पान:निवडक अंतर्नाद.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"गिऱ्हाईक असं नाही" प्रमोदन सावधपणे सांगितलं. "पण विचारणा होताहेत. " "अरे वा, लकी आहेस लेका. पण कुणाची आली ऑफर तर लगेच हो म्हणू नकोस. जरा चौकशी करून मगच ठरव, पण चान्स आला तर मात्र सोडू नकोस." "पण माझी नोकरी, मुलांची शिक्षणं..." "आयला जागा विकल्यावर नोकरीचं काय पडलंय तुला. जन्मभर बसून खाल्लंस तरी संपणार नाही.” भातखंडेच्या स्वरात असूया होती. "आमच्या बापानं आत कुठंतरी जोगेश्वरीला ब्लॉक घेतला. शांत एरिया म्हणून आता ती एरिया शांतही राहिली नाहीये आणि त्याला फारसा भावही नाहीये. हजार-बाराशे म्हणजे डोक्यावरून पाणी. पण ते जाऊ दे. तुला केवढ्याची ऑफर आलीय?” "अजून पक्की बोलणी झाली नाहीत. म्हणून तर तुला विचारलं, माझंच नक्की होत नाहीये. सध्या चाललंय ते काय वाईट आहे?" "मूर्ख आहेस तू. त्यांना नाही म्हणून सांगितलं असलंस तर ते एकापरी बरंच झालं. त्यांना वाटेल तू ताणून धरतोहेस. म्हणजे चार पैसे वाढवून मिळतील. पण प्रत्यक्षात नाही म्हणायचा विचारसुद्धा मनात आणू नकोस. तुला इतके पैसे मिळतील की मनात आणलंस तर लोणावळ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा बंगला घेता येईल; मला विचारशील तर ठाणे किंवा बोरीवलीला मोठा फ्लॅट घे, नोकरी सोड. हवं तर एखादा छोटयसा व्यवसाय कर. नाही केलास तरी चालेल. उरलेले पैसे बँकेत ठेवून व्याजावरसुद्धा जगता येईल आरामात.” "मुलीची शाळा - अभिजितचं कॉलेज " "ठाण्याला काय शाळा-कॉलेजं नाहीत? नाहीतरी हल्ली क्लासमध्येच जाऊन परीक्षा द्यायच्या असतात. शाळा-कॉलेजं कसलीही असली तरी काय फरक पडतो?" "मुलं ऐकणार नाहीत.” "मग त्यांना हॉस्टेलमध्ये ठेव. नाहीतर असं कर, मुलाला कोरी करकरीत होंडा घेऊन दे. आणि तुझी मुलगी यंदा अकरावीला ना ? पुढच्या वर्षी बारावीला जाईल. कुठं जायचंय तिला?” "मेडिकलला जायचं म्हणतेय खरी आहे तशी डोक्यानं बरी, पण बघूया कसे मार्क्स पडताहेत ते. त्याच्यावर ठरवू.” "जागेच्या पैशातून आठ-दहा लाख डोनेशन तू सहज देऊ शकशील. सॉरी, आता त्याला डोनेशन नाही म्हणायचं नाही का? डोनेशन नाही, पेड़ सीट काय ?" "आठ-दहा लाख डोनेशन ? हा विचार प्रमोद कधी मनातच आणू शकला नव्हता याआधी अपर्णा डॉक्टर होऊ शकेल ? "मग काय झालं. अरे, आपल्याला काही रिझर्व्ह कोट्यातनं अॅडमिशन मिळणार नाही. कुणा मंत्र्याचा वशीलाही नाही आपल्याकडे. तुझ्या नशीबानं तुझ्याकडे चांगली मोक्याची जागा आहे. वेळेवर ऑफर आलीय तर सोडून नकोस. नशीबवान आहेस." ८६ निवडक अंतर्नाद "पण आई? तिच्या भावना गुंतल्याहेत ह्या जागेत रे,” "आता किती दिवस राहिलेत तिचे?" प्रमोदने दचकून वर पाहिलं तसा भातखंडे वरमला. "सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तू मोठी जागा घेतलीस तर तिला स्वतंत्र खोली देऊ शकशील तिचे उरलेलं आयुष्य आरामात जाईल. बघ विचार करून, पटेल तुला, " खरं तर प्रमोदला हे आधीच पटलं होतं. फक्त आईला कसं पटवायचं असा प्रश्न होता. घरी आला तेव्हा आईनं त्याला चहा देता देता सांगितलं, "हल्ली खाली फार जोरानं आवाज चालतात रे, प्रमोद, दुपारचं दोन घटका शांतपणे पडावं म्हटलं तर काही शक्य होत नाही.” "खाली म्हणजे?" "खाली तळमजल्यावर रे काहीतरी दुरुस्ती चाललीय ना? त्याची सारखी खरखर, घरघर चालू असते. काहीतरी तोडफोडपण चालली आहे. पाडल्याचे आवाज येतात. " "हो, ते रिनोव्हेशन चाललंय ना त्या ज्युवेलर्सचं? सगळ्या फरशा काढून नवीन बसवत असतील. " "काही का करेनात. पण जरा आवाज कमी करायला सांग त्यांना उद्या सोसायटीची मीटिंग आहे ना? शेजारच्या सांगत होत्या. त्यात काढा हा विषय जरा हळू काम करा म्हणावं, काय?" "आई, दुरुस्तीचं काम म्हणजे आवाज होणारच आणि आपल्या बरोब्बर खाली आहे म्हणून इथं जास्त जोरात ऐकू येतात.” "पण केवढ्या जोरानं धाड् धाड् चालली असते. माझं अगदी डोकं उठतं.” "आपण असं करू या का आई, हे घर सोडून दुसरीकडे घेऊ या. नाहीतरी हे आपल्याला लहान पडतं. शिवाय अगदी मेनरोडवर आहे. रहदारीचे आवाज, फेरीवाले, सारखी गडबड त्यातून ह्या दुरुस्त्या, यापेक्षा दुसरीकडं रहायला जाऊ.” प्रमोदची आई अवाकच झाली. इतक्या छोट्या गोष्टीवरून प्रमोद जागाच बदलायला निघेल याची तिला कल्पना नव्हती. "म्हणजे काय? काल आले होते त्या माणसांना जागा विकणार की काय तू? काही नको जागा सोडायला एवढा काही मला त्रास होत नाही. आणि काय जी दुरुस्ती करताहेत ती होऊन जाईल महिन्याभरात, " "ते ठीक आहे ग, पण एकूणच ही शांत जागा नाही. आता तळमजल्यावरची दुरुस्ती झाली तर वरती सुरू होईल.” प्रमोद तिचा अंदाज घेत म्हणाला. "ती माणसं काल आली म्हणून नव्हे ग. पण एवीतेवी मी मोठी जागा घ्यायचा विचार करत होतोच. चांगला तीन बेडरूमचा ब्लॉक, तुला स्वतंत्र खोली, त्यात तुला देवघर, " "काही नको मोठं घर, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या आणि रहा, मला म्हातारीला नाही कुठं जायचं.”