पान:निवडक अंतर्नाद.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'आणि तिथे बघतो तर काय... अप्सरांचं नृत्य सुरू' असं वाक्य आलं, हॅण.... असा आवाज आला, चित्र बदलण्याचा चक्राकार संकेत पडद्यावर आला आणि लगेच भीषण रंगांचे कपडे घातलेल्या अप्सरांच्या नृत्याचा 'शीन' आला. शिमग्यातली सोंगं बरी म्हणावीत अशा त्या अप्सरा दिसत होत्या. त्या शीनचा डोळ्यांना इतका शीण झाला की अप्सरांना 'दूर सरा' म्हणण्याच्या घाईला आलो, फूजी कलर, गेव्हा कलर, ईस्टमन कलर हे कंपन्यांचे आणि तंत्रज्ञानाचे टप्पे ओलांडण्यापूर्वीच्या सिनेसृष्टीत अशीच काळ्या पांढऱ्या चित्रपटांमधली मोजकी दृश्यं स्वप्नदृश्यं, नृत्यं, प्रेमगीतं वगैरे बाहेरून रंगीत केलेली असत आणि जाहिरातीत त्यांचा विशेष उल्लेख असे. इतके दुर्मिळ होते रंग ! आज सगळ्यात आश्चर्य वाटतं ते तेव्हाच्या अत्यंत रुक्ष, रंगहीन पुस्तकांवर आमच्यासारख्या काहींनी केलेल्या अलोट प्रेमाचं, मोठ्यांचीच काय, मुलांचीही पुस्तकं मासिकं रंगीत नसत, कारण किंमत कमीतकमी ठेवणं हे मुख्य उद्दिष्ट असे क्रमिक पुस्तकांच्याबद्दल तर रंग, सजावट असं बोलायलाच नको. अभ्यास कसा, रक्षच असला पाहिजे. पिक्चर बुक्स, कॉमिक्स वगैरे मराठीत फारशी नव्हतीच. पुढे चांदोबाछाप मासिकांनी भीतिदायक रंगातल्या पन्या, एकमेकात रंग मिसळलेले राजवाडे, पुष्करिणी, कारंजी वगैरे दाखवले पण त्यामुळे रंगाबाबत रुची निर्माण व्हावी ही जराही शक्यता नसे. शाळांचे गणवेषही खाकी, गर्द निळा वगैरे कंयळवाण्या रंगांचे असत, रंग म्हणजे छछोरपणा, थिल्लरपणा असं का मानलं जायचं माहीत नाही. पण छान प्रसन्न रंगसंगती करून एखादी गोष्ट नटवावी, खुलवावी असा प्रयत्न कमीच आढळे. अर्थात साधनसामग्रीचा, तंत्रज्ञानाचा अभावही होताच, आज कागद, कापड, कृत्रिम धागे, प्लॅस्टिक वगैरेंच्या तंत्रज्ञानात आणि रंगसज्जेत फार क्रांती झाली आहे. नुसता पांढरा रंग म्हटला तरी स्नो व्हाईट, कॅण्डी व्हाईट, किंवा लाल रंग म्हटला तरी ब्लड रेड, ग्लेज्ड रेड, बर्गण्डी रेड एवढी गोत्रप्रवरं आताची शेंबडी पोरंसुद्धा सांगू शकतात. आम्हाला फक्त 'तांबडा' माहीत होता त्यांच्या वयात! तांबडा म्हणजे तांबडा, पांढरा म्हणजे पांढरा, फार तर त्यातली गडद किंवा फिकट छटा घ्यायची! भडकलाल... धप्प पांढरा ... लालसर... पांदुरका ! इति! रंगांचीच माफक ओळख असल्याने रंगसंगतीचा विचारही गौण असणार! शिवाय एकूण जगण्याची दृष्टीच मुळी उपयुक्ततावादी! पडद्यांनी खिडक्या झाकल्या की झालं! झाकणांनी रंगांची चैन कशाला करायची? बूट, चपला, पर्सेस, छत्र्या, बॅगा ह्या पहिल्या फाटल्यावरच दुसऱ्या घेतल्या जायच्या, त्यामुळे कशावरही 'जाणाऱ्या काळ्या पांढऱ्या रंगांनाच अग्रक्रम दिला जायचा. प्रौढ स्त्रिया बहुतेक सगळ्या रोजच्या साड्यांवर पांढरी पोलकी घालायच्या, का? कारण पांढरा रंग कशावरही जातो; हा भ्रम. तो फक्त साडीच्या शोभेवर बोळा फिरवून जायचा अनेकदा, पण असं बोलायची टाप नसायची. पांढऱ्या रंगातही नाना छटा असतात आणि त्या सगळ्या इतर सगळ्या रंगांबरोबर सारख्या खुलत नसतात, उलट कित्येकदा मारक ठरतात, असा विचारतरी कितींना सुचला असेल, कोण जाणे! ७४ निवडक अंतर्नाद आयुष्यातल्या ज्या एका दिवशी प्रत्येक मुलगी आपल्या परीने जास्तीत जास्त चांगलं दिसण्याची पराकाष्ठा करते त्या दिवशी, म्हणजे तिचं शुभमंगल होण्याच्या दिवशीही तिला रंगसंगती साधण्याची मुभा नसे. हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर लालपिवळ्या रंगाचे म्हणजे हळदकुंकवाचे फराटे, मनगटाला कळकट दोऱ्यात बांधलेलं पिवळं हळकुंड, केसात तिरंगी वेणी (अबोली + मारवा पांढरी हंगामी फुलं ह्यांच्या तीन ओळींमध्ये विणलेली वेणी.... जी बघताच तिने डोक्यात देशाचा झेंडा रोवलाय असं वाटे!) अंगावर ऐपतीप्रमाणे सोन्यामोत्या- खड्यांचे नानारंगी दागिने, काळ्या मोत्यांचे मंगळसूत्र, आणि ह्या सर्वांशी फटकून राहणारा भलत्याच रंगाचा शालू! 'लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलीला सगळं शोभून दिसतं' ह्या एका वाक्यात सगळं गुंडाळलं जायचं आणि एवढ्या उमेदीच्या वयातल्या पोरीबाळीसुद्धा खुशाल गुंडाळून घ्यायच्या! आजच्या व्यक्तिस्वातंत्र्यवादी जगात कोणीही कोणालाही कशाबाबतही सहजासहजी गुंडाळू शकणार नाही. जो तो आपापल्या इच्छेनुसार कपडे, बूट, चपला, बॅगा इत्यादीच नव्हे तर अंग, केस, नखं, भुवया, पापण्या हव्या त्या रंगात रंगवून घेतो. मुलांच्या • बाबतीत तर जन्मल्यापासून मुलींना 'गुलाबी' व मुलग्यांना 'निळा' रंग बहाल केलेला असतोच, पण पुढेही मुलांना रंग आवडतील किंवा आकृष्ट करतील ह्या भ्रमाखाली मुलांच्या वस्तू एकाहून एक भडक, आक्रमक रंगांच्या केलेल्या दिसतात. मुलांच्या वाढदिवसांना 'कलरथीम्स देणारे उच्चभ्रू पालक भेटतात. लहानवयापासून मुलांकडे नाना रंगांच्या ट्यूबा, डब्या, खडू, पेन्सिली, शाई, मेण याची लयलूट केलेली दिसते. मुलं अत्यंत बेदरकारपणे ते रंग वापरत, नासत असतात. मोजक्या रंगांमध्येही चांगली, प्रभावी चित्रं काढता येतील ह्याचा पत्ता त्यांना लागूच दिला जात नाही. ही चंगळ करू देणाऱ्या त्यांच्या पालकांची वाहनं, गाड्या, फर्निचर, यंत्र, खाद्यपेय रंगारंग असावीत हे ओघाने आलंच. एकेकाळी रंगसजावट ही बायकांची मिरास असेल, तर पुरुषही त्या क्षेत्रात त्यांच्या 'खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आजकाल स्वतःच्या लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुली दिवसभरात शे - शंभर पोषाख बदलताना प्रत्येकवेळी त्या-त्या पोषाखाच्या अनुरूप अॅक्सेसरीज बदलतात हे तर झालंच. पण विशेष म्हणजे अनेकदा त्यांचे जोडीदार नवरदेव हेही त्यांच्या थाटामाटाशी 'कलर कोऑर्डिनेटेड' 'अटायर' वगैरे चढवतात, हा रंगसंगतीचा सोस थक्क करणारा वाटतो. एकतर आपादमस्तक प्रत्येक गोष्ट विशिष्ट रंगाच्या अचूक छटेची पैदा करणं हे केवढं मेहनतीचं, खर्चाचं काम असणार! आणि दुसरं, त्याहून गूढ म्हणजे, लग्नाच्या दिवशीच दोघांनी एवढं अचूक मॅचिंग साधल्यावर पुढे आयुष्यभर त्यांना 'लग्न' ह्या खात्यावर करण्याजोगं उरणार काय? रंगांबाबत ऐच्छिक विसंगतीपासून सक्तीच्या सुसंगतीपर्यंतचा हा प्रवास आता कळसाला पोचला आहे. शहरातल्या रस्त्यावर बिनामँचिंगचे कपडे घातलेली बाई किंवा पुरुष दाखवा (आणि शंभर रुपये बक्षीस मिळवा) असं आवाहन करायला हरकत नाही. शंभर रुपये कधीही गमवावे लागणार नाहीत याची खात्री ! रंगांनी शिणलेले डोळे घटकाभर निववण्यासाठी जुन्या