पान:निवडक अंतर्नाद.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याचा पदोपदी उल्लेख आहे. आंब्याचे झाड भारतवर्षात सर्वत्र पसरलेले आहे. आंब्याच्या अनेक जाती, उपजाती आहेत. उत्तर प्रदेशात दशहरी, लंगडा, आंध्रप्रदेशात तोतापुरी, नीलम, बिहारात सिंधुराई, बंगालात मालडा तर गोव्यात मानकुराद, मुसराद, मांगीलाल, फर्नांडिस, आल्फोंसो (ह्यपूस) अशी त्याची नावे आहेत. १६व्या शतकात गोव्यात पोर्तुगीज आल्यानंतर त्यांनी आंब्याच्या झाडावर कलमे करून त्याच्या उत्तमोत्तम जाती केल्या. उदाहरणार्थ, हापूस आंब्याचे कलम करणाऱ्यांचे श्रेय पोर्तुगिजांना दिले पाहिजे. आंब्याच्या झाडाची पाने सण-उत्सवाच्या वेळी तोरण म्हणून वापरली जातात. माझ्या लहानपणी आमच्या घरी 'आंब्याची समाराधना' नावाचा उत्सव साजरा केला जाई. वैशाख महिन्यात गोव्यात आंब्याचा मोसम असायचा. तेव्हा हा उत्सव यायचा. देवाला आंब्याचा नैवेद्य करायचे. जेवणात आंब्याच्या घोटांचे सांसव, आंब्या- फणसाची भाजी, कैरीची उडदमेथी, आमरस पुरी, त्याशिवाय पंगतीत भरपूर आंबे असा बेत असायचा. पुढे मी नास्तिक झालो, अधार्मिक झालो, पण लहानपणाच्या 'आंब्याच्या समाराधनें तले स्मृतिसुख मी कधीच विसरलो नाही, आंबा हे माझे अतिशय आवडते फळ आहे. म्हणूनच माझ्या बागायतीत मी आंब्याची खूप झाडे लावली आहेत. त्याला अजून आंबे लागले नाहीत. काही वर्षांनी या झाडांना आंबे लागतील. तेव्हा ते आंबे मी विकणार नाही. ते सर्व आंबे मी खाऊही शकणार नाही. आंबे खाण्याइतकाच आंबे मित्रांना, नातेवाइकांना वाटण्याचा आनंद गोड आहे काजू काजूचे झाड गोव्यात पोर्तुगिजांनी आणले. मार्च महिना लागला की गोव्यातील रानेवने काजूच्या झाडाच्या मोहराने घमघमू लागतात आणि पिवळ्या, लाल काजूच्या म्हुट्ट्यांनी अंगोअंग भरलेल्या काजी रानभर दिसू लागतात. अशावेळी काजूचे ते पिके म्हुट्टे काढत रानात फिरणे हा अपूर्व आनंद असतो. वास्तविक काजूचा म्हुट्टा हे काजूचे फळ नव्हे. काजूला आलेली बी हे शास्त्रीय दृष्ट्या काजूचे फळ. काजूच्या म्हुट्ट्यांपासून हिंग फोडणी घालून रुचकर शाकभाजी करतात. ह्या म्हुट्ट्यांचा गोड रस नीरा नावाने मिळतो. तो अतिशय गोड असतो. म्हट्ट्यांच्या रसाचे एकदा बाष्पीकरण करून हुर्रक ही दारू बनवली जाते. दुसऱ्यांदा बाष्पीकरण करून फेणी केली जाते. काजूची फेणी अतिशय गंधित व मादक असते. काजूच्या बिया भाजून काजूगर बनवतात. त्याची गोव्यात, शेष भारतात व परदेशांत निर्यात होते. काजूच्या झाडाच्या शिरंतरांनी कसले विचित्र रसायन वाहते म्हणून त्याचे काजूगर इतके गोड, रूचकर आणि त्याची फेणी इतकी दाहक, गंधित होते, कोण जाणे! काजूच्या झाडामुळे गोव्याच्या कृषिव्यवस्थेचे अर्थशास्त्रच बदलून गेले. नारळांचे उत्पन्न गोव्यातील अभिजन सारस्वतांच्या हातात जाते, तर काजूच्या म्हुट्ट्यांचे व बियांचे उत्पन्न गोव्यातील अभिजन भंडारी समाजाच्या हातात जाते. हा गोव्यातील कृषी अर्थकारणाच्या व्याकरणाचा प्राथमिक नियम आहे. काजूचा मोसम आला, की मला माझे मित्र (आमदार) काशीनाथ जल्मी यांची आठवण येते. एप्रिल महिन्यात ते आम्हांला माशेलात बोलवत. काजूच्या रानात तिन्हीसांजेला ते आम्हांला घेऊन जात. म्हुट्ट्यांची गोड नीरा प्यायची. काजूच्या बिया जमवायच्या. तिथेच लाकडे पेटवून इंगळ्यात त्या भाजून गर खायचे. मग जल्मी आम्हांला ऑमलेट आणि खोर्णातले कुरकुरीत उंडे असे जेवण देत तीन वर्षांपूर्वी बहुजनांचे नेते जल्मी गेले. पिंपळ पिंपळाला भारतीय संस्कृतीत विशिष्ट स्थान आहे. देवळाच्या प्राकारांत पिंपळाचे झाड असते म्हणून पिंपळाला इंग्रजीत 'टेंपल ट्री' म्हणतात. संस्कृतात पिंपळाला 'अश्वत्थ' असे नाव आहे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सर्व झाडांत मी पिंपळाचे झाड आहे असे म्हणून पिंपळाचा गौरव केला आहे. पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धाला साक्षात्कार झाल्यामुळे बौद्ध धर्मातही पिंपळाला खास मान आहे. पिंपळाला यमदेवतेचे झाड असे भारतीय पुराणे मानतात. त्यामुळे स्मशानातही पिंपळाची झाडे असतात. देऊळ आणि स्मशान अशा दोन्ही पवित्र आणि अपवित्र ठिकाणी पिंपळ असतो! पिंपळाची झाडे दिवसा हवेतला कार्बन डायऑक्साइड वायू शोषण करतात व हवेत प्राणवायू सोडतात, पण रात्री मात्र हवेतला प्राणवायू घेऊन कार्बन डायऑक्साइड सोडतात, त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली रात्री झोपू नये असे म्हणतात. पिंपळाची सळसळणारी पाने ही सतत वायाशी संवाद करत असतात. पिंपळाचे झाड हे मोठे बोलघेवडे झाड आहे. ते अहोरात्र वायाशी, आकाशाशी बोलत असते, तर कधी स्वत:शी बोलत असते. काही झाडे माणूसघाणी असतात, पिंपळ तसा नाही. त्याला माणसांची साथसंगत आवडते. पिंपळाखालचा पर हे खेड्यापाड्यांतील लोकांचे गुजगोष्टी करण्याचे आवडते स्थान आहे. वड वडाचे झाड हा निसर्गाचा चमत्कार आहे वड हे प्रसरणशील झाड आहे. वड हा सर्जनाचा दृश्यावतार आहे. वड हा नवनवोन्मेषशाली सर्जनशीलतेचा मानदंड आहे; फ्लॅगपोस्ट आहे भारतीय पंचांगातील ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाला सुताचे धागे बांधतात आणि आपल्या नवऱ्याला चिरंजीवित्व मिळावे अशी प्रार्थना करतात. सत्यवान सावित्रीच्या कथेवरून ही अंधश्रद्धा भारतातील हिंदू स्त्रियांमध्ये पसरली आहे. नवऱ्याच्या प्राणासाठी यमाकडे भांडणारी आणि त्याचे प्राण परत मिळवणारी पतिव्रता सावित्री ही भारतीय स्त्रियांपुढील आदर्श स्त्री हे वडाच्या पुनवेच्या सणाने आजही भारतीय स्त्रियांच्या हृदयात कोरले जात आहे. पाँडेचरीला ऑरोविल हे पहाटेचे शहर - सिटी ऑफ डॉन बांधण्याचे ठरवण्यात आले तेव्हा त्याच्या आराखड्याचे कंत्राट निवडक अंतर्नाद ६९