पान:निवडक अंतर्नाद.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कवितेची सुरुवात हेमंत गोविंद जोगळेकर मुंबई आयआयटीमधून केमिकल इंजिनियर झालेले व नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत अनेक वर्षे शास्त्रज्ञ म्हणून असलेले हेमंत जोगळेकर हे अंतर्नादच्या वाचकांना चांगले परिचित आहेत. अगा कवितांनो (जानेवारी २००५ ते दिवाळी २००५) आणि अगा कवींनो (जानेवारी २०१० ते जून २०११) या त्यांच्या अंतर्नादमधील दोन लेखमालांतून त्यांची काव्यविषयक सूक्ष्म जाण दिसलीच होती. पुन्हा कविता ही त्यांची नवी लेखमाला या अंकापासून सुरू करत आहोत. कवितेची सुरुवात बहुधा कवितेच्या शीर्षकाने होते. 'बहुधा ' असे मी म्हणतो, कारण कधी कधी कवी आपल्या कवितेला शीर्षक देतच नाहीत. तेव्हा कवितेची पहिली ओळच कवितेच्या शीर्षस्थानी येते. कधी कविता प्रसिद्ध करणारे नियतकालिकांचे संपादकच कवितेला शीर्षक देतात. सुरुवातीला मीही माझ्या कवितांना शीर्षके देण्याच्या बाबतीत उदासीन होतो. या माझ्या सुरुवातीच्या काही कविता मी किर्लोस्कर मासिकाकडे दिल्या होत्या. माझी पहिली प्रकाशित झालेली कविता होती 'मला एकदा पंख फुटले होते. किर्लोस्करचे तेव्हाचे कार्यकारी संपादक ह. मो. मराठे यांनी ती छापताना तिला 'कविता' असे सर्वसमावेशक शीर्षक दिले होते. त्यानंतर त्यांनी छापलेल्या माझ्या 'तेव्हा ना, धूळ गवत आणि खडे माझ्या पायांना थेट गुदगुल्या करीत या कवितेला मी 'बालपण' असे बाळबोध शीर्षक दिले होते. ते बदलून त्यांनी 'तेव्हा ना' असे सार्थ शीर्षक दिले. भले ती कविता बालपणाविषयी असेल! पण तेव्हाच्या गोष्टींबद्दल कवितेच्या निवेदकाला वाटत असलेले अप्रूप आणि 'तेव्हा असे होते असे म्हणताना जाणवणारी ‘आता ते राहिले नाही' ही हुरहूर 'तेव्हा ना ' या शीर्षकातून नेमकी पोचविली जाते. ग्रंथालीने १९८० साली, १९७० ते ८० च्या दरम्यान लिहू लागलेल्या आणि १९८० ते ९०च्या काळात प्रभावी होतील असे संपादकांना ज्यांच्याविषयी वाटते अशा दहा कवींचा संग्रह 'कविता दशकाची' या नावाने काढला. त्यात त्यांनी घेतलेल्या माझ्या दहा कवितांपैकी एक होती : रात्री तू माझ्याजवळ झोपतेस, सकाळी माझ्यासाठी न्याहारी बनवतेस, मी ऑफिसला गेल्यावर माझ्यासाठी डबा भरून पाठवतेस, संध्याकाळी न चुकता मी तुला फिरायला नेतो, वाटेत कुणी भेटले तर तुझी ओळख करून देतो, " ही माझी पत्नी.” मग तू हसतेस. का हसतेस? खरं सांग, का हसतेस? •याही कवितेला मी शीर्षक दिले नव्हते. संपादक मंडळाने असे ठरवले होते की ज्या कवितांना कवींनी शीर्षके दिलेली नसतील त्या कवितांच्या पहिल्या ओळी त्या त्या कवितांची शीर्षक म्हणून द्यावीत. पण माझ्या कवितांवर टिपण लिहिणाऱ्या रमेश तेंडुलकरांनी मला मुद्दाम पत्र लिहून विचारले, "रात्री तू माझ्याजवळ झोपतेस' ऐवजी 'का हसतेस?' हे शीर्षक दिले तर? पहिली ओळ शीर्षकासाठी वापरल्यास वाचकांचा रोख अकारण भलतीकडेच वळेल असे वाटते." त्यांची सूचना अगदी रास्त होती आणि मी ती साभार स्वीकारली. या कवितेचा निवेदक कवितेच्या पहिल्या चार ओळींत त्याची पत्नी रात्रीपासून दुपारपर्यंत त्याच्यासाठी करत असलेल्या गोष्टी सांगतो. नंतर तो इमानेइतबारे पत्नीला घेऊन फिरायला जातो. वाटेत कुणी परिचित भेटल्यास तिची आपली पत्नी म्हणून ओळख करून दिल्यावर तिने उत्तरादाखल स्मितहास्य करणे स्वाभाविक आहे. निवेदकालाच प्रश्न पडतो की 'ती का हसते आहे?' केवळ पत्नीने पण करावयाची कर्तव्ये तिला करायला लावून आपण तिला सहधर्मचारिणीचा दर्जा देत आहोत का? ही त्याला वाटणारी अपराधभावना केवळ त्याला पडणाऱ्या या प्रश्नाने सूचित होते. कवितेला तसे स्पष्ट न सांगता सुचवावयाची असलेली ही गोष्ट 'का हसतेस?' या शीर्षकानेच व्यक्त होते. ( रात्री तिच्या त्याच्याजवळ झोपण्याने नाही!) पहिल्या ओळीपेक्षा ही शेवटची ओळ शीर्षक म्हणून देऊनच हे साधले गेले आहे याच कवितेचा इंग्रजी अनुवाद पुढे 'भारतभवन'ने काढलेल्या समकालीन भारतीय कवींच्या प्रातिनिधिक 'कविभारती २' या संग्रहात समाविष्ट झाला. इंग्रजी अनुवादात तर पहिली ओळ - At night, you sleep with me अधिकच विशिष्ट बनते. मी नवोदित कवी असतानाही मराठीत ही कविता प्रसिद्ध होण्यास काही अडचण आली नाही. पण या कवितेचा हिंदी अनुवाद 'श्याम विमल' या हिंदी कवींनी केला, तो हिंदी नियतकालिकाने 'अश्लील' निवडक अंतर्नाद ५५