पान:निवडक अंतर्नाद.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भयंकर आश्चर्य वाटलं. असा काही दृष्टिकोन असू शकतो, हे त्याच्या गावीही नव्हतं. त्याच्या मते बुरखा ही स्त्रीच्या सौंदर्याला, वयात येण्याला, मादकतेला, पुरुषांना आव्हान देणाऱ्या हालचालींना दिलेली मोकळीद्यकली, दिलखुलास, लाजवाब दाद आहे !! 'तू बुरखा घाल बये, नाहीतर झालोच आम्ही घायाळ, असं सांगणं आहे! 'तुझ्या नखाचं दर्शनही आम्हांला विव्हल करते असं दर्शवणं आहे!! बुरखा ही अभिमानानं मिरवायची चीज आहे. स्त्रीत्वाचं लेणं आहे ते....!!! मी चांगला टराटरा फाडलेला बुरखा सय्यदनं पुन्हा झटक्यात शिवून टाकला होता. हळूहळू कॉलेजमध्ये सय्यद समरसून गेला. लायनी मारण्यापर्यंत त्याची प्रगती झाली. कॉलेज ऑर्केस्ट्राच्या वेळी एक मुलगी त्याला अगदी बिलगून बसली होती. ती घारी, गोरी, अप्सरा त्याच्या मनात भरली होती. त्याला छेडलं तर चक्क लाजला वगैरे, मी म्हटलं, 'अवघड आहे सय्यद तुझं, तिचं घराणं कडक धर्मनिष्ठ वगैरे आहे' म्हणतो कसा, 'मला फक्त मजा करायची आहे आणि तिलाही!' सय्यद ऑड बॅचला गेला आणि वाह्यवत गेला, बहकत गेला. अभ्यासाची संगत सुटली, नवे छंद जडले, नवे फंद पडले. 'क्रॉनिक' (वारंवार नापास) मुलांबरोबर राहून राहून त्याला यात काही गैर वाटेनासं झालं. पण पुढे हेही ग्रहण सुटलं. आपल्या बरोबरीची मुलं आपल्या बरीच पुढे गेलेली पाहून त्याला शरम वाटू लागली. त्यानं मग नेटानी अभ्यास सुरू केला, दरम्यान वडलांची नियमित पत्रं येऊ लागली. ते आता फ्रान्समध्ये होते. कुठल्यातरी संस्थेत प्राध्यापकी करत होते. बहीणही तिथेच होती. पण इतकं सगळं होऊनही सय्यदची आणि कुटुंबीयांची भेट होऊ शकत नव्हती. याचा पासपोर्ट अफगाणिस्तानच्या पदच्युत सरकारने दिलेला, त्या सरकारला युरोपीय देशांची मान्यता नव्हती, आताच्या सरकारचा पासपोर्ट त्याच्याकडे कुठून येणार? असा काहीसा तो तिढा होता. त्याच्या वडिलांनी बराच काळ बराच पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावला, फायनलची परीक्षा पास होताच सय्यद साऱ्या कुटुंबीयांना भेटायला फ्रान्सला रवाना झाला. त्याच्या इतकाच आनंद आम्हां मित्रांनाही झाला. सय्यद आता इंग्लंडमध्ये आहे एका खेड्यात प्रॅक्टिस करतो. आईवडील फ्रान्समध्ये होते. पण तिथलं वातावरण अफगाणांसाठी चांगलं नाही, त्यामुळे आता इराणला आहेत. सय्यदच्या आजोळी. बहिणीने आता एका नायजेरिअन व्यापाऱ्याशी लग्न केलं आहे. ती असते मेक्सिकोत सय्यदची बायको मूळची ऑस्ट्रेलियन, लहानाची मोठी झाली सुदानमध्ये. ह्याला भेटली फ्रान्समध्ये, त्याची दोन गोजिरवाणी पोरं आहेत. तो आणि मुलं मँचेस्टर युनायटेडचे पक्के फॅन आहेत. एकही मॅच चुकवत नाहीत. सारे मला फेसबुकवर भेटतात. येईन म्हणतो कधीतरी कॉलेजच्या गेटटुगेदरला. काबूललाही जाईन म्हणतो. शिवाय इराणला आजोळी, ऑस्ट्रेलियाला सासरी, मेक्सिकोला भाच्यांना भेटायला... असं कुठेकुठे जायचं असतं त्याला... आता कुठेकुठे जातो आणि कधी माझ्याकडे येतो ते बघायचं. माझ्या गावीही यायचं असतं त्याला पुन्हा नदीकाठी गप्पा मारायला. आला की संध्याकाळी आम्ही घाटावर जाऊ नदीत पाय सोडून मनसोक्त गप्पा छाटू नदी वाहत असेल, काठावरच्या गावांना पाणी आणि संस्कृती बहाल करत नदी वाहत राहील. आपल्या स्वतःच्या देशातून, स्वतःच्या गावातून परांगदा झालेल्या सय्यदला नदीनं माझं गावही बहाल केलं असेल. कारण माझी खात्री आहे, सय्यद केव्हाही माझ्याकडे आला, केव्हाही इंग्लंडहून निघाला, तरी तिथून निघताना त्यानं मुलांना सांगितलं असेल, 'गाव्वी ज्वावून यतो !' (दिवाळी २०१६) स्त्री : घराघरात जळणारी एक वात प्रत्येक घरातील स्त्री, घरातल्या या स्त्रीचा मानसिक कोंडमारा, दोन पिढ्यांच्या विचारांमध्ये तिची होणारी घुसमट हा माझा आवडता विषय 'वात' नावाची माझी ही कविता पहा. मुलगा म्हणाला, “आई, दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही, " वडील म्हणाले, "अग! दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही," आई रात्रभर दिव्याची वात कमी-जास्त करत राहिली आयुष्यभर दोघांमध्येच वातीसारखी जळत राहिली. (माझ्या कवितेच्या डायरीची काही पानं... या अंतर्नादमधील लेखातून, जुलै २००८) प्रशांत असनारे निवडक अंतर्नाद ६५