पान:निवडक अंतर्नाद.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उंची ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा प्राक्तनाच्या अंधारात प्रकाशाचा गाव न्यावा. मन थोडे ओले करून आतून हिरवे हिरवे व्हावे मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे. आभाळाएवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना वरती उचलून घ्यावे. - दत्ता हलसगीकर मला कळलेली माझी कविता पोचलेली ही ठिकाणं, आणखीनही कुणी कुणी कुठं कुठं या कवितेची दखल घेतली असेल, त्या अज्ञात परिसरात माझं नाव कवितेसह पोचलं असेल. एखादी कविता कशी भाग्यवती असते! तिच्या आशयसौंदयनं वाचकाच्या मनात करुणेचा ढग होऊन ओथंबणारी, त्याला कृतिशील करणारी. ही कविता कशी सुचली हे सांगायला मला आवडेल. माझ्या घराण्यात अनंताचं व्रत आहे. अनंत चतुर्दशीला अनंत दोरकाची पूजा झाल्यावर अनंताची पोथी गेली काही वर्षं वाचतो. या पोथीत एक कथा आहे. कथा मोठी आहे. माझ्या कवितेच्या संदर्भापुरता आवश्यक भाग तेवढा सांगतो. या कथेतील कौंडिण्य ऋषी भीषण दारिद्र्यानं हताश होतो आणि देहार्पण करण्यासाठी अरण्यात जातो. तिथं त्याला फळांनी ५४ निवडक अंतर्नाद लगडलेलं एक डेरेदार उंच झाड दिसतं, पण अवतीभवती पक्ष्यांचा किलकिलाट असताना या झाडावर मात्र एकही पक्षी उतरलेला त्याला दिसत नाही. त्याला आश्चर्य वाटतं. पुढं आणखीन काही काही तो पाहतो पण त्याच्या लक्षात राहतं ते पक्ष्याविना उभं असलेलं हे फळसमृद्ध झाड. त्याला काही वेळानंतर ईश्वराचं दर्शन होतं. तेव्हा तो देवाला विचारतो, "मी ते असं असं झाड पाहिलं, याचा अर्थ काय?” देव म्हणतो, "एक विद्वान गृहस्थ होता. महापंडित बहुश्रुत, त्यांनी आपली अवगत विद्या कुणालाच दिली नाही, त्या विद्येच्या घमेंडीत तो जगला आणि मरून गेला. हे झाड म्हणजे गतजन्मीचा पंडित होय, फळं आहेत पण किडकी, या फळांचा ना झाडाला ना इतर कुणाला उपयोग. म्हणून वत्सा, आपल्याकडे जे काही असेल ते अंशरूपानं आपण ज्यांना गरज असेल त्यांना द्यावं, दिल्यानं कधीही कमी होत नाही, उलट वाढतं, पाण्याच्या आडातून एक पोहरा पाणी शेंदून घेतलं तर झऱ्यातून सा पोहरे पाणी पुन्हा आडात येतं. उदार मनानं देत राहणं हा आपला स्वभाव झाला पाहिजे, " हा उपदेश केवळ कौंडिण्यऋषीपुरता नव्हे तर सर्वांसाठीच आहे, असं मला ही कथा वाचल्यावर वाटलं. मी विचार करायला लागलो तेव्हा डोळ्यापुढं आलं अंगणातलं पारिजातकाचं झाड. रात्री पांढऱ्या केशरी फुलांनी गच्च डवरलेलं आणि सकाळी उठून पाहतो तर अंगणात फुलांचा सडा टाकून मोकळं झालेलं. पुन्हा रात्री उत्फुल्ल होणारं, फुलांचा सडा हा अनुभव होता; पण त्यापेक्षा उपदेश होता. पुरुषार्थानं शक्य तेवढं प्राप्त करावं, समृद्ध व्हावं पण केवळ स्वतःच्या जीवनाचा उत्सव न करता जे सुखापासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत काही पोहोचतं करावं, त्यांच्या माळरानावर काही उगवून यावं, झाडं पंचमहाभूतांतून जीवनरस घेतात, अंकुरित, पल्लवित, पुष्पित आणि सुफलित होतात, सहवासात ● येणाऱ्यांना आपली सावली आणि फळं देतात, देण्याचंही एक आंतरिक समाधान असतं. समर्पणाची, दातृत्वाची काहीसं निर्मोही होण्याची आणि परतत्त्वस्पर्शाची भावना जसजशी गडद होत चालली तशी तशी कवितेची ओळ अगदी सहजपणे सुचत गेली. शब्दांना माझा भाव कळला असावा. दोऱ्यात फुलं ओवली जावीत तसे अनुकूल शब्द येत गेले आणि प्रतिमांच्या स्वरूपात ही साधी, सोपी, सहजगम्य कविता लिहून झाली. असंख्य रसिकांनी ती आपल्या संग्रहात ठेवली हे कळलं, तेव्हा एक विचारठेव त्यांच्याकडे या कवितेच्या रूपानं आहे याचं मला समाधान वाटलं. 'अंतर्नाद'ने माझा अंत: स्वर रसिक वाचकांपर्यंत पोचवला आणि माझ्या या कवितेचे स्वागत झाले. मी भरून पावलो आहे. (जानेवारी २००९)