पान:निवडक अंतर्नाद.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नियतकालिकांविषयी मी अंतर्नादमध्ये दोन दीर्घ लेख लिहिले होते. आशयाचा विचार केला तर अंतर्नादचे स्वरूप उघडउघड वेगळे होते पण व्यावसायिक पातळीवर विचार केला तर त्यांच्यासारखे काहीतरी मराठीत निर्माण करायची एक सुप्त इच्छा मनात होती. इतरही अनेक कल्पना होत्या, पण स्वप्नात होते तसे स्वरूप अंतर्नादला प्रत्यक्षात लाभू शकले नाही हे कबूल करायला आता काहीच हरकत नाही. साहित्याच्या पडत्या काळात आपण अनेक लेखकांना व्यासपीठ पुरवू शकलो आणि वाचनाचा आनंद आपल्या वाचकांपर्यंत अनेक वर्षे पोचवू शकलो हाच तेवढा त्यातल्या त्यात समाधानाचा भाग, 'एका माणसाने चालवलेली सर्कस असे मराठी मासिकांचे वर्णन केले गेले आहे. काही प्रमाणात ते खरेही असले तरी निदान अंतर्नादच्या बाबतीत तरी ते पूर्णतः खरे नाही. कारण अनेकांची बहुमोल मदत या उपक्रमात वेळोवेळी होत गेली. अर्थात एकूण परिस्थितीच इतकी प्रतिकूल होती की कुठलीही मदत तशी अपुरीच ठरणारी होती; पण त्यामुळे त्या मदतीचे मूल्य कमी होत नाही. अजातशत्रुत्व ही संपादनक्षेत्रासाठी तरी नक्कीच कविकल्पना आहे. एखाद्याची राजकीय विचारसरणी, वैयक्तिक संबंध किंवा अन्य कुठलाही साहित्यबाह्य निकष निदान जाणीवपूर्वक तरी न लावता अंतर्नाद साहित्यनिवड करत होते पण तरीही एकाचे साहित्य प्रकाशनार्थ स्वीकारताना इतर किमान पाच-सहा जणांचे साहित्य नाकारावे लागत होते. ज्यांचे साहित्य नाकारले गेले ते काहीसे दुखावले जाणे स्वाभाविक आहे. 'साहित्याचा अस्वीकार हा आपला अस्वीकार' असेही दुर्दैवाने कधीकधी मानले जाते. ज्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संबंध येतो त्यांच्या साहित्याचा अधिक प्राधान्याने विचार केला जातो आणि ज्यांच्या थेट संपर्कात आपण येत नाही, ज्यांच्याकडून लेखन मागवत नाही त्यांच्या मनात डावलले गेल्याची आणि या मासिकाने आपली उचित दखल घेतली नाही अशी भावना निर्माण होते. त्यामुळेही काही मंडळी दुखावली जाणे सहजशक्य आहे. शिवाय आपली केमिस्ट्री सगळ्यांशीच जुळेल असेही नसतेच. अर्थात माझ्या चुकांमुळेही काही जण दुखावले गेले असणे शक्य आहे. त्यांची इथे क्षमा मागतो. काही मित्र नेमके का दुरावले हे मलाही खरे तर कधीच कळले नाही. अर्थात अशांची संख्या खूप कमी आहे. शिवाय जीवनाच्या अन्य कुठल्याही क्षेत्रात आणि अन्य कोणाच्याही बाबतीत हे घडू शकते. हे संपादकीय म्हणजे अंतर्नादचे मूल्यमापन करायचे स्थान नव्हे. या सर्व प्रवासाबद्दल केव्हातरी विस्ताराने लिहायला हवे, त्यात मी जवळून बघितलेले साहित्यविश्वही ओघाने येईल; पण त्यासाठी अजून थोडे दिवस जायला हवेत असे वाटते. आज ते दिवस डोळ्यांसमोर अगदी ताजे आहेत. चित्रापासून थोडे दूर उभे राहिल्यावर ते चित्र अधिक यथायोग्य दिसते असे म्हणतात. अनुभवाच्या बाबतीतही ते खरे असावे. शिवाय तशा ८ निवडक अंतर्नाद प्रकारचे लेखन हा खरे तर स्वतंत्र पुस्तकाचाच विषय आहे. आज एवढेच सांगता येईल की या सव्वीस सत्तावीस वर्षांच्या प्रवासात आम्ही अनेक चांगल्या माणसांशी जोडले गेलो. त्यांतील काहींशी साधली गेलेली आणि आजही टिकून राहिलेली जवळीक फारच मोलाची आहे; ती आयुष्यातून वजा झाली तर आम्ही खूप गरीब होऊ, व्यक्तिगत आयुष्याला सार्थकता देणारे अनेक क्षण वाट्याला आले. माझे आणि वर्षांचे जीवन अंतर्नादने समृद्ध केले. काळाच्या ओघात अडचणींच्या स्मृती विरून जातील, अपयशाचे शल्य पुसट होत जाईल आणि समाधानाची भावना अधिक जास्त टिकेल अशी आशा आहे. अंतर्नादचा शेवटचा अंक प्रकाशित झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यांतील 'अंतर्नादपर्व' हा ललित दिवाळी २०२० अंकातील स्नेहा अवसरीकर यांचा लेख आणि 'अंतर्नादचा पूर्णविराम' हा साधना साप्ताहिकाच्या २० मार्च २०२१ अंकातील रवी गोडबोले यांचा लेख यांनी आमचे लक्ष विशेष वेधून घेतले. स्नेहा अवसरीकर अंतर्नादच्या दीर्घकाळच्या सहकारी तर रवी गोडबोले सजग वाचक आणि भारतात आले की न चुकता भेटून जाणारे पण आपण असे काही लिहिणार आहोत याची त्या दोघांनीही आम्हाला जराही पूर्वकल्पना दिली नव्हती, संपादक अशोक कोठावळे आणि विनोद शिरसाठ यांनीही तसे काही लेख प्रकाशित होणार आहेत असे कधीच सांगितले नव्हते. साहजिकच जेव्हा ते अंक प्रत्यक्ष हाती आले, तेव्हा ते लेख वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मुळात बरेच विस्तृत असलेले ते लेख संक्षेपित करून या संकलनात घेतले आहेत. संकलनाच्या एकूण स्वरूपाला ते पूरक ठरतील असे वाटल्यामुळे त्यासाठी संबंधित लेखकांनी आणि संपादकांनी अनुमती दिली याबद्दल त्यांचे मनापासून आभार, ●अंतर्नादचे दीर्घकाळ वाचक, लेखक व हितचिंतक असलेले विवेक सावंत, दत्ता दामोदर नायक, अनिल जोशी, नीलिमा गुंडी, दत्तप्रसाद दाभोळकर, सुरेश द्वादशीवर, ज्ञानेश्वर मुळे आणि नागनाथ कोत्तापल्ले यांनी पाठराखण या स्वरूपात काही मजकूर, आमच्या विनंतीवरून, अगदी अल्प मुदतीत लिहून दिला याबद्दल त्यांचेही मनापासून आभार या संकलनाचे अक्षरलेखन आणि मुखपृष्ठ करणारे हरीश घाटपांडे आणि मुद्रण करणारे अजित ठोंबरे यांनाही खास धन्यवाद. अंतर्नादच्या लेखकांनी वर्गणीदारांनी, जाहिरातदारांनी, विक्रेत्यांनी व अन्य व्यावसायिक संबंधितांनी आजवर चांगले सहकार्य दिले. त्या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो. नावानिशी उल्लेख करणे स्थाभावी टाळले असले तरी त्यांच्याविषयी आमच्या मनात कृतज्ञता आहे आणि ती भविष्यातही कायमच राहील. या सर्वांना आपापल्या अंतर्नादाप्रमाणे फुलण्याचे व बहरण्याचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करून निरोप घेतो.