पान:निवडक अंतर्नाद.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक अनुभव : दोन कथा विजय पाडळकर आणि मधुकर धर्मापुरीकर हे दोघे लेखक नोकरीनिमित्त आपापल्या कुटुंबापासून दूर राहात असतात. एका भेटीत एक अनुभव गप्पांत येतो आणि जाणवते, की यात एक कथाबीज आहे. तोच अनुभव केंद्रस्थानी ठेवून दोघेही आपापल्या कथा लिहितात. त्या दोन जुळ्या कथा आणि त्यांच्या जन्माची आगळी कहाणी. प्रास्ताविक विजय पाडळकर आपण जगत असतो. एक क्षण आपल्यासमोर येतो, आपल्यावरून ओघळून जातो. पानावर पडलेल्या थेंबासारखा आपण तिथेच, तसेच, पण कधीकधी समोरचा क्षण आपल्या साऱ्या अस्तित्वालाच कवेत घेतो. आपण त्यात विरघळून जातो. असा मनाला सौंदर्याच्या स्पर्शानी प्रकाशित करणारा अनुभव कधी प्रत्यक्षात येतो. कधी कुणा कलावंताच्या जादूमय शब्दांतून येतो. कधी कुणा सुहृदाच्या मनमोकळ्या भेटीतूनही येतो. काही दिवसांपूर्वी असेच झाले. मधुकर धर्मापुरीकर माझे मित्र, कथेवर मनापासून प्रेम करणारे व स्वतःही चांगले कथाकार, व्यवसायपरत्वे आम्ही वेगवेगळ्या गावी असलो, तरी जेव्हा भेटतो तेव्हा कथेबद्दल भरभरून बोलतो, पत्रातून एकमेकांना लिहितो ते कथेबद्दलच बोलण्यात असंख्य संदर्भ असतात, मी वाचलेली एखादी अफलातून कथा, धर्मापुरीकरांच्या मनात असलेली कथाबीज, संपादकांची कथा स्वीकारल्याची वा साभार परतीची पत्रे, आणि या साऱ्यामागे एक धागा असतो- कथा जन्मते कशी, ती फुलते कशी आणि पूर्ण कशी होते याचा शोध घेणे. कथांच्या पायवाटांवरला हा विलक्षण आनंददायी प्रवास मी अनेकदा त्यांच्या सोबतीने केला आहे. त्या दिवशी गप्पा मारताना सहज धर्मापुरीकरांनी त्यांचा एक अनुभव सांगितला नोकरीनिमित्त ते गंगाखेडला असतात, पत्नी आणि मुले नांदेडला. दर आठवड्याला ते नांदेडला येतात. एकदा त्यांनी ठरविले की बायकापोरांनाच नोकरीच्या गावी न्यायचे. तिथे एका छोट्या खोलीत त्यांनी संसार थाटलेला. बदल म्हणून सारे त्या सुटीच्या दिवशी गंगाखेडला जमले, परततांना वहिनींनी (सौ. धर्मापुरीकरांनी) सुगृहिणीप्रमाणे नवऱ्याची आठवड्याची तयारी करून ठेवली. खोली स्वच्छ केली. डब्यात पीठ भरून ठेवले. दोन दिवसांनंतर साऱ्यांना धर्मापुरीकरांनी नांदेडला परत पाठविले. दुसऱ्या दिवशी खोलीवर नेहमीप्रमाणे स्वयंपाक करताना पोळ्या करण्यासाठी डबा उघडला, तेव्हा धर्मापुरीकर पाहातच राहिले. पिठावर बायकोच्या हाताचा स्पष्ट ठसा उमटला होता! धर्मापुरीकर हे सांगत होते व माझ्या नजरेसमोर तो ठसा एकदम ९२ • निवडक अंतर्नाद एक प्रतीक म्हणून चमकला. मी थरारून गेलो. कुठेतरी खोल माझ्या मनात तो ठसा उमटला. 'डॉ. झिवागो कादंबरीतील एका प्रसंगाची आठवण झाली. डॉ. झिवागोपासून लारा कायमची दूर गेलेली असते. वियोगाच्या क्षणाच्या त्या आघाताने झिवागो सुन्न होऊन गेला आहे. त्याला काहीच सुचत नाही. घरात येऊन गुदमरल्यासारखा बसून राहतो. सहज चाला म्हणून तिच्या वस्तू नीटनेटक्या ठेवताना अचानक तिची शिवणकामाची सुई त्याच्या हातात कचकन घुसते. तो विव्हल होऊन रडू लागतो. हे आठवले आणि मी अचानक म्हणालो, 'धर्मापुरीकर, ही तर एक उत्तम कथा आहे.' ती संध्याकाळ आम्ही केवळ या अनुभवावर बोलत होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही आपापल्या गावी परतलो, पण मनातला तो ठसा सारखा अस्वस्थ करू लागला. त्या दृष्याशी मी एवढा एकाकार झालो की मला तो माझाच अनुभव वाटू लागला. असे होण्यास आणखी एक कारण होते. मीसुद्धा माझ्या कुटुंबापासून दूर एकटा राहत होतो. माझे घर नांदेडला होते व मी सोलापूरला, एकटेपणाचा, वियोगाचा अनुभव मीही एवढ्याच उत्कटतेने भोगत होतो. आणि अशाच एका उत्कट क्षणी, दूरदेशी राहून घर आठवतांना मला आतून वाटून गेले की आपणही या थीमवर कथा लिहावी. पहिला विचार असा आला की दुसऱ्याच्या अनुभवावर चांगली कथा लिहिता येईल का ? पण खरे तर हा अनुभव केवळ 'दुसऱ्याचा' असा त्यावर शिक्का मारणेही योग्य नव्हते. या अनुभवाशी आता माझे नाते जुळले नव्हते का? आणि म्हणून तो माझाच झाला नव्हता का? पण कितीही केले तरी ही उसनी घेतलेली कल्पना आहे असे मनाला वाटत होतेच, तसे हे कथाबीजही मनातून जात नव्हते. मग विचार करताना कधीतरी अॅरिस्टॉटलचे वाक्य आठवले : “While telling a tale each man adds something to it and that increases the pleasure.” मग पुढला मार्ग स्पष्ट दिसला. किंवा खरेच सांगायचे म्हणजे अस्पष्ट दिसला. कारण दिशा कळली होती, अजून जिथे पोहचायचे तिथे पोहचू