पान:निवडक अंतर्नाद.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाहिल्यासारखे रंगीबेरंगी आवरण लाभते. किरकोळ गोष्टीही आनंद देऊन जातात. किती साध्या साध्या गोष्टींनी आपण सुखावतो. पण त्याही मनजोगत्या मिळत नाहीत, त्यासाठी तरसावे लागते. उद्या परत निघायचे. पुन्हा तोच एकटेपणाचा आठवडा समोर, ह्या विचारांनी क्षणभर तिचे मन खिन्न झाले. पण लगेच हे विचार तिने मनातून झटकून टाकले. आजतरी असा मूड नको. तेवढ्यात कुणीतरी दार ठोठावले. उघडून पाहिले तर दारात दूधवाली उभी होती. "काय वैनीबाई, कवा आलाव?" "काल संध्याकाळी. " "हावा आता चार दिवस सायबांनी एकटं एकटं किती हावं?” "कसलं राहणं होतंय! नोकरी आहे ना उद्या सकाळी जावंच लागेल." दुपारी घरमालकाकडे जेवायला बोलावले होते. तिथेही तोच विषय मालकीणबाई जेवताना म्हणाल्या, "साहेबांनी किती दिवस ह्यताने करून खायचं? तसा काही सणवार असला, सुट्टी नसली आणि साहेब इथे असले, की मी जेवायला बोलावतेच. पण आपलं घर म्हणजे वेगळंच असतं आणि पुरुषांना एकटं राहवत नाही.” "त्यांना काय होतंय ?” घरमालक म्हणाले. 'मस्त आठ वाजेपर्यंत झोपतात, मनाला आलं तर स्वैपाक करायचा नाहीतर हॉटेलात जाऊन जेवायचं! कसलं झंझट नाही. रात्री फर्स्टक्लास गाणी लावत बसतात अकरा- बारापर्यंत. " "तुम्हाला नाही कळणार तुम्ही एकटं राहून पहा म्हणजे समजेल." "मग तुला कसं कळतं?" "बायकांच्या लक्षात येतात अशा गोष्टी ! वहिनी इथे येऊ द्या. मग रात्री बाराला गाणी कशी सुचतात बघते मी!" रविवारचा दिवस तर कसा निघून गेला, कळलेच नाही. दुपारी रेणूने स्वच्छता मोहीम सुरू केली. खोली वच्छ धुवून काढली. तांबे, पेले चकचकीत घासून ठेवले, कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या. रमेशने गव्हाचे चुंगडे आणून ठेवलेले तिला दिसले होते. तिने रमेशला विचारले, "दळण आणताना गहू निवडून घेता की तसेच ?” "ऊ! कोण निवडीत बसलंय. गव्हाबरोबर थोडे खडे आणि किडे पोटात जातील फार तर !” तिला ते ठाऊक होतेच. दुपारी तिने गहू निवडून ठेवले. दळण आणून पीठ डब्यात भरले. रमेश सारखा कुरकुर करीत होता. "बाई, तू एक दिवसासाठी आलीस, जरा निवांत बस की, इथे तरी आराम कर थोडा. " " या कामाचं काही नाही वाटत हो; तुम्ही एवढं म्हणालात की सगळा शीण निघून जातो.” "पण तुझ्याकडे पहाता पहाता मलाच थकल्यासारखं व्हायला लागलंय त्याचं काय?" रमेशची ही कॉमेंट आठवली आणि रेणूला खुट्कन हसू आले. एकमेकांसोबत घालविलेला तो दिवस परतताना जड झालेली पावले, घशात दाटलेले शब्द, हे सारे तिला आठवले. मन साऱ्या स्मृतींनी ओझावून गेले होते. तेवढ्यात बाबा बाहेरून आले. " "बाबा, माझी पत्र आली होती ना?" "ती काय तिथे ठेवलीत. रेडिओखाली. " "रेडिओखाली होय? मी सगळीकडे शोधली.” पत्रे घेऊन रेणू गच्चीवर गेली. रमेशचे पत्र आले की ती गच्चीवरच नेऊन वाचते. प्रथम तिने बंटीचे पत्र वाचले. बंटीने पोस्टकार्डवर मोठ्या मोठ्या अक्षरांत लिहिले होते आज आमची परीक्षा झाली. माझा पहिला नंबर आला, आपण बाबांकडे गेलो होतो, तेव्हा बाबांनी मला कविता समजावून सांगितली होती. तीच टीचरनी विचारली, बाबा किती छान कविता म्हणतात. समजावतात. तिथे खूप मजा आली. आपण पुन्हा एकदा जाऊ का तिथे?... रमेशचे पत्र नेहमीप्रमाणे लांबलचक होते. पत्र वाचताना तिला फार गंमत वाटली. तिला आता जे जे आठवले होते, तेच नेमके रमेशने लिहिले होते. मनाच्या तारा जुळलेल्या असल्या की सारेच जुळते, पत्राच्या शेवटी रमेशने लिहिले होते, काल सकाळी तू परत गेलीस. मी तुला सोडायला स्टँडवर आलो होतो. तिथून परस्पर ऑफिसला गेलो. संध्याकाळी खोलीवर परतलो. तू आलीस आणि माझ्या खोलीचा कायापालटच होऊन गेला. आजवर ही खोली फक्त माझी होती. आता ती आपल्या दोघांची झाली. खोलीवर फिरलेला तुझा हात मला सर्वत्र दिसू लागला आहे. दोरीवर व्यवस्थित ठेवलेले कपडे, लख्ख घासलेले तांब्या- पेले... तू होतीस तेव्हा तुझ्या असण्याने खोली भरून गेली होती. आज तू इथे नाहीस. परंतु तुझ्या आठवणींनी खोली तितकीच भरून गेली आहे. रात्री स्वयंपाक करण्यासाठी बसलो, स्टोव्ह पेटविला, कपाटातून पिठाचा डबा काढला आणि उघडून पाहतो तर माझ्या अंगावर सरसरून शहारा आला. डब्यात मावावे म्हणून तू पीठ दाबून बसविले होते. तसे दाबताना तुझ्या हातांचा ठसा त्या पिठावर स्पष्ट उमटला होता. अगदी रेष अन् रेषेसह, मी त्या ठश्याकडे पहातच राहिलो. तो केवळ पिठावरला ठसा नव्हता. माझ्या एकटेपणावर तुझ्या अस्तित्वाचा उमटलेला तो ठसा होता, पीठ काढून तो मोडण्याचे धैर्य मला झाले नाही... वाचता वाचता रेणूचे डोळे भरून आले. कातरवेळीच्या संधिप्रकाशात ती मूकपणे बसून राहिली. (दिवाळी १९९६) निवडक अंतर्नाद ९५