पान:निवडक अंतर्नाद.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग्यवती कविता दत्ता हलसगीकर समर्पणाची, दातृत्वाची, काहीसं निर्मोही होण्याची आणि परतत्त्वस्पर्शाची भावना जसजशी गडद होत चालली तशी तशी कवितेची ओळ अगदी सहजपणे सुचत गेली. शब्दांना माझा भाव कळला असावा. दोऱ्यात फुलं ओवली जावीत तसे अनुकूल शब्द येत गेले आणि कविता लिहून झाली. दैनिक सकाळचे माजी कार्यकारी संपादक श्री. अनंत दीक्षित यांनी 'सकाळ' मध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचा समारोप माझ्या एका कवितेतील शेवटच्या चार ओळींनी केला होता. तो लेख माझ्या वाचनात आला होता. एके दिवशी 'अंतर्नाद' मासिकाचे संपादक श्री. भानू काळे यांचा मला फोन आला. मी चकित झालो. या मासिकात माझ्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या, पण माझी संपादकाची ओळख नव्हती. फोनवरून ते म्हणाले, "सकाळमधील लेखातल्या तुमच्या चार ओळी आवडल्या पण ही पूर्ण कविता फोनवरून सांगा.” मी त्यांना ती कविता सांगितली आणि विचारले, "कशासाठी हवी आहे कविता?” "नंतर कळेल,” एवढंच ते उत्तरले. दोन महिन्यांनी अंतर्नादचा मार्च २००१ महिन्याचा अंक घरी आला. वेष्टन उघडून पाहतो तर माझी उंची ही कविता गुलाबी रंगात मोठ्या टाइपात चक्क मुखपृष्ठावर झळकलेली अंतर्नादसारख्या एका दर्जेदार अंकावर माझी कविता पाहून झालेला आनंद उरी पोटी मावेना, अंतर्नादचा वाचक रसिक, आस्वादक आणि चोखंदळ. मुखपृष्ठावरची माझी कविता वाचून वाचकांनी ती आवडल्याचं पत्रांतून, फोनवरून कळवलं. पत्रांचा तर नुसता पाऊस पडत होता. पसंतीची ही पावती मोठी सुखकर असते. कुंडीतल्या फुलझाडाला तांब्याभर पाणी घातलं तर झाड मुळापासून पानाफुलांपर्यंत सतेज टवटवीत होतं. तसं माझंही होतं होतंच, आजवर लिहिलेल्या कवितांना वेळोवेळी प्रतिसाद मिळतच होता; पण 'अंतर्नाद मध्ये ठळकपणे प्रसिद्ध झालेल्या या कवितेनं मला मराठी मुलखात खूप दूरवर नेलं. एके दिवशी मु. पो. जांभूळपाडा, ता. सुधागड, जिल्हा रायगड इथून शिंत्रे यांचा फोन आला, ते म्हणाले, "आम्ही या गावात बेघर मुलांसाठी एक आश्रम चालवीत आहोत. आश्रमात २४ मुलं आहेत. हा आश्रम एस. टी. स्टँडच्या समोर आहे लोकांची सारखी ये-जा असते. मनात एक विचार आला की 'अंतर्नाद वरची तुमची कविता मोठ्या फलकावर रंगवून आश्रमाच्या आवारात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावी. ही कविता प्रतिमांच्या स्वरूपात आहे आणि जगण्याचं प्रयोजन सहजपणे या कवितेत संदेशरूपानं दिलं आहे तुमची परवानगी असेल तर ही कविता फलकावर येईल.” मी त्यांना अनुमती दिली. काही दिवसांनी मी पुण्यात शिंत्रे यांना भेटलो. त्यांनी मला जांभूळपाड्याला नेलं. फलक दाखवला. तेव्हा माझं शब्दरूप सोला या कवितेच्या माध्यमातून जांभूळपाड्यासारख्या गावातल्या आश्रमापर्यंत पोचलो याचा मनोमन आनंद झाला. शिंत्रे म्हणाले, "ठळक अक्षरात असलेली ही तुमची कविता वाचून लोकांनी स्वयंस्फूर्तीने देणग्या दिल्या आहेत. काही दिवसांत या छोट्या वास्तूचं रूपांतर सर्व सुखसोयींनी युक्त अशा मोठ्या वास्तूत होईल.” आणि सांगायचं म्हणजे आज तीन मजली उंच आणि विस्तृत आश्रमशाळा तिथं उभी आहे. या वास्तूच्या प्रवेश समारंभाचं निमंत्रण त्यांनी मला पाठवलं आणि कार्यक्रमाचं स्वागतगीत लिहून पाठवण्याची विनंती केली. मी गीत पाठवलं. आपल्या कवितेमुळं एका पवित्र कार्याला हातभार लागला याचं समाधान मला मिळालं. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेनं ही कविता त्यांच्या दिवाळी भेटकार्डासाठी घेतली. अनेक बँकांनी काही सामाजिक संस्थांनी ही कविता शुभेच्छापत्रांसाठी घेतली. रोटरी क्लबसारख्या संस्थांनी त्यांच्या अधिवेशनात या कवितेचं वाचन केलं. सोलापूरजवळ कारंबा या गावी वेश्यांच्या मुलामुलींचं पुनर्वसन व्हावं यासाठी 'स्नेहालय' ही संस्था काम करते. इथं २१० मुलं-मुली आहेत. या संस्थेच्याही आवारात ही कविता ठळकपणे फलकावर लावली आहे. नुकताच मी पुण्यात आलो तेव्हा सोलापूरचा एक तरुण भेटला. तो म्हणाला, "बाबा आमटे यांच्या आनंदवनात परवा जाऊन आलो. तिथं मोठ्या काचेच्या फलकाआड एका बोर्डवर तुमची ही कविता पाहिली आणि आपल्या गावच्या कवीची कविता योग्य ठिकाणी आली याचा आनंद झाला.” मला हे माहिती नव्हतं, ऐकून किती बरं वाटलं! निवडक अंतर्नाद ५३