पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवडक अंतनद सांस्कृतिक समृद्धीसाठी निवडक अंतनाद मराठी माणसाचे काही खरे नाही. मानदंड ठरावीत अशी ज्योत्स्ना, अभिरुची, छंद, सत्यकथा, किर्लोस्कर, सोबत, माणूस अशी नियतकालिके तो उभी करतो, आणि मग बंदही करतो! महाराष्ट्रात मासिक चालवणे म्हणजे लाखाचे बारा हजार करणे. हे असे का होते? रसिकता कमी पडते की व्यवहार जमत नाही? पण मराठी माणसाचे खरेच काही खरे नाही. कारण हे असे होत असतानाही, एक मराठी माणूस मुंबईमधील आपला सुस्थितीतला व्यवसाय बंद करतो, पुण्याला येतो, 'प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री' म्हणत अंतर्नाद सुरू करतो. त्यानंतरच्या वाटचालीत अंतर्नादने इतिहास घडविला. साहित्यातील नवे-जुने हे वाद मानले नाहीत. पुरोगामी प्रतिगामी असेही काही मानले नाही. वाचकांना बदलत्या भारताचे दर्शन घडविले आणि नव्या जगाची सुरुवात स्वतःपासून होते हे सहजपणे समजावून दिले. चटपटीत पण टाईमपास नव्हे, वैचारिक पण जांभई द्यावयास लावणारे नव्हे असे ललितचिंतनाचे एक प्रसन्न दालन साहित्यविश्वात अंतर्नादने प्रस्थापित केले. निवडक अंतर्नाद म्हणजे त्या वाटचालीतील दमदार, देखणी, अक्षय अक्षरे. - दत्तप्रसाद दाभोळकर, शास्त्रज्ञ आणि शोधपत्रकार महाराष्ट्राची वाचनसंस्कृती, अभिरुचीसंपन्नता आणि बौद्धिक मनोरंजन यांत भर घालणारे अंतर्नाद हे मासिक त्याच्या क्षेत्रातले सर्वाधिक लोकप्रिय व सर्वश्रेष्ठ म्हणावे असे होते. वाचकांनी वाट पाहावी, समाजाने मार्गदर्शन शोधावे आणि ज्ञानाने रंजकतेची कास धरावी असा अंतर्नादचा पेहराव आणि अंतर्भाव होता. मासिक म्हणून आज ते काळाच्या पडद्याआड गेले असले तरी अंतर्नाद आणि त्याचे संपादक भानू काळे यांनी मराठीच्या सांस्कृतिक क्षेत्राला दिलेले योगदान कोणाच्याही विस्मरणात जाणार नाही. - सुरेश द्वादशीवार, भूतपूर्व संपादक लोकमत आणि अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ माझ्या साहित्यिक प्रवासात अंतर्नादचे स्थान अद्वितीय आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातही या मासिकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विदेशात असतानासुद्धा मला भारताच्या विविध आयामांचे दर्शन घडवण्याचे काम अंतर्नादने केले आहे. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे तीनही घागे जुळवून मराठी माणसाची अभिरुची संपन्न करत असतानाच साहित्यिक अभिरुचीचे लोकशाहीकरण करण्यातही अंतर्नाद आघाडीवर राहिले आहे. अंतर्नादच्या बंद होण्याने माझ्यासारख्या हजारोंची एक सांस्कृतिक खिडकी बंद झाली आहे. - ज्ञानेश्वर मुळे, सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सुसंस्कृत समाजासाठी निकोप अभिरुचीची गरज असते. तशी अभिरुची विकसित करण्यासाठी झोकून देऊन काम करावे लागते, त्याग करावा लागतो. असा त्याग भानू आणि वर्षा काळे यांनी केला. भानू काळे एक श्रेष्ठ प्रतीचे कादंबरीकार आहेत. परंतु त्यांनी स्वतःचे ललितलेखन बाजूला ठेवून मुक्त विचारांना वाहिलेले अंतर्नाद हे वाङ्मयीन नियतकालिक सव्वीस वर्षे चालवले आणि निकोप वाङ्मयीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निवडक अंतर्नाद हा मराठीचा मौलिक ठेवा ठरावा. - नागनाथ कोत्तापल्ले, लेखक आणि माजी कुलगुरू संपादक, मुद्रक, प्रकाशक : भानू काळे, सी २, गार्डन इस्टेट, नागरस रस्ता, औंध, पुणे ४११००७. संपर्क : ९८५०८१००९१ / bhanukale@gmail.com मूल्य ₹९००/-- प्रकाशन : १ नोव्हेंबर २०२१