पान:निवडक अंतर्नाद.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सय्यद गलाह शंतनू अभ्यंकर "पुढे अफगाणिस्तानात युद्धाचा भडका उडाला. तिथे तालीबानचं राज्य आलं. नजीबला गाडीमागे बांधून रस्त्यात फरफटत नेत ठार मारण्यात आलं. त्याच्या मृतदेहाचे धिंडवडे निघाले. लिंग कापून त्याचा मृतदेह झाडाला लटकवला गेला. सय्यदच्या काळजाचं पाणी पाणी झालं. नजीब हा त्याच्या वडलांचा दोस्त. लहानपणी नजीबच्या हवेलीवर खेळायला गेलेला हा." पुण्यात मेडिकल कॉलेजात शिकत असतानाच्या एका अफगाण वर्गमित्राचे व्यक्तिचित्र. कोण कुठला सय्यद गलाह, अचानक माझ्याच वर्गात माझ्याच बॅचला दाखल होतो काय आणि चांगला मित्र बनतो काय, सारंच जरा वेगळं घडलं. ...आणि आता रोज बातम्या येतात युद्धाच्या, निर्वासितांच्या, छळ छावण्यांच्या क्रांतीच्या आणि प्रतिक्रांतीच्या रोज टी. व्ही. वर चित्रं झळकतात, वर्तमानपत्रात मोठे मोठे फोटो येतात; युद्धात मेलेल्यांचे मारणाऱ्यांचे, मरायला टेकलेल्यांचे, मरायला तयार असणाऱ्यांचे आणि मारण्यासाठी लायनीत उभे केलेले जीव सगळे. असं रोजच छापून येतं म्हटल्यावर रोजच मला सय्यदची आठवण येते. तो वगळता त्याच्या कुटुंबीयांना मी भेटलेलो नाही. पण तरीही युद्धपीडित माणूस, कुटुंब, देश वगैरे म्हटलं की मला आपोआप सय्यद, त्याचं कुटुंब आणि देश आठवतो. तो अफगाणिस्तानचा. मेडिकल कॉलेजला पहिल्या वर्षाला माझ्या वर्गात आला. त्याला हिंदी, इंग्रजीचा गंध नव्हता. त्याची अॅडमिशनच मुळी एक आंतरराष्ट्रीय मामला होता, त्याचे वडील दिल्लीत, अफगाण वकिलातीत, कोणी बड़े अधिकारी होते. अफगाण कम्युनिस्ट पक्षाचे ते एक मोठे नेते होते म्हणे. सय्यदही शाळेत असतानाच रशियात गेला होता शाळेसाठी, लष्करी प्रशिक्षणासाठी आणि कम्युनिस्ट होण्यासाठी! बंदुका, बॉम्ब वगैरे हाताळण्याचं तंत्र अवगत होतं त्याला; कम्युनिझम नव्हतं, भाषा अवगत होत्या रशियन आणि पुश्तू, वडलांची दिल्लीत बदली झाल्यावर तो दिल्लीत आला. भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश रशियाचे बगलबच्चे म्हणून ज्ञात होते. होतेच ते बगलबच्चे, अफगाणिस्तानात नुकतंच सैन्य घुसवलं होतं रशियानं. तिथल्या जनतेच्या मनाविरुद्ध 'क्रांतीच झाली अफगाणिस्तानात त्याला आमचा काय इलाज ?', असा रशियाचा सवाल; आणि 'असल्या छप्पन क्रांत्या बघितल्याहेत असल्या क्रांत्यांचं नेमकं काय करायचं हे आम्हांला चांगलं माहीत आहे, हा अमेरिकेचा आग्रह पण रशियाच्या ह्या आंतरराष्ट्रीय दादागिरीपुढे ब्र काढायची भारताची हिम्मत नव्हती. उलट अफगाण सरकारला मान्यता, तिथल्या सर्व संस्थात्मक ढाच्याला आधार आणि ह्यातून परस्पर पाकिस्तानला शह असंच धोरण होतं. मग यातूनच भारतातल्या ६२ निवडक अंतर्नाद अफगाणी अधिकाऱ्यांच्या सर्व गरजांची काळजी घेणं ओघानंच आलं. मग त्यात त्यांच्या मुलांचीही काळजी आली. मग त्यात त्या मुलांच्या शिक्षणाचीही काळजी आली. आणि येणेप्रमाणे सय्यद माझ्या वर्गात दाखल झाला. पुण्याला कॉलेजला जायचं म्हटल्यावर त्यानं दिल्लीत इंग्रजीचा क्लास लावला होता, दोन महिन्यांसाठी! पहिल्याच दिवशी कॉलेज संपल्यावर मला म्हणाला, 'रूमवर सोड' 'कुठे आहे रूम ?' त्यानं चक्क स्टेशनजवळच्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलचंच नाव घेतलं. मी उडालोच. जिथल्या लाल रुजाम्यावर चालण्याकरिता आमचे पाय आसुसले होते, जिथल्या दारवानाच्या कुर्रेबाज मिश्यांच्या मिजाशीपुढे आम्ही चाचरायला लागायचो अशा त्या हॉटेलात हा गेले पंधरा दिवस राहात होता. कॉलेज सुरू होईपर्यंत म्हणून ही व्यवस्था होती. तो लवकरच होस्टेलवर दाखल होणार होता; झालाच दाखल चार दिवसांत. कुठे ते हॉटेल आणि कुठे आमचं होस्टेल. पण सय्यदनं थोडीसुद्धा नाराजी दाखवली नाही. अगदी सहजपणे तो होस्टेलच्या कुशीत शिरला. गैरसोयी आणि ढेकणांना पुरून उरला. त्याची ही सहनशक्ती अजबच म्हणायची, त्याची रूम होती 'ई' ब्लॉकवर, टॉप फ्लोअरला, पण तो पडीक असायचा माझ्याच रूमवर सक्काळी जॉगिंग, मग 'डी' ब्लॉकसमोर चा, मग लेक्चर, क्लिनिक, डबा, लेक्चर, संध्याकाळी व्हॉलीबॉल, फुटबॉल, रात्री डबा, जर्नल कमप्लीशन, जनरल टवाळक्या.... आणि मग रनिंग रेस! रोज रात्री होस्टेलसमोरच्या रिकाम्या गल्लीत रनिंग रेस व्हायची. रोज सय्यद जिंकायचा, रोज रात्री रबडी पाजायचा आणि झोपायला तेवढा रूमवर जायचा. त्या रबडीइतकंच गाढ मैत्रं जुळलं हळूहळू एकदा सहज त्याचं बँकेचं पासबुक दाखवलं त्यानं, तर त्यातली रक्कम बघून माझे डोळेच फिरले. 'एवढी मोठी रक्कम तू सेव्हिंग खात्यात कशाला ठेवलीस?' असं विचारताच वडलांनी