पान:निवडक अंतर्नाद.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मी चोवीस तास अवधूत परळकर "पण दिवस मार्केटिंगचे आहेत. स्वतःचं घोडं पुढं दामटवलं नाही, तर आपण शर्यतीत मागे पडू, या विचारानं सगळे भयभीत झाले आहेत. या भयातून नवे अतिरेकी जन्माला येत आहेत. हळूहळू ऐकणाऱ्यांची संख्या कमी कमी होत जाईल आणि एक दिवस जगात स्वतःविषयी बोलणारेच तेवढे शिल्लक राहतील." माझीया मीपणावर पडो पाषाण, जलो हे भूषण नाम माझे... असं जे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय, ते त्यांच्यापुरतं ठीक आहे आपल्याला त्याचा काय उपयोग? भाषणाविषणातून श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी संतांची वचनं ठीक असतात. ज्या शैलीत आपला जीवनव्यवहार चालू आहे, त्या जीवनशैलीत विचारांचा आचारांशी संबंध जोडणं हे काही जमण्यासारखं नाही आपल्याला तुलनेनं विचारांचे यळ कुटणं अधिक सोपं आहे आजच्या परिस्थितीत नाहीतरी एका गालावर चापटी मारल्यावर कोणता ख्रिश्चन आज दुसरा गाल पुढं करतो? तो हातच उगारतो. तेव्हा म्हणेनात तुकाराम महाराज... माझीया मीपणावर पडो पाषाण, आपण थोडेच संतबिंत आहोत! इथं आपलं पूर्ण आयुष्य मीपणावर उभारलेलं. आपल्या मीपणावर पाषाण म्हणजे संपलंच सगळं आपल्या मीपणावर सदा न कदा फुलं पडोत आणि आणि या वर्षावात आपला मीपणाही अधिक फुलून येवो, नाही केला फुलांचा असा वर्षाव कोणी, तर तो आपण स्वतः करू. स्वत:वरच फुले उधळण्याचे स्वतःच स्वतःचा गौरव करायचे उद्योग देशात सध्या जोरात चालू आहेत. आजकाल जो भेटतो, तो स्वत:बद्दल बोलत राहतो. आणि बोलण्यातून या ना त्या प्रकारे सतत तो स्वतःचा मोठेपणा मिरवत राहतो. सारखं स्वत:बद्दल बोलणारी ही माणसं वात आणतात' असं परवा एक जण मला लोकलमध्ये सांगत होता आणि बघता बघता तो स्वत:विषयी कधी बोलायला लागला, त्याचं त्याला कळेना. त्याची बडबड त्याचं उतरायचं स्टेशन येईपर्यंत अथक चालू होती. स्वत:चं गुणगान करताना कधीच थकवा येत नाही. तो मला हेच सांगत होता. स्वपुराण लावणाऱ्या बोअर मंडळींपासून आपण कसे वेगळे आहोत, लहानपणापासून आपण कसे वेगळ्या वातावरणात वाढलो; त्यामुळे स्वतःविषयी कमी बोलायची वृत्ती आपल्यात कशी भिनली, वगैरे सगळं तो मला पटवून देत होता. आणि ही फक्त परवाची गोष्ट नाही; काल तेच घडलं, आज तेच, उद्याही तेच घडणार आहे. रोज अशी माणसं भेटतात. आपला हात हातात घेऊन सांगत राहतात - आपण आपल्या क्षेत्रात किती हुशार आहोत, बाहेर आपल्याला किती डिमांड आहे, ऑफिसात आपल्याशिवाय कोणाचं कसं काही चालत नाही; आपल्या कामानं मॅनेजमेंट कशी इम्प्रेस झाली आणि आपल्याला कशी भराभर प्रमोशन मिळत गेली. प्रॉब्लेम कितीही कॉम्पलिकेटेड असले, तरी आजवर आपण ते कसे चुटकीसरशी सोडवले आहेत... या मंडळींचं हे सर्व आपल्याला निमूट ऐकावं लागतं. आपल्या विनयशीलतेविषयीदेखील ते छाती फुगवून सांगतात की... आपण इतके थोर नि कर्तृत्ववान असताही आपल्याला आपल्या थोरपणाचा गर्व कसा नाही; इतरांप्रमाणे आपल्या हुशारीचा, कर्तृत्वाचा डांगोरा पिटायला आपल्याला अजिबात आवडत नाही, हे सगळे लहानपणापासूनचे संस्कार आहेत, वगैरे... आपण कान उघडे ठेवून आणि तोंड बंद करून ऐकायचं फक्त. आपला जन्म ऐकण्यासाठी झाला आहे, त्यांचा बोलण्यासाठी. शाहरूख आणि सलमान खानच्या हिंदी सिनेमाइतकाच, सतत स्वत:बद्दल बोलत राहण्याचा हा प्रकार आज आपल्या देशात कमालीचा लोकप्रिय आहे. बोलणाऱ्यांसाठी सुखदायक, ऐकणाऱ्यांसाठी तापदायक प्रकार प्रकारच म्हटलं पाहिजे याला; विकार नाही. आपल्या देशातल्या सत्तर टक्के लोकांची जी सवय आहे; जी जीवनपद्धती आहे, तिला विकार कसं म्हणून चालेल? • राजन खान या आमच्या हरहुन्नरी लेखक मित्रानं दोनेक वर्षांपूर्वी मराठी साहित्यिकांसाठी एक कार्यक्रम ठेवला होता. 'मी आणि माझे साहित्य या विषयावर साहित्यिकांनी बोलावं, अशी ती कल्पना होती. आमच्या मित्रवर्तुळानं त्याला 'हा कसला विषय ठेवलास' म्हणून छेडलं. त्यावर राजन म्हणाला, "अरे, मी पाहिलंय, कोणताही विषय द्या, माइकजवळ उभे राहिले, की हे आपले साहित्यिक शेवटी स्वतःबद्दलच बोलत राहतात. " राजरोस स्वतःचं गुणगान करायला स्वतःच्या कामगिरीचे निःसंकोच पोवाडे गायला 'आत्मचरित्र' नावाची एक छान युक्ती साहित्यिक मंडळींनी शोधून काढली आहे. आपल्या थोरपणाच्या, आपल्या पराक्रमांच्या संकटांवर व शत्रूंवर आपण मिळवलेल्या विजयांच्या खऱ्या खोट्या कहाण्या तपशिलांसह आत्मचरित्रात निवडक अंतर्नाद ५१