पान:निवडक अंतर्नाद.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळेपांढरे दिवस मंगला गोडबोले रंगाची पखरण जीवनाचे सौंदर्य वाढवते हे नक्की, पण 'अति सर्वत्र वर्जियेत' हे इथेही लागू असते. म्हणूनच 'ब्लॅक अँड व्हाइट' चा जमाना आजही लोभस वाटतो. जसे 'ब्लॅक अँड व्हाइट' सिनेमे किंवा साधे फोटो आकर्षक वाटतात. आपल्या खुशखुशीत शैलीत लेखिकेने जागवलेल्या बालपणातल्या आंबटगोड आठवणी. आठवतं त्यानुसार माझे वाढीचे दिवस हे काळेपांढरे दिवस होते. 'ब्लॅक अँड व्हाइट चा जमाना माझा म्हणजे माझ्या एकूण पिढीचाच. सुमारे स्वातंत्र्यापासूनच्या पुढच्या अडीचतीन दशकांचा, 'ब्लॅक अँड व्हाइट' म्हटलं की कोणालाही पटकन चित्रपट आठवतात. 'बी अँड डब्ल्यू' फिल्मस! पण त्या बेट्या मोजक्याच निघायच्या, त्यातल्याही फार थोड्या आम्हाला पैसे टाकून बघायला मिळायच्या. त्यामुळे त्यांच्यात रंग नसण्याने काही फरक पडत नव्हता. पण एकूणच बाह्य जीवनात रंग कमी असायचे हे आताच्या रंगरंजित दिवसांमध्ये अनेकदा जाणवतं. घराघरांच्या भिंती साधारणपणे एकाच पांढरट पिवळट म्हणण्याजोग्या रंगांच्या असायच्या. तो रंग दिला तेव्हा पिवळा असावा अशी शंका यावी इतपत छटा त्याला काळाच्या ओघात आलेल्या असायच्या. आता अनेक नवआधुनिक घरांमध्ये मुलांच्या खोल्यांना प्रत्येक भिंतीला वेगळा रंग असतो, तोही अनेकदा मुलांनी निवडलेला असतो. ही चैन माहीतच नव्हती. भिंतींनाच नेमका रंग नसल्याने पडदे कुठल्याही रंगाचे चालायचे. टेलिफोन आणि चारचाक्या फार कमी लोकांकडे असायच्या, पण फोन काळे आणि मोटारी शक्यतो काळ्या किंवा पांढऱ्या अशाच असायच्या. पायताणं बहुधा चामड्याच्या रंगाची किंवा काळी असायची. फारतर पंपशू पांढरे असायचे, पण गुलाबी, आकाशी वगैरे रंग पायताणात असू शकतात अशी कल्पनाही मनात येत नसे. जिला कौतुकाने 'रांगोळी' किंवा 'रंगावली' म्हणायचं, तीही रोज सकाळी दारापुढे चार रेघा ओढत असताना फक्त पांढरीच असायची. रंगीबेरंगी रांगोळीची चैन दिवाळीला ! खाण्याच्या पदार्थांना अंगभूत रंग असायचे आणि त्यावर बाहेरून चढवला तर एकच केशरी रंग यायचा. पांढऱ्या शुभ्र हलव्यामध्ये शोभेसाठी चार केशरी दाणे टाकायचे, पक्वान्नांना खया केशराचा किंवा कृत्रिम केशरी रंगाचा शिडकावा झाला तर व्हायचा. एका संक्रांतीला हलव्याच्या पुडीमध्ये हिरवे दाणे पहिल्यांदा पडले तेव्हा घरादारात त्याचं किती कौतुक झालं ते मला चांगलं आठवतं. पुदिना, बीट, गाजर, टमाय यांचे रंग फक्त आणि फक्त लग्नातल्या रुखवताच्या सजावटीच्या जिनसांना दिलेले आठवतात. रुखवतामधली ती 'बीटाच्या शालूची घडी' (म्हणजे नारळाच्या वड्यांमध्ये बीट घालून आणलेली रंगशोभा) फारसं कोणी खात मात्र नसे. रक्तमांसाचा वर्ण म्हणून तो अनेक शाकाहाऱ्यांना तोंडात घालवत नसे. लहानपोरं लालभडक बर्फाचा गोळा खात तो सोडला तर एरवी खाण्यात लाल रंगाला फारशी जागा नसे. कोल्हापूरच्या त्या सुप्रसिद्ध तांबड्या पांढऱ्या रश्श्याचा इतिहास मला माहीत नाही. पण आम्हा शाकाहारी मंडळींच्या पानात लसणाच्या चटणीचा फिकट लाल रंग हा कडेलोट लाल असे. कृत्रिम खाद्यरंग अजून यायचे होते. सर्वसाधारण माणसाच्या चेहऱ्यावर रंग नसत. कोणत्यातरी पावडरची फक्की मारलेली असे. ती ठळकपणे दिसे. कॅरम खेळायला, तबल्यावर शिंपडायला, घामोळ्याला आणि माफक प्रसाधनाला एकच पावडर अनेक घरांमध्ये वापरत असल्याने ती कातडीच्या रंगाशी फटकून राहाणं हे स्वाभाविकच असे. केस हे वयानुसार नैसर्गिकपणे काळेपांढरे असत, मुलींच्या वेण्यांना रिबिनी तेवढ्या रंगीत असत, पण त्यातही काळ्या पांढऱ्या • रिबिनी जास्त वापरल्या जात फार तर लाल ! छायाचित्रकला बरीचशी प्राथमिक असल्याने घरात फोटो असलेच तर ते साहजिकच काळेपांढरे असत. बहुतेक घरांमध्ये भिंतीवर काही तसबिरी लटकत. त्यातल्या माणसांच्या तसबिरी काळ्या पांढऱ्या असत, पण देवादिकांना भडक रंग लावण्याची परवानगी दिलेली असे. त्यामुळे देवांच्या तसबिरी रंगारंग असत. गडद लिपस्टिक लावलेला राम डोळाभर काजळ फासलेल्या सीतेकडे बघत असताना ती हिरव्या गवतावर बागडणान्या केशरी कांचनमृगाकडे निर्देश करतेय अशी चित्रं भिंतींवर लटकत, दत्ताच्या चित्रातली गाय - कपिला - ही कोड आल्यासारखी पांढरी असे. यातून मनावर असंच काहीसं ठसत गेलं असेल का, की बुवा, रंगांची चैन आपल्यासारख्या मर्त्य माणसांसाठी नाही; देवांची गोष्ट वेगळी. योगायोग म्हणजे सिनेमाच्या पडद्यावर पहिल्यांदा रंग झळकलेले पाहिले. तेही देवलोकाच्या संदर्भात शाळेतर्फे कोणत्यातरी पौराणिक सिनेमाला नेलं होतं. नारद 'नारायण- नारायण करत देवलोकात जातो असा काहीतरी संदर्भ होता. निवडक अंतर्नाद ७३