पान:निवडक अंतर्नाद.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"मी माझं हे कॉलेज सोडून कुठे जाणार नाही सांगून ठेवतो. " "मी पण नाही माझी शाळा सोडणार" अपणनि भावाची री ओढली. "आपण इथंच रहायचं. माझ्या मैत्रिणी इथंच आहेत. "तुम्ही दोघं गप्प बसा रे," माधुरीनं त्यांना दयवलं. "कोणी जागा सोडायला निघालेलं नाही. बाबांनी त्यांना काय सांगितलं ते ऐकलं ना? आणि काय करायचं ते आम्ही ठरवू. तुम्ही मुलांनी ज्यादा शहाणपणा करून आम्हाला सल्ले देऊ नका, कळलं?" "म्हणजे काय? आमच्या लाईफबद्दलचा डिसीजन घेताना आम्हाला कन्सल्ट नाही करणार? हे बरं आहे! आणि आता मी मोठा झालोय" अभिजित कुरकुरला. प्रमोदनं काही न बोलता त्याच्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकला. तसा तो धुसफूसत गप्प बसला. प्रमोदच्या आईचं वय झालं असलं तरी कान तिखट होते. तिनंही झालेलं सगळं संभाषण नीट ऐकलं होतं, स्पष्टच होतं. "तू बोललास ते बरोबरच बोललास. अरे, गेली पंचवीस वर्षं आपण इथे राहतोय, तुझ्या बाबांनी कर्ज काढून हा ब्लॉक घेतला. पन्नास हजाराचं कर्ज त्यावेळी किती मोठ्ठे वाटत होतं बाळा! सहा वर्षं लागली फिटायला. आता सांगते, तुम्हाला हसू येईल, पण तुझे बाबा ऑफिसमधून बसनं यायचे तर आपल्या घराजवळच्या स्टॉपवर न उतरता आधीच्या स्टॉपवर उतरायचे आणि चालत यायचे. बसची स्टेज बदलायची ना! म्हणजे मग तिकिटाचे पंधरा पैसे कमी पडायचे. अस्से एकएक पैसा जोडून कर्ज फेडलं हो त्यांनी पण ब्लॉकचं सुख जास्त दिवस नव्हतं त्यांच्या नशीबी, कर्ज फिटलं. आता जरा मौजमजा करावी म्हणाले - त्याच्या पुढच्याच महिन्यात " आईनं डोळ्याला पदर लावला. प्रमोदनं त्याच्या आईच्या हातावर थोपटलं. "हो, आई. मला कल्पना आहे सग म्हणून तर मी त्यांना नाही म्हणून सांगून टाकलं. तू ऐकलंस ना?" "इथं कोणी हा ब्लॉक सोडून चाललं नाहीये, आई" माधुरी म्हणाली. तुम्ही उगीचच त्रास करून घेतायत झालं. पुरे झाली चर्चा आता सगळे झोपायला जाऊया अकरा वाजायला आले. उद्या कामावर जायचंय सगळ्यांना " "आई, मी वाचत बसणार आहे हं.” अभिजितनं सांगितलं. "मला पण अभ्यास करायचाय," अपर्णा म्हणाली. "टेबललॅम्प लावून अभ्यास करा. आजीला दिव्याचा त्रास होतो. झोप लागत नाही. " "आणि आई –” अपर्णा हळूच म्हणाली. "काय आता?” "स्वाभिमान बघायचीच." "टीव्ही मुळीच लावायचा नाही' माधुरीनं दटावलं, ही मालिका रात्री साडेअकराला लागायची. "सगळ्यांची झोपमोड होते. " “अगदी हळू आवाजात लावीन, आईं प्लीजऽऽज.” “असू दे, सूनबाई म्हातारपणी झोप जरा कमीच होते आणि दुपारी पडायला मिळतं मला." कितीही उशीरा झोपलं तरी आईंना पहाटे चार वाजता जाग येते हे प्रमोद, माधुरीला माहीत होतं. "काही गरज नाही स्वाभिमान बघायची अजिबात टीव्ही लावायचा नाही." माधुरीनं कितीही बजावलं तरी मुलं टीव्ही लावणारच, तिला माहीत होतं. घरात एकच बेडरूम होती. प्रमोदची आई आणि मुलं ड्रॉईंगरूममध्येच झोपत, त्या सगळ्यांना बाहेरच्या खोलीत कोंबून बेडरूममध्ये जाताना माधुरीला अलीकडे संकोच वाटे ..... जागेसंबंधीचं हे प्रपोजल स्वीकारलं तर ठाणे- डोंबिवलीला का होईना पण तीन बेडरूमचा फ्लॅट घेता येईल, तिच्या मनात आलं. मुलांना अभ्यासाला स्वतंत्र खोली मिळेल. त्यांच्या वेळीअवेळी दिवा लावण्यानं सासूबाईंची झोपमोडही होणार नाही. कुणालाही हवा तेव्हा टीव्ही बघता येईल. सगळ्यांच्या दृष्टीनंच सुखाचं होईल ते... पण मग ही जागा सोडावी लागेल... लागेना का ? काय बिघडलं? तिच्या मनानं उचल खाली. ह्या जागेला काय असं सोनं लागलंय?... नोकरीचं ठिकाण लांब पडेल खरं, पण सोडूनच द्यायची नोकरी, नाहीतरी ऑफीसनं व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम जाहीर केलीच होती. भरपूर बँक बॅलन्स असल्यावर नोकरीची गरजच काय ?... प्रमोदच्या मनात नेमके हेच विचार चालू होते. एकमेकांशी त्यांनी ते बोलून दाखवले नाहीत, पण दोघांनाही रात्री लवकर झोप लागली नाही. बाहेरच्या खोलीतून टीव्हीचा आवाज येत होता. दुसऱ्या दिवशी लंच अवरमध्ये प्रमोदने आपल्या सहकाऱ्यांशी हा विषय काढला. भातखंडे अशा बाबतीत चांगलेच माहीतगार होते. "आमच्या एरियात जागेचे भाव काय आहेत, तुला माहीत आहेत का?” डबा खाताखाता त्यानं भातखंडेला विचारलं. “नक्की माहीत नाहीत, पण आठ-दहा हजार सहज असतील.” "आठ दहा हजार म्हणजे?" "म्हणजे दर चौरस फुटाला रे त्यातून तू तर अगदी मेनरोडवर राहतोस. तुझ्या इथं तर जास्तच असेल. का विचारतोहेस?" प्रमोद मनातल्या मनात आकडेमोड करू लागला. साडेपाचशे चौरस फूट गुणिले आठ हजार किंवा दहा हजार, म्हणजे साडेपाच गुणिले आठ- "का रे?” भातखंडेने विचारलं. तुझ्या जागेला कुणी गि-हाईक आलंय की काय?" निवडक अंतर्नाद ८५