पान:निवडक अंतर्नाद.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणत्याही झाडांचे बॉन्साय करा हवे तर! वडाचा बॉन्साय करू नका रे! त्याचे मी नाव सांगणार नाही. त्याचे मी गावही सांगणार नाही. तो माझा मित्र नव्हता. नातेवाईकही नव्हता. सगळे जग त्याला दुष्ट म्हणून ओळखत होते. त्याला मलाही फसवता आले असते. माझ्याशीही दुष्टपणाने वागता आले असते. पण का कोण जाणे इतरांशी वागला त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तो माझ्याशी वागला. जीवनात त्याने इतरांना काटे दिले असतील, मला मात्र भरभरून फुलांचे घोस दिले. त्याच्या हृदयात सुवासाची एक अदृश्य कुपी असावी, माझ्यासाठी ती तो खुली करायचा. त्या वासात मला मार्गशीर्षात अचानक फुलणाऱ्या सांतानाच्या फुलांचा वास यायचा. हल्लीच तो ख्रिस्तवासी झाला, दफनभूमीत त्याच्या कॉफीनवर मूठभर माती घालण्यासाठी मी गेलो. तिथे मोजकेच लोक होते. त्यांना आश्चर्य वाटले. एका 'दुष्ट' माणसाच्या अंत्यदर्शनाला एक 'चांगला' माणूस कसा आला, असा प्रश्न त्यांना पडला असावा. गुड फ्रायडेला देवाला मरण येते. हे 'सांताना' चे मरण – मी मनात म्हटले. चिंचेचे झाड पाहिले, की मला माझी मुणकात्र किंवेरीची आठवण येते. माझ्या लहानपणी फातराडेच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आमची नारळाची बागायत होती. पुढे माझ्या वडिलांनी ती विकून टाकली. ही बागायत राखायचे काम किंतेर मुणकान्न करायची, किंतेरीचा नवरा जुझे दर्यावर्दी म्हणजे तारवटी तो जहाजावर गेला आणि परतलाच नाही. त्याची वाट पाहून पाहून किंतेर थकली. किंतेरीला दर्याकिनाऱ्यावरील रांपणकार 'वेळेमाय' म्हणायचे वेळेमाय म्हणजे समुद्रकिनाऱ्याची आई. किंतेर आडदांड धिप्पाड होती. रांपणकार पहाटे समुद्रातून रांपण काढून परतू लागले, की किंतेर त्यांना कडक बिनदुधाचा चहा आणि पोदरांच्या खोर्णांतले कुरकुरीत उंडे घेऊन जाई. मग रांपणकार तिला रांपणीतले काही मासे देत तिन्हीसांजेला किंतेर फेणी पिऊन तर्र होई आणि किनाऱ्यावर जाऊन आपल्या नवऱ्याला हाका मारी, "जुझे, तू केन्ना येतलो रे?”, “जुझे तू कधी येणार रे?” जुझे कधीच परत आला नाही. जुझेची वाट पाहता पाहता किंतेर म्हातारी झाली आणि तिला वेड लागले. एके तिन्हीसांजेला किंतेरीने फेणीच्या दोन बाटल्या अख्ख्या पिऊन टाकल्या. माडाचे पेटलेले चुडीत घेऊन 'जुझे तू केन्ना येतलो रे? जुझे तू केन्ना येतलो रे?' असे म्हणत ती समुद्रात चालत राहिली आणि समुद्राच्या पाण्यात बुडून मेली. दुसऱ्या दिवशी पहाटे संपणकाराच्या रांपणीत किंतेरचे प्रेत लागले. रांपणकारांनी रांपणीतले सगळे मासे समुद्रात सोडून दिले. माणसातली झाडे एकेका झाडात मी एकेक माणूस पाहू लागलो आणि एकेका माणसात एकेक झाड आहे याचा साक्षात्कार मला झाला. प्रत्येक लहान मूल हे झाडाच्या रोपासारखे असते. जसा माडाचा कवाथा, आंब्याचे रोप. लहानपणी त्यांची निगा राखावी लागते. त्यांना वारा, प्रकाश, पाणी हवे असते. त्यांना अवतीभवती पिंजरे नको असतात. लहान मुलांचे जीवन झाडाप्रमाणे उत्स्फूर्त असते. सेंद्रिय असते. रंगीबेरंगी कपडे घालून हातात फुगे घेऊन ७२ निवडक अंतर्नाद नाचणारी, खिदळणारी लहान मुले पाहिली की पेरूच्या झाडावर लाल चोचीचा हिरव्याकंच पोपटाचा थवा बसला आहे आणि पेरूची झाडे पिकलेल्या, पिवळ्या पेरूंची देवाणघेवाण करत त्यांच्याशी खेळताहेत असे वाटते. दिवेलागणीला घराच्या बल्कावावर बसून तृप्त, समाधानी जीवन जगलेली आजी आपल्या नातवंडांना आभाळातून उडत येणाऱ्या परीची गोष्ट सांगते, तेव्हा तिच्यात मला गोड, रसाळ फणसांनी लोंबणाऱ्या मागीलदारच्या परसातील फणसाच्या झाडाची आठवण येते. काही माणसे गुलमोहरासारखी हसतमुख असतात. त्यांचे केशरी हास्य हृदयाच्या अंतहृदयातून सर्वांगावर पाझरत फुललेले असते. जीवनातला सगळा कडवटपणा त्यांनी पचवलेला असतो. ते समाधानी असतात. तृप्त असतात. गुलमोहराच्या झाडाकडे पाहून डोळ्यांना जे सुख मिळते, तसेच अशा माणसांकडे पाहून आश्वस्त वाटते. ही माणसे स्वतःच्या सुखाप्रमाणेच दुसऱ्याच्या सुखानेही आनंदी होतात. अनेकदा करुणेपेक्षा मुदिता कठीण असते. दुसऱ्याच्या दु:खाने दु:खी होणे सोपे असते; दुसऱ्याच्या सुखाने आनंदी होणे सगळ्यांनाच जमते असे नाही. तसे झाले असते, तर कोपऱ्याकोपऱ्यावर गुलमोहराची झाडे असली असती! प्रत्येक स्त्री हे एक झाडच आहे. पुरुषांना पक्ष्यांसारखे पंख असतात. स्त्रियांना झाडासारखी मुळे असतात, स्त्रियांना झाडासारख्या फांद्या असतात. स्त्रियांना कळ्या येतात, फुले येतात. झाडांप्रमाणे स्त्रिया गर्भवती होतात. त्यांना फळे होतात. स्त्रियांच्या अंगाखांद्यावर पक्ष्याप्रमाणे मुलेबाळे खेळतात. स्त्रिया झाडांप्रमाणे उन्मळून पडतात. स्त्री हे झाड असल्यामुळे स्त्री आणि फूल यांचे अन्योन्य नाते असावे. फुलांना स्त्रिया आणि स्त्रियांना फुले आवडत असावी. झाडांसारखे जीवन झाडांकडून मी एक गोष्ट शिकलो. झाडांसारखे अकृत्रिम, उत्स्फूर्त, सेंद्रिय जीवन जगता आले पाहिजे. झाडांचे काहीच प्रमाणबद्ध नसते. छंदोबद्ध नसते. झाड ही एक मुक्तछंद कविता असते. झाडाला सिमेट्री नसते. झाडाला भूमितीचे आणि त्रिमितीचे कुठेलच नियम लागू पडत नाहीत. झाड हे अवकाशाच्या कॅन्व्हासवर रंगवलेले जलरंगातले विमुक्त चित्र असते. जीवन असे जगता आले पाहिजे, ते सरळ रेषेत जगता कामा नये, ते झाडाप्रमाणे वक्र रेषेत जगले पाहिजे, वक्रतेतले हे सौंदर्य मला झाडाच्या पानांनी, मुळांनी, फुलांनी, फळांनी शिकवले. झाडांकडून मी पिकलेल्या फळांची परिपक्वता शिकलो. झाडांकडून मी पानगळीतल्या निष्पर्णतेची नम्रता शिकलो. झाडांच्या मुळांकडून मी ज्ञानार्जनाची तृष्णा घेतली. झाडांच्या फांद्यांकडून मी आकांक्षेचा हव्यास घेतला. झाडांच्या फुलांकडून मी चारित्र्याचा सुवास मागून घेतला. झाडांच्या खोडांकडून मी ताठ कणा घेतला. झाडांशी जवळीक झाल्याने माझे माणूसपण उन्मळून पडले आणि माझे झाड झाले. (रेखाटने : भ. मा. परसवाळे) (दिवाळी २०१८)