पान:निवडक अंतर्नाद.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पौगंडावस्थेपासून घरात, दारात चित्रपटगृह, टीव्ही, नाहीतर स्मार्टफोनच्या स्क्रीनवर कथा, कादंबऱ्यांतून नाहीतर गुळगुळीत पानांवरच्या छायाचित्रांमधून पडत जातात, रुजत जातात लैंगिक फॅन्टसीची बीजे पुरुषाच्या मनोभूमीत. त्यातच मिसळून जातात त्याच्याच बापजाद्यांच्या अगणित अतृप्त लैंगिक इच्छा, होतात आरूढ, अधिकाराने, आपल्या वारसदाराच्या अंगप्रत्यंगावर! वटारलेले डोळे, संयत दुर्लक्ष, "किती घाणेरडा आहेस तू" "हाऊ मीन यू आर" यातून तो ओढून घेत राहतो त्याच्या लैंगिक फॅन्टसीज, फॅन्टसीचे उफराटे वृक्ष मनाच्या जमिनीत, दडवून ठेवतो खोलवर, दुसऱ्या कोणाच्या, लग्नाच्या बायकोच्या, अगदी जवळच्या मित्रांच्यादेखील दृष्टीस पडणार नाहीत अशा जमिनीवर वाढण्यास बंदी असल्यामुळे जमिनीखाली उलटे वाढतात त्या फॅन्टसीच्या बियांचे वृक्ष, खोल, अजून खोल कालानुरूप फुटतात त्या वृक्षाला खोड, फांद्या, उपफांद्या, पाने आणि गूढ, मादक वासाची ती फुलेदेखील. प्रत्येक पुरुषाचा फक्त स्वतःचा खाजगी वृक्ष! शरीरात उलट्या वाढणाऱ्या त्या वृक्षाची मूळे पसरतात त्याच्या कातडीच्या जमिनीला समांतर दिसतील न दिसतील अशी म्हातारपणात, मांसल जमिनीची धूप होत गेल्यावर मात्र नाही लपवता येत म्हाताऱ्या पुरुषाला हातापायावर, कातडीवर डोके वर काढणाऱ्या हिरव्या निळ्या शिरांच्या रूपाने प्रथमच बाहेर डोकावणारी त्याच्या त्या फक्त स्वत:च्या खाजगी वृक्षाची मुळे स्मशानात म्हाताऱ्या पुरुषाचे शरीर जाळताना येणारे ते चित्रविचित्र वास असतात त्याच्या शरीरातील त्या जळणाऱ्या त्या फॅन्टसीच्या उफराट्या वृक्षाचे, खोडाचे, फांद्यांचे अन् त्या गूढ, मादक वासाच्या पण आता सुकून गेलेल्या फुलांचे! ८० निवडक अंतर्नाद (ऑगस्ट २०१७) संजीव चांदोरकर