पान:निवडक अंतर्नाद.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"दोन?" "एक बंटीचं आणि एक जावईबापूंचं" "कुठे आहेत?" "तुझ्या बाबांनी मला सांगितलं बघ बाहेरच्या खोलीत असतील.” रेणू लगबगीने उठली. बाहेर येऊन तिने टेबलावर पाहिले. तिथे पत्रे नव्हती. पलंगावरही काही नव्हते. "आईऽऽ 'कुठे ठेवलीत गं बाबांनी ?” "मला तरी काय माहीत.... नाहीतर हे येतीलच देवळातून. त्यांनाच विचार. " आज गुरुवार आज बहुतेक रमेशचे पत्र येतेच. पण बंटीचे पत्र म्हणजे विशेष होते, काय असेल बरे पत्रात ? ती विचार करू लागली. तिला गेल्या शनिवारची आठवण झाली. शनिवारी तिचा नांदेडला जाण्याचा प्रोग्रॅम ठरलेला असतो. पण यावेळी बदल म्हणून रमेश म्हणाला होता की सारेजण गंगाखेडलाच या म्हणून. मग शनिवारी ती लवकर नांदेडला गेली होती. तिथून बंटीला घेऊन रमेशकडे गंगाखेडला. तो एक दिवस आणि दोन रात्रीचा काळ तिच्या नजरेसमोर लख्खपणे उभा राहिला. खरे तर अजून ती बाहेर पडलीच नव्हती. जाण्यापूर्वी काही ठरविले नव्हते. असे काही ठरविले की हमखास फिसकटते असा तिचा अनुभव होता. बस! तिघांनी मिळून एका नव्या ठिकाणी आनंदात दिवस घालवायचा, एवढेच. रमेशची बदली नुकतीच गंगाखेडला झाली असल्याने ती तेथे प्रथमच जात होती, त्याची खोली, त्याचा पसारा, शेजारी-पाजारी, गाव याबद्दल त्याच्या तोंडून ऐकले होते. प्रत्यक्ष तिने ज्यावेळी रमेशची खोली पाहिली तेव्हा तिला गंमत वाटली. एका मोठ्या वाड्यातला अनेक खोल्यांपैकी ती एक खोली होती. इटुकली. भिंतीला पलंग उभा करून ठेवला होता; तो यकला की अर्धी खोली भरून गेली. दुसऱ्या भिंतीत असलेल्या उघड्या कप्प्यात दोन पिठाचे डबे, तिखटमिठाचा गोल डबा, दोन चहा साखरेचे डबे, एक दोन पातेली, तांब्या-पेला, ताटवाटी असा लहानसा संसार होता. खाली स्टोव्ह ठेवलेला. त्यावर पाणी तापवायचे अॅल्युमिनीयमचे भांडे, शेजारी दीड लिटरचा कुकर, पाण्याची बादली व कळशी, भिंतीवर जुही चावलाचे कॅलेंडर तिरप्या कोपयांना जोडणारी एक दोरी बांधून तिच्यावर लटकत यकलेले कपडे. पलंगाशेजारच्या कपाटात चार पुस्तके आणि पॉकेट रेडिओ, "कसा काय वाटला आमचा संसार ?” "मी लहान असताना बाबांनी मला पितळेचा खेळ आणून दिला होता छोटा छोटा, तसाच तुमचा संसार वाटतो, " तुमचा ह्या शब्दावर जोर देत ती कौतुकाने हसून म्हणाली, .... हा संसार रमेशचा म्हणजे आपलाच की! पण किती नवीन ९४ निवडक अंतर्नाद वाटतोय. लग्न झाल्यावर प्रथम सासरी आलेल्या दिवसांची तिला आठवण झाली. रमेश आणि बंटीच्या गप्पा चालू होत्या. "बाबा, तुम्हाला आता पोळ्या चांगल्या करता येतात?" "एकदम बेस्ट गोल गरगरीत. अगदी तुझ्या आईसारख्या !” "मी गोल गरगरीत आहे होय?" "तुझ्यासारख्या म्हणजे तू करतेस त्या पोळ्यांसारख्या!” “अच्छा अच्छा! बरं, आम्हाला चहा तरी पाजा, लांबून आलोय आम्ही!" "अवश्य, दूध घेऊन ठेवलंय मी सकाळीच,” रमेश म्हणाला. आणि रमेशने स्टोव्ह पेटवायला सुरुवात केली. स्टोव्हशी खटपट करणाऱ्या रमेशकडे पाहून तिचे मन भरून आले. आपण बाई असून सकाळ संध्याकाळ चुलीसमोर बसणे किती कंटाळवाणे वाटते हे तिला ठाऊक होते. "सरका तुम्ही, मी करते चहा, " ती म्हणाली, "नको नको, मी करतो की, तू बैस पाच मिनिटं निवांत.” "उठा बरं, " तिने त्याला हात धरून उठविले आणि सारे घरच जणू ताब्यात घेतले... रात्रीच्या जेवणासाठी रेणूने दशम्या आणल्या होत्या. त्या सगळ्यांनी दुधाबरोबर खाल्ल्या तिघेजणही कितीतरी दिवसांनी एकाच ताटात जेवायला बसले. तिला रमेशबरोबर जेवायला फार आवडते. कारण पोळ्या कुस्करणे, कालवणे वगैरे सारे तो करतो. तिचे काम फक्त मुटुमुटु घास गिळणे एवढेच राहते. त्याने कुस्करलेल्या पोळीला चवही छान येते. चार घास जास्त जातात, नांदेडला किंवा तिच्या माहेरी अशी संधी मिळत नाही. जेवणे झाल्यावर भांडी घासण्यासाठी तिने आवराआवर सुरू केली; तेव्हा रमेश म्हणाला, "राहू दे, सकाळी घासता येईल. झोपू आता. " त्याच्या आवाजातील उत्कंठा तिला जाणवली. त्याने हातात घेतलेला हात हलकेच सोडवून घेत ती हळूच म्हणाली, "थांबा थोडं, मी आता आवरते. तोवर बंटीही झोपेल. " बंटी प्रवासाने पेंगुळला होता. नाहीतर आतापर्यंत त्याची बडबड अखंड चालू राहिली असती. तिने चटचट भांडी विसळून टाकली. बंटीला जवळ घेऊन त्याला थोडेसे थापटले की तो झोपलाही तिने त्याला नीट निजविले. त्याच्या अंगावर पांघरुण घातले, लाईट बंद कैला व ती रमेशला अधीरपणे सामोरी झाली. दुसऱ्या दिवशी तिला सकाळीच जाग आली. तिने आजूबाजूला पाहिले. खोलीतली प्रत्येक वस्तू आता खूप जुन्या ओळखीची वाटू लागली होती. तिला वाटले, शेवटी कुठलीही जागा म्हणजे काय असते? आपल्या मनाची अवस्थाच मन काळजीतून मुक्त असेल, ताजेतवाने असेल आणि सोबतीला आपली प्रिय माणसे असतील तर साऱ्याच गोष्टींना लोलकातून