पान:निवडक अंतर्नाद.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुझ्यातली... तू मधुकर धर्मापुरीकर दूरचं दिसत नाही आणि जवळचं दिसतं हा डोळ्यांचा अनुभव मनाच्या किती उलटा असतो! नाही समजलं? इतक्या जवळचं असून तुला समजत नाही म्हणजे आणखी एक गंमतच. सरळच सांगतो. तुला, पोरांना सोडून मी इथं नोकरीच्या गावाला राहतो, शनिवार, रविवारी तुम्हाला भेटतो. तुझ्या संगतीत राहतो आणि मग इथे येतो आठवड्यासाठी. इथे मग तुझ्या भेटीचे सर्व तपशील लख्ख आठवत रहातात मला. तू इतकी स्पष्ट दिसत असतेस की - की वाटत रहातं, अरे हीच का ती? आणि मग माझा बेचैन करणारा खेळ सुरू होतो. तुझ्यातली तू कशी असतेस याचा शोध मी इथे नोकरीच्या गावाला आलो, की घेत असतो. का घेत असतो मी हा शोध ?.... कदाचित एकटेपणाचा चाळा असेल हा. कधी वाटतं, नाही, ह्य चाळा नाहीच. इथं एकटेपणात जेव्हा तू आठवतेस, तुझं वागणं- बोलणं आठवत रहातं तेव्हा त्या त्या वागण्या-बोलण्याच्या अनुषंगाने सुचलेले वेगळे प्रश्न, वेगळी उत्तरं मला इथं खेळवीत रहातात. आपण हे तेव्हाच का नाही विचारलं, का नाही सांगितलं, असे हे प्रश्न असतात. तुझ्या बोलण्याचे वेगळे अर्थ मला इथं जाणवत राहतात; तुझ्या वागण्यातले, वावरण्यातले, हसण्यातले, गप्पपणातले त्या त्या वेळी मला न जाणवलेले रंग आता इथे स्पष्ट होतात, गुंतवून टाकतात. ऑफिसचं काम करण्यात गुंतून जावं तसा मी गुंतून जातो. पण फरक असतो त्यात तुझ्यातल्या तुला शोधताना, त्यात गुंतल्यावर त्यातून बाहेर पडावसंच वाटत नाही. आणि तू सापडतेस तरी कुठं? काहीतरी धागेदोरे - गोड धागेदोरे सापडतात. हे म्हणजे साखरेच्या गाठीतल्या दोन्यासारखे आणि गाठीची पदकं म्हणजे सोमवार ते शनिवार आणि रविवार म्हणजे... अं! उगी लांबण लावू नका - मुद्दा सांगा! असंच म्हणतेस ना तू? पण माझ्या गप्पा तुला ऐकाव्याशा वाटतात. त्यातला मध तू गोळा करीत असतेस. मला माहीत आहे आणि मी घोंगावणाऱ्या माशी ( राजा माशी ?) सारखा बोलतच राहतो, बोलतच रहातो... आणि मग इथं आलं की शोधतच रहातो. तुझ्याबद्दलच्या समजुतींचे हे गोड धागेदोरे घेऊन मी शनिवारी संध्याकाळी गाठतो तुला. भलताच अवखळ होतो. काहीच सुचत नाही. तू फक्त हसतेस आणि मी धिंगाणा घालतो पोरांबरोबर, फुगडी खेळू का तुझ्याबरोबर, हे विचारून एकदा बोलणं खाल्लं होतं. पोरं हसत होती. बाबांच्या वेडेपणाला! हेच, हेच मला शोधायचं असतं. चांगलं हसता बोलता तू एकदम डोळे वटारून मला बोलतेस... सोबत आणलेले ते गोड धागेदोरे केव्हाच निसटलेले असतात...... मी गप्प बसलो की तू हळूच जवळ येतेस. कधी म्हणतेस, ९६ निवडक अंतर्नाद "एलआयसीच्या हप्त्याची नोटीस आलीय, ड्यू लागेल.” ती नोटीस तू हातात अशा तऱ्हेने धरतेस, अन् अशा मजेदार गंभीर चेहऱ्याने तू म्हणत असतेस की वाटतं ड्यू लागला तरी हरकत नाही- तू असंच ती नोटीस धरून, असंच सांगत रहावं... काटकसर हा तर फार मजेदार खेळ आहे आपला. मला तू • नेहमीच बाद करतेस आणि या विषयावर तुझं बोलणं मला खावं वाटतं! हे म्हणजे भिडूनं सफाईनं दूर पळण्याऐवजी सूर मारून उलट जवळ येणं; नाही का? पण तुझ्या त्या काटकसरी चेहऱ्यात मी हरवतो. अरे ही कोण? परवा तू मोत्यांच्या बांगड्या, ती घोळदार साडी, तो गजरा घालून एकदम समोर आलीस. मी दाढी करीत होतो. पहातच राहिलो. "जोशींच्या इथे लग्न आहे, नऊ तीसला" एवढं म्हणून हसून आणि पायात चप्पल सारून गेलीससुद्धा. ते हसणं... ते हसणं अशाच प्रसंगात मला सापडतं. पुन्हा गुंतलो. गालावरचा साबण वाळला. पण ते हसणं - असं कसं हसतेस गं तू? ते हसणं तुझंच असतं का ? – की ती हसणारी दुसरी कोण? आणि तुझ्या ठेंगण्या उंचीत ठेवणीतल्या साडीत तू किती लहान दिसतेस - माझ्या एकदम अर्ध्या वयाची! आजच्या पिढीतल्या पोरी ठेंगण्याच का? हा माझा विषय आहे संशोधनाचा - तू म्हणतेस आगाऊपणाचा! आणि रडणंसुद्धा त्या शनिवारी संध्याकाळी आलो, तर चप्पलसुद्धा काढू दिली नाहीस. "चला बरं डॉक्टरकडे, अंगठ्याचा फोड ठसठसतोय हो सकाळपासून" - म्हणालीस. माझी वाट पहात होतीस, साडी बदलून तयार होऊन. मी निघालो, तुझ्याबरोबर निघायला मला खुषी झाली होती. विशेष म्हणजे तू "रेडिमेड” तयार होतीस नं म्हणून. नाहीतर एरवी तुझं ते तयार होणं आणि माझी ती तणावपूर्ण शांतता! "तुम्हाला थट्टा सुचते, इथं मला किती त्रास होतो!” तुझ्या डोळ्यांतली वेदना पाहिली आणि कधी कधी थट्टा केल्याबद्दल वाईट वाटतं नं तसं वाटलं, ती वेदना, तो चेहरापण नवा होता मला. मी गप्प राहून शोधू लागलो. डॉक्टरने त्या पिकलेल्या अंगठ्याला हात लावला मात्र - चटका बसल्यासारखा तू हात मागे घेतलास. अगदी हळूवार वागणं, बोलणं झालं तुझं. मी पहात होतो - आणि डॉक्टरनं ड्रेसिंगला सुरुवात केली, की तुझ्या तोंडून वेदनेने बाहेर आलेले ते शब्द, ते विव्हळणं! नेहमीच्या शुद्ध भाषेतले स्पष्ट शब्द नव्हतेच ते. "आईऽऽ नको होऽऽ हळू- डॉक्टर दुखतंय हो फार” आणि त्या शब्दांना कंप, रडवेला आवाज, असंबद्ध मी पहात होतो. छान फुलाफुलांची पांढरी गुलाबी साडी, गोरा चेहरा, कुंकवाची टिकली