पान:निवडक अंतर्नाद.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्यापेक्षा ज्यांच्याकडून अजिबात अपेक्षा नव्हती अशांकडूनच मिळत होत्या. चर्चा करणारे व सल्ला देणारे अनेक असत पण प्रत्यक्ष मदत करणाऱ्यांची संख्या खूप सीमित होती. अशा परिस्थितीत व्यक्तिगत क्षमतेवर व प्रयत्नांवर बहुतांशी अवलंबून राहणे क्रमप्राप्त होते. कारण एखाद्या स्वतंत्र, स्टँड-अलोन मासिकाला आवश्यक ती व्यावसायिक यंत्रणा ( प्रोफेशनल सेट- अप) उभारणे खूप मर्यादित असलेल्या खपामुळे शक्यच नव्हते, वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आमच्याही काही व्यक्तिगत मर्यादा होत्या, अंतर्नाद मासिक सुरू झाले तेव्हाची, म्हणजे ऑगस्ट १९९५मधली परिस्थिती आणि आजची परिस्थिती ह्यात खूप फरक पडला आहे हे नक्कीच २०१८, २०१९ व २०२० ही तीन वर्षे फक्त दिवाळी अंक निघाला. त्यानंतर मात्र वाटचाल थांबवणे हाच एक पर्याय उरला. या संकलनात शेवटी असलेल्या चार पानी स्मरणयात्रेत या प्रवासातील काही क्षणचित्रे नोंदवली आहेत. 'निवडक अंतर्नाद' साठी साहित्य निवडायची प्रक्रिया सोपी नव्हती. इतक्या वर्षांत नाही म्हटले तरी शेकडो लेखकांनी लिहिलेला सुमारे पंधरा हजार पानांचा मजकूर अंतर्नादमधून प्रकाशित झाला. तो चांगला वाटला होता म्हणूनच मुळात तो प्रकाशनासाठी आलेल्या विपुल साहित्यातून स्वीकारला गेला होता. त्यातील पुन्हा अगदी पाच-सहा टक्के मजकूर निवडायचे ठरवले तरी सुमारे आठशे पानांचा मजकूर पहिल्या चाळणीत निवडला गेला. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात २८४ पृष्ठांचा मजकूर घेता आला होता, पण दिवाळी अंकाची संभाव्य किंमत वगैरे व्यावसायिक मर्यादा विचारात घेता पृष्ठसंख्या त्याहून अधिक वाढवणे शक्य नव्हते. या संकलनात ती अडचण काहीशी दूर सारून ५१२ पानांचा मजकूर समाविष्ट केला आहे. अर्थात तरीही बराच चांगला मजकूर वगळावा लागला आहे. आनंद यादव, अनंत सामंत, मिलिंद बोकील, वि. ग. कानिटकर, राजन खान, किशोर आरस, बाळ गाडगीळ, लीला दीक्षित, शंकर सारडा, चंद्रकांत बांदिवडेकर, गं. ना. जोगळेकर, अरुण गद्रे, रा. ग. जाधव, अशोक केळकर, पिंगे, सुभाष भेण्डे, अरविंद वामन कुलकर्णी, महेश केळुसकर, अनिल किणीकर, सुनीलकुमार लवटे, गिरीश जाखोटिया, अरुण साधू, नीरजा, आशा बगे, विवेक गोविलकर, परशुराम देशपांडे वगैरे अनेकांची लेखने उत्तम असूनही या संकलनात घेता आली नाहीत. ही यादी खरे तर अजून बरीच लांब होईल. अनेक सदरे, विविध परिसंवादांत लेखकांनी मांडलेले विचार, अनेक उत्तमोत्तम कथा- दीर्घकथा, मराठी भाषेविषयीचे लेख, विविध साहित्यसंमेलनांवरचे व दिवाळी अंकांचा आढावा घेणारे लेख, मुलाखती, शरद जोशी विशेषांक, चित्रपट विशेषांक, अनुवाद विशेषांक, धार्मिक सलोखा विशेषांक, भाषाभगिनी विशेषांक अशा अनेक विशेषांकांतील मुद्दाम मागवलेले जाणकारांचे लेख हे काही घेता आले नाही. 'मैत्र जीवाचे' सारख्या सदरातून अंतर्नाद पाच-सहा पानांची विस्तृत पुस्तकपरीक्षणेही आवर्जून छापत असे. २००६ सालचा दिवाळी अंकतर श्रेष्ठ पुस्तके विशेषांक म्हणूनच काढला होता व त्यात वाचकांनी निवडलेल्या वीस उत्तम मराठी पुस्तकांची विस्तृत परीक्षणे फक्त होती. त्यांतले काही घेता आले नाही. प्रवासवर्णने, साधना बहुळकर व रवी परांजपे यांचे चित्रकलेविषयीची जाण वाढवणारे लेख, अनेक उत्तम कविता असेही बरेच काही गाळत जावे लागले. शिवाय शक्यतो एका लेखकाचे एकच लेखन संकलनात घ्यायचे असे ठरवल्यामुळे अंतर्नादमध्ये सातत्याने लिहिणाऱ्या काही लेखकांना यथोचित स्थान देता आले नाही. पण या साऱ्याला खरेच नाईलाज आहे असे असले तरी ललितलेखन, कथा, व्यक्तिविमर्श, साहित्यविश्व, समाजवेध आणि संकीर्ण अशा सहा भागांमध्ये मिळून त्र्याण्णव लेखकांचे वेधक साहित्य (प्रकाशनाच्या कालानुक्रमे त्या त्या भागात ) अंकात समाविष्ट करू शकलो याचे समाधान वाटते. पुढेमागे कदाचित अनेक वाचकांनी सुचवल्याप्रमाणे अंतर्नादची वेबसाइट तयार होऊ शकेल व त्यावर सर्वच जुने अंक व त्यांतील लेखने जाऊ शकतील; अभ्यासकांसाठी उपलब्ध राहू शकतील. पण या साऱ्याबद्दल आज नक्की काही सांगणे अवघड आहे. या संकलनातील सर्व लेखन अर्थातच पूर्वी अंतर्नादमध्ये प्रकाशित झालेले असेच आहे आणि शक्यतो ते मुळात जसे होते तसेच पुनर्मुद्रित केले आहे; फक्त काही ठिकाणी संबंधित लेखकांनी सुचवलेले बदल समाविष्ट केले आहेत; अर्थात ते अगदी किरकोळ असेच आहेत. अंतर्नादच्या एकूण वाटचालीबद्दल मागे वळून बघताना आज काय वाटते? निवडक माणूस या माणूस प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झालेल्या अप्रतिम संकलनात अगदी शेवटच्या पानावर (पृष्ठ ६११) सतीश कामत आणि प्रसन्नकुमार अकलूजकर यांनी लिहिले आहे : "माणूस बंद होणे अपरिहार्य होते का? सत्यकथा बंद का झाले? माणूस किंवा सत्यकथा बंद व्हायला केवळ आर्थिक कारणे आहेत का? की आणखी काही? १९७० नंतरच्या काळात, त्यातही १९८० नंतरच्या दशकात मध्यमवर्गीय मराठी समाजाकडे सुबत्ता आली. समृद्धी आली. मग या समाजाला माणूसची गरज वाटेनाशी झाली असा अर्थ घ्यावयाचा का? मौज मुद्रणालयाचे पाठबळ आणि आर्थिक सहाय्याचे अनेकांचे हात उंचावलेले असतानाही सत्यकथा बंद झालेच ना? हे का घडले याच्या कारणांचा शोध घ्यावयास हवा. ही काळाची अपरिहार्यता मानायची का?” यातला शेवटचा प्रश्न संकलनाच्या शेवटच्या वाक्यात विधानाच्या स्वरूपात आला आहे. अंतर्नादचा कालखंड तर सत्यकथा (शेवटचा अंक ऑगस्ट १९८२) आणि माणूस (शेवटचा अंक ऑगस्ट १९८६) यांच्या कितीतरी नंतरचा; मराठी नियतकालिकांसाठी खूपच अधिक प्रतिकूल बनलेला; 'काळाची अपरिहार्यता' अधिकच प्रकर्षाने जाणवणारा; बहराचे दिवस सरल्यानंतरचा. रीडर्स डायजेस्ट आणि इंडिया टूडे या दोन निवडक अंतर्नाद ७