पान:निवडक अंतर्नाद.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"अग आई तुला सोडून आम्ही कसे कुठं जाऊ ?” "मग नकाच जाऊ, आपण सगळी राहू इथंच.” स्वैपाकघरातून माधुरी खुणावून आत बोलावत होती. प्रमोदचं तिकडं लक्ष गेलं. तो उठून आत गेला. "तुमची कमाल आहे,” माधुरी दबत्या आवाजात म्हणाली. " हा विषय आत्ता - असा काढायचा? आपण जरा ठरवून व्यवस्थित नसतो का बोललो. झालं आता. आता आई मुळीच हो म्हणणार नाहीत. एकच घोशा धरून बसतील.” "मला तरी काय कल्पना ?" प्रमोद पडेल चेहेऱ्याने म्हणाला. "वाटलं विषय निघालाय तर बोलून घेऊ. ती कबूल होईल.' "डोंबलाचं बोलून घेऊ! आता त्या मुळीच कबूल होणार नाहीत. नीट बेताबेतानं त्या मुद्यावर यायचं, पण तुम्हाला सगळी घाई. बसा आता." माधुरी फणकाऱ्यानं म्हणाली, "वळवू आपण तिचं मन." "वाट बघा!" माधुरीनं नाक उडवलं. एकमेकांशी अजिबात चर्चा न करता प्रमोद आणि माधुरी दोघंही घर विकायच्या निर्णयापर्यंत येऊन पोचले होते. आईचं मन वळवता आलं तर उत्तमच. पण गरज पडल्यास तिच्या मनाविरुद्धसुद्धा का होईना, जागेची ऑफर स्वीकारायची यावर दोघांचं एकमत झालं. समोर ठाकलेल्या कांचनमृगानं जणू नजरबंदीच केली होती. पैसे मिळाल्यानंतर काय काय करायचं, काय काय घ्यायचं, कुठे प्रवास करायचा आणि उरलेले पैसे कुठे गुंतवायचे याची चर्चा करत दोघंही बराच वेळ जागी होती. भविष्याची सोनेरी स्वप्ने बघताना रात्र कशी सरली ते त्यांना कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्यासमोर राहणारे वाधवानी त्यांच्याकडे आले. सकाळच्या वेळी ऑफिसला जाण्याच्या घाईत कुणी आला की कुणाच्याही कपाळावर आठ्या पडतात, "येऊ का? जरा बोलायचं होतं,” ते म्हणाले. "संध्याकाळी बोलूया. आत्ता गडबड आहे. काही अर्जंट आहे का ?" प्रमोद शर्टाची बटणं लावत लावत म्हणाला. "हो अर्जंटच आहे. आज रात्री सोसायटीची मीटिंग आहे. त्या आधी काही ठरवावं लागेल आपल्याला.” "कशाबद्दल?" "तुमच्याकडे सिद्धीविनायक ज्युवेलर्सचे लोक आले होते ना?" प्रमोद चपापला. त्यानं स्वैपाकघराच्या दिशेनं पाहिलं. आई आतच असणार. तिला ऐकू जायला नको. "ठीक आहे. तुमच्या घरी बोलूया, चालेल?” "चालेल ना. यू आर वेलकम." "मी आलोच ग दह्मपंधरा मिनिटात.” असं माधुरीला ओरडून सांगून प्रमोद वाधवानींबरोबर त्यांच्या घरी आला. "बसा. चहा घेणार?" "नको, मला आधी सांगा, तुम्हाला कोण म्हणालं?” वाधवानी हसले म्हणाले, "काळजी करू नका, मी काही इन्कमटॅक्सवाल्यांना कळवत नाही! मला माहीत आहे कारण ते माझ्याकडेही आले होते. " प्रमोद दचकला. आपल्याला प्रतिस्पर्धी आहे. तर आपण जागा दिली नाही तर ते वाधवानींची जागा घेतील. हातातोंडाशी आलेला आपला घास ते बळकावतील फुग्यातली हवा गेल्यासारखा त्याचा चेहेरा पडला. "घाबरू नका, त्याना माझी जागासुद्धा पाहिजे आहे म्हणून ते माझ्याकडे आले होते. खाली शोरूम आणि वरती सोन्याचांदीच्या दागिन्यांसाठी प्रशस्त हॉल असं करायचंय. शिवाय वर भक्कम तिजोरीवजा खोल्यासुद्धा करायच्यात. त्यासाठी तुमचा आणि माझा ब्लॉक हवाय त्यांना " "अस्सं!” प्रमोदच्या जीवात जीव आला. "तुम्ही काय सांगितलं?” "मी प्रथम नाही म्हणूनच म्हटलं. पण तेच म्हणाले नीट विचार करून सांगा." "चांगलं केलंत. आपण उत्सुकता दाखवली की ते भाव पाडतात. पैशासंबंधी काही बोलणं झालं?” "पन्नास देऊ असं म्हणाले. तुम्हाला काय ऑफर केलीय?" “मलाही तेवढेच सांगितलेत. पण मी त्यांना सांगणार आहे. नवीन घर सगळ्या फर्निचरसकट, इंटर्नल डेकोरेशनसकट, त्यांनी ताब्यात द्यायचं, मगच आम्ही हे घर सोडू.” "म्हणजे? फक्त घराऐवजी मोठं घर! इतकेच ?” "छे हो, तसं नाही, वर द्यावेच लागतील त्यांना न देऊन सांगतात कुणाला? पण घर आपण खरेदी करायचं नाही. कारण त्यालासुद्धा पुष्कळ ब्लॅक लागणार, तो पैशाचा व्यवहार आपण करायचा नाही. म्हणजे रिस्क तेवढं कमी, " "ते बरोबर आहे." प्रमोदला त्यांचा मुद्दा पटला. आपण वाधवानींशी बोलतोय ते बरं आहे आपल्याला ह्या खाचाखोचा माहीत नाहीत. त्यांची मदत होईल. "पण वरती किती मागायचे?” "ते तुम्ही घर कुठं घेताय त्यावर अवलंबून आहे मी बोरीवलीला घेणार आहे. त्याचे पंधरा-वीस होतील फर्निचर धरून. म्हणजे मग वर चाळीस मागेन.” वाधवानींनी लाळ गिळत सांगितलं. "बाप रे । एवढे मिळतील?" "मागून बघायचे. तीस पस्तीस तरी मिळतीलच. आणि सोसायटीचं काय ते त्यांचं त्यांनी बघून घ्यायचं.” "सोसायटीचे?” “अर्थात, सोसायटीला द्यावे लागतीलच नियमाप्रमाणे, पण ते व्हाईटमध्ये ते काय दोनचार असतील ते त्यांनी द्यायचे. वरती सेक्रेटरी आणि अध्यक्षांचे काय असतील ते स्वतंत्र " प्रमोदने प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघितलं. मग हळूहळू निवडक अंतर्नाद ८७