पान:निवडक अंतर्नाद.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढील पाच वर्षांची तरतूद म्हणून हे पैसे पाठवल्याचं त्यानं सांगितलं, मग आम्हीच दोघांनी बँकेच्या मॅनेजरना भेटून एफ. डी. वगैरे केल्या. एवढ्या मोठ्या रकमेची एफ. डी. बसल्या जागी मिळत्येय हे पाहून त्या मॅनेजरना कृतकृत्य होत होतं. पण आमचं वय, आमची ष्टोरी आणि रक्कम यांचा मेळ बसेना. काबूल, दिल्ली, कॉलेज, पुणे, सय्यद, नोज नॉट इंग्लिश... असं ते बराच वेळ पुटपुटत राहिले. त्यांना भलत्या भलत्या शंका यायला लागल्या. तेवढ्यात सय्यदनं त्याचा तो डिप्लोमॅटिक पासपोर्ट पुढे केला. आधी त्या मॅनेजरना त्यात काही गम्य दिसलं नाही पण आतल्या केबिनमधून त्यांनी कुणालातरी फोन लावला आणि त्यांना त्या पासपोर्टचं महत्त्व उमगलं. तात्काळ किती आणि कशी मदत करू असं झालं त्यांना त्यांनी चहा-बिस्किटं मागवली आणि पुढे एफ. डी. च्या पावत्या द्यायला जातीनं रूमवर आले साहेब, रूमची आणि त्यातील सय्यदची अवस्था पाहून त्यांना आमच्याबद्दल पुन्हा शंका आली असणार! कॉलेज सुरू झालं तेव्हा रशियाने आपल्या फौजा अफगाणिस्तानातून काढून घ्यायला नुकतीच सुरुवात केली होती. ह्य टेकू जाताच तिथलं, नजीबचं सरकार अस्थिर झालं होतं. प्रचंड यादवी माजली होती. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. चिनी आणि अमेरिकन समर्थन असलेल्या मसूदच्या फौजा, पाकिस्तानचा कळसूत्री बाहुला हेकमत्यार आणि अरबी आधाराने लढणारा हक्कानी हे सगळे नजीब सरकार विरुद्ध लढत होते. मधूनच वेळ मिळाला की आपापसांतही लढत होते. हे सगळं समजायचं काही त्रोटक बातम्यांवरून 'टाइम्स' किंवा 'एक्स्प्रेस मध्ये काय कॉलमभर बातमी येईल त्यावरून, सय्यद आसुसलेला असायचा, मायदेशीच्या बातम्यांसाठी. पण मार्ग कोणताच नव्हता. त्याला मग एके दिवशी ब्रिटिश कौन्सिलच्या लायब्ररीत घेऊन गेलो. काही दिवस हा क्रम चालला. तिथल्या आंतरराष्ट्रीय पेपरांत इथल्यापेक्षा जरा जास्त माहिती यायची, पण ते पेपर ब्रिटिशधार्जिणे होते आणि त्यातल्या बातम्या या बंडखोरांच्या बाजूने असायच्या. राष्ट्राध्यक्ष नजीब यांचा उल्लेखच मुळी 'नामधारी अध्यक्ष' असा असायचा. पुढे पुढे नजीब सरकारचा पाडाव स्पष्ट दिसायला लागला, 'क्रूर', 'नादान', 'रशियाच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या सरकारचा धिक्कार, पानोपानी दिसायला लागला. बातम्याही त्रासदायक आणि त्यातली भाषाही क्लेशदायी, ब्रिटिश कौन्सिलच्या भेटी बंदच झाल्या हळूहळू आता टी. व्ही. वरचा प्रणव रॉयचा 'द वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रमच उरला फक्त. अफगाणिस्तानात काही भलं घडतच नव्हतं. दर आठवड्याला बुरं तेवढं ऐकून खालमानेने सय्यद रूमवर परतायचा. पण नजीब तसा चिवट जाता जाता रशियाने त्याला शस्त्रास्त्रांचा भरपूर प्रसाद दिलेला, ह्या जोरावर सरकार तगून होतं. इकडे फर्स्ट इअरची परीक्षा आणि तिकडे जलालाबादेत धुमश्चक्री पेटलेली बंडखोरांनी सर्वशक्तीनिशी हल्ला केलेला. सय्यद विदीर्ण 'मी नापास झालो तर रे? तरीदेखील मैत्री राहील नं आपली ?' परीक्षेआधी त्याचा मला प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड काळजीची काजळी. 'अर्थात' माझं बेसावध उत्तर. 'अरेच्या! मला वाटलं तू म्हणशील, सय्यद, तू नापास कसा होशील? तू पासच होशील!!' सय्यद, तो नापास होणार नाही असा आश्वासक सूर हवा होता त्याला. पण तो पास होणं शक्यच नव्हतं. एक वर्ष तर इंग्लिश शिकण्यातच गेलं होतं. नुकतंच तर त्याला कुठे बऱ्यापैकी इंग्लिश जमायला लागलं होतं. आता येत्या सहा महिन्यांत परीक्षा दीड वर्षांचा सगळा अभ्यासक्रम नेमलेला. तेवढ्यात जुजबी इंग्लिशच्या जोरावर, दीड वर्षांचा अभ्यासक्रम वाचणं, आत्मसात करणं, आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाणं हे अशक्यच होतं. पण सय्यदला मात्र माझ्याकडून आश्वासक प्रतिसाद हवा होता, तो त्याचा हक्क आणि माझी जबाबदारी होती. मी कुठून देणार होतो त्याला विश्वास ? इथे भल्याभल्यांची फाटली होती; पण माझ्या उत्तरानं तो खूप दुखावला गेला. जलालाबादची लाई आश्चर्यकारकरीत्या नजीबनं जिंकली. सय्यद सुखावला. त्या उन्मादात सय्यदनं परीक्षाही मोठ्या आत्मविश्वासाने दिली, पण सय्यद फर्स्ट इयरला लटकला. पहिल्या वर्षी नापास मुलांना सहा महिन्यांनी पुन्हा परीक्षा देता येते. ती पास झाल्यावरच त्यांचं दुसरं वर्ष सुरू होतं. या बॅचला ऑड बॅच म्हणतात. एकदा तुम्ही ऑड बॅचला गेलात की तुमच्या बरोबरच्या मित्रांची संगत आपोआप सुटते. कारण वर्ग, प्रॅक्टिकल, क्लिनिक, परीक्षा ह्या सगळ्याचं वेळापत्रक कधीच जुळत नाही. भेटी-गाठी, एकत्र खेळ, अभ्यास, दंगा हेही मग कमी कमी होत जातं. शिवाय रेग्युलर बॅचचा अहंगंड आणि ऑड बॅचचा न्यूनगंड कमीअधिक प्रमाणात उरलीसुरली मैत्री संपुष्टात आणतो. सय्यद अपेक्षेप्रमाणे ऑड बॅचला गेला, पण तरीही आमची मैत्री मात्र विरली नाही. फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला तो दिवस जगाच्या इतिहासात ऐतिहासिक ठरला. त्या दिवशी जर्मनीची ती कुप्रसिद्ध भिंत छिन्न छिन्न झाली. त्याची मोठी बहीण जर्मनीत होती, पूर्व जर्मनीत तिचा नवरा, अहमद, तिथल्या अफगाण वकिलातीत कोणी अधिकारी होता. तिचे आणि तिच्या चार गोंडस मुलांचे फोटो तो अधूनमधून दाखवत असे. थुईथुई नाचणाऱ्या कारंज्यापुढे थुईथुई नाचणारी ती गोंडस पोरं, त्याची बहीण अगदीच बुरख्यात नाही, पण तोंडावर रुमाल वगैरे बांधून, सय्यद सांगत होता आता त्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबीयांना जर्मनीत राह्मणं अशक्य आहे. जर्मन कम्युनिस्ट स्वीकारार्ह होते पण बाहेरचे कम्युनिस्ट अजिबात नाही. झालंच तसं. महिन्याभरात सय्यद भरल्या डोळ्यांनी रूमवर आला. ही भिंत पाडायला पूर्व जर्मनीतल्या कट्टर कम्युनिस्टांचा विरोध होता. अशाच एका गटाच्या गुप्त सभेसाठी अहमद गेला होता. तिथे विरोधी गटाचे लोक आले, बोलाचाली झाली, प्रकरण हमरीतुमरीवर आले. ह्या भडक माथ्याच्या अफगाणाने खिशातून पिस्तूल काढलं, पण त्या झटपटीत ते दुसऱ्याच कुणीतरी हिसकावलं, आणि पहिल्याच गोळीत याला टिपलं! पुढे पूर्व आणि पश्चिम जर्मनीचं एकत्रीकरण झालं आणि त्याची ती बहीण व तिची चार पोरं जर्मनी सोडून गेली. पोलंडमार्गे फ्रान्समध्ये आश्रयाला गेली; बहुतेक, पण नेमकं काहीच कळत नव्हतं, निवडक अंतर्नाद ६३