पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काहीसे नैमित्तिक असतीलही, पण लेखन विचार करायला लावणारं, अंतर्नादच्या सुरुवातीपासून २००७पर्यंत वेळोवेळी त्यांनी अंकात लिहिलेल्या काही लेखांचं संकलन 'अंतरीचे धावे' (मौज प्रकाशन गृह) या संग्रहात झालं आहे, त्यातील मला भावलेल्या दोन-तीन लेखांविषयी थोडक्यात! यात जे. आर. डी. टाटा यांच्यावरील एका पुस्तकावरचा एक सुंदर लेख येतो. त्यात जेआरडींनी रुजवलेली व्यवस्थापन शैली, एअर इंडियाबद्दलचं त्यांचं प्रेम आणि पुढे त्यातूनच त्यांच्या वाट्याला आलेली कटुता यावर भानू काळे छान टिप्पणी करताना दिसतात. (आता २०२१ मध्ये आर्थिक डबघाईला आलेली 'एअर इंडिया' टाटा समूहाने जर पुन्हा विकत घेतली तर that will be a sweet justice!) एखादी कंपनी निव्वळ नफ्याइतकंच महत्व सामाजिक बांधिलकी आणि Human Resources या गोष्टींनाही देऊ शकते याचा इथे प्रत्यय येतो. हे मी स्वतः जमशेदपूर व कुर्ग येथे अनुभवलं आहे. काळे स्वतः एके काळी मुद्रण व्यवसायात होते आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. साहजिकच त्यांनी 'इंडिया टुडे' चे सर्वेसर्वा अरुण पुरी यांची वाटचाल फार आत्मीयतेने आणि त्या क्षेत्रातल्या बारकाव्यांसह मांडली आहे. चांगल्या समाजाभिमुख (त्याचप्रमाणे चटकदार) विषयांवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून एक पाक्षिक निघतं आणि निव्वळ अभ्यासपूर्ण लेख व आकर्षकता यामुळे ते दिवसेंदिवस लोकप्रिय होत जातं ही कल्पनाच ८० च्या दशकात करवत नसे! माझं इंग्रजी नियतकालिकं वाचायचं वेडही 'इंडिया टुडे' पासूनचं. पत्रकारांना पुरी यांनी त्यावेळी दिलेल्या सोयी आणि स्वातंत्र्य हे आजही बऱ्याच ठिकाणी मिळत नसेल. शान्ता शेळकेंना त्यांनी वाहिलेली आदरांजली म्हणजे एका अतिशय गुणी व्यक्तीचं मूल्यमापन आहे. शान्ताबाई किती व्यासंगी आणि तितक्याच साध्या आणि भावूक होत्या याची प्रचीती हा लेख वाचताना येते. त्यांचं इंग्रजी वाचन किती चौफेर होतं याची कल्पना त्यांच्या मराठमोळ्या अवताराकडे बघून पटकन येत नसे अशा अर्थाचं काळेंचं प्रांजळ आणि अचूक निरीक्षण मला खूप भावलं! त्याचबरोबर शान्ताबाईंचे जाणवलेले स्वभावविशेष, हरहुन्नरी वृत्तीमुळे त्यांच्या legacyला आलेल्या मर्यादा यावरही काळे स्पष्टपणे लिहितात, अर्थात तेही शान्ताबाईंवरच्या जिव्हाळ्यापोटीच! हे लेख वाचले की काळे हे काय ताकदीचे लेखक, संपादक आहेत याची कल्पना येते आणि लगेच जाणवते की ते हस्तिदंती मनोऱ्यात बसून लेख लिहिणारे संपादक नाहीत. अर्थकारण, राजकारण, जागतिकीकरण आणि त्याचे मराठी समाजावर व भाषेवर होणारे बरेवाईट परिणाम हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे व त्यात ते खरे रमतात. आणि ते करताना उसने ढोंग आणण्यापेक्षा सुसंस्कृत, शहरी व मध्यमवर्गीय या आपल्या कक्षा ते सोडत नाहीत. बहुतांशी स्वतः प्रवास किंवा शोधयात्रा करून अनुभवलेल्या गोष्टींवरच ते मोकळेपणे लिहितात. त्यात राणा भीमदेवी थाटाचं लेखन नसतं किंवा 'मी सांगत नव्हतो का?' ही आत्मप्रौढीही नसते. आपला मुद्दा माहितीच्या आधारावर ते सभ्यपणे पण नेटाने मांडत राहतात. आज 'अंतर्नाद' चा प्रवास थांबल्यावर काळे यांनी २००५ मध्ये लिहिलेल्या 'अंतर्नादची दशकपूर्ती: थोडे प्रकट चिंतन' या लेखाचा उल्लेख करणं उचित ठरेल. हा लेख म्हणजे एक छोटे मासिक चालवताना, संपादन करताना येणाऱ्या अडचणी, परंतु त्याचबरोबर मिळणारं आंतरिक समाधान यावर मोकळेपणे केलेलं भाष्यच, मी वाचलेल्या चिंतनपर लेखांपैकी तो एक सर्वोत्तम लेख आहे, आणि मुख्य म्हणजे त्यात कुठेही त्यागाचा, अन्याय झाल्याचा सूर नाही! आपण जाणीवपूर्वक एक कार्ययज्ञ करतो आहोत आणि ते यज्ञकुंड यथाशक्ति पेटतं कसं ठेवता येईल हीच भावना आहे. त्यांना चिंता असलीच तर मासिक स्वबळावर दीर्घकाळ कसं तगेल, कालानुरूप त्यात काय बदल केले पाहिजेत, आणि ते करताना मूळ उद्देश व निष्ठावंत वर्गणीदार यांच्यावर अन्याय होणार नाही ना, याची आहे! 'सत्यकथा' बंद करण्यामागची आपली भूमिका श्री. पु. भागवतांनी अंकातील शेवटच्या लेखात मांडली होती, आणि पुढे 'सत्यकथा' बंद करावं लागलं. तो लेख आणि भानू काळेंचा हा लेख यांत मनाला चटका लागणारं साधर्म्य आहे. ते कटू वास्तव आपण वाचक किंवा आश्रयदाते बदलू शकलो नाही हे आज खेदाने मान्य करावं लागतं. खरं तर आज उडप्याच्या हॉटेलात जेवायला गेलं तर जितकं बिल होतं त्याहून खूप कमी अंतर्नादची वार्षिक वर्गणी होती! मग दहा कोटींच्या महाराष्ट्रात अडीच-तीन हजारांपेक्षा जास्त वर्गणीदार त्याला का मिळाले नसावेत? शेकडो कोटींचे व्यापार करणारी आणि समाजात 'मराठी उद्योजक म्हणून टेंभा मिरवणारी मंडळी अंतर्नादसारख्या उपक्रमांना सढळ हस्ते जाहिराती का देत नसावीत? हे प्रश्न मलाही पडतात. अर्थात आता हे प्रश्न विचारायला किंवा त्यांची उत्तरं शोधायला बराच उशीर झाला आहे! 'अंतर्नाद' हे कसलेल्या तसेच होतकरू लेखकांचं हक्काचं आणि घरगुती व्यासपीठ होतं, ते आज नाहीसं झालं. पण एक विचार मनात आला की 'अंतर्नादने मला काय दिलं?' उत्तर शोधू लागलो तेव्हा जाणवलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनाचा आनंद मुबलक प्रमाणात दिला. चांगलं आणि वेगवेगळ्या प्रकारचं वैचारिक खाद्य दिलं, वरवर अनाग्रही वाटणारं लेखन डोळसपणे वाचायची नवी दृष्टी दिली. फुरसतीने वाचायला आणि लिहायला सुचवलं वाचताना अंतर्मुख व्हायला शिकवलं व चांगल्या • लेखनासाठी आवश्यक अशी स्वानुभव, सभ्यपणा व उदारता ही त्रिसूत्री दिली. हे संचित आपल्यापासून कोणीच हिरावू शकणार नाही. हे काय कमी आहे? एक वाचक म्हणून 'अंतर्नाद बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो, अंतर्नादचे संपादक आणि त्यांचे सहकारी यांनी दीर्घकाळ केलेल्या या अजोड कार्याबद्दल त्यांना मनःपूर्वक सलाम. आणि पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा! (साधना साप्ताहिकाच्या २० मार्च २०२१ अंकातील लेखाचा संक्षेपित भाग) रखी गोडबोले, युएसए / ravigod08@rediffmail.com निवडक अंतर्नाद ५११