारित 'सदरे' वेळोवेळी चालवलेली आढळतात. कविवर्य पाडगावकर कुठलंही मासिक उघडताच त्यातल्या कविता सगळ्यात आधी वाचायचे असं म्हणतात; मला खात्री आहे की त्यांनी 'अंतर्नाद ला उत्तम गुण दिले असणार! मुखपृष्ठावरील चित्रं आणि चित्रकलेवरची सदरं हे इथलं आणखी एक दालन ती लिहिण्यासाठी त्यांनी नामवंत चित्रकारांना लिहितं केलं. मला स्वतःला आवडणारा एक भाग म्हणजे वाचकांचा प्रतिसाद यातली काही पत्र जरूरीपेक्षा अधिकच 'दीर्घ' असली तरी बहुतांशी वाचनीय आणि पोटतिडिकीने लिहिलेली असत. मला वाटतं की अंतर्नाद हा अडीच खांबी तंबू, पहिला खांब म्हणजे हे मासिक निष्ठेने चालवणारे काळे पती-पत्नी, दुसरा वर्गणीदार आश्रयदाते यांचा आणि डगमगणारा अर्धा खांब जाहिरातदारांचा! तरीदेखील मासिक २५ वर्षं नेटाने टिकून राहिलं, हे कसं ? माझ्या मते वर उल्लेखलेल्या वैविध्यपूर्ण गोष्टींबरोबरच संपादकांच्या स्वतःच्या लेखनशैलीचाही त्यात सिंहाचा वाटा आहे. यात वेळोवेळी खाद्य आणि भ्रमंती यावर खुसखुशीत लिहिणाऱ्या वर्षा काळेदेखील आल्या. भानू काळे यांचं संपादकीय म्हणजे वाचकांशी हळुवारपणे केलेलं हितगुजच जणू. याची इतकी सवय होऊन गेली होती, की गेल्या तीन वर्षांपासून मासिक स्वरूपातील प्रकाशन बंद झाल्यानं मला चुकल्यासारखं वाटे, काहीतरी गमावल्यासारखं वाटे! गेली काही वर्षं चरित्रलेखनातून ते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची व सुचवलेल्या मूलभूत उपायांची ओळख करून देताना किंवा विस्मृतीत गेलेल्या समतानंद अनंत हरी गद्रे यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम लोकांपर्यंत पोहोचवताना दिसले. अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेल्या बहुमोल शैक्षणिक कार्याचा त्यांनी फार सुंदर आढावाही घेतल्याचं स्मरतं, हे लेखन संशोधनात्मक असल्याने काहीसं भरीव व माहितीपूर्ण आहे त्यामानाने त्यांचं आधीचं लेखन जास्त सुटसुटीत आणि जास्त आकर्षक झालं आहे. त्यातले विषय