पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 मुलींचे पालक ऊसतोडीसाठी गेले की किमान पाच - सहा महिने बाहेरच असतात. या काळात या अडनिड्या वयातल्या मुली गावात एकट्या राहतात. काही घरांत सोबत वृद्ध आजी-आजोबा असतात. याचा फायदा शेजारी, नातेवाईक, गावगुंड घेतात. मुलींना स्पर्श करणं, लगट करणं या घटना नेहमीच्या होतात. अशा ओळखीतून फसवून बलात्कारही होतात. मुलींना पळवण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या शरीराविषयी, बदलांविषयी, गभधारणेच्या प्रकियेविषयी सांगणं गरजेचं होतं. नेमकं तेच काम जयश्रीताईंनी जबाबदारीनं पार पाडलं. या मुलींना आधी विश्वासात घेणं गरजच होतं. त्यामुळे प्रशिक्षणात त्या थोडी वेगळी कल्पना राबवायच्या. सुरुवात स्वत:पासून, स्वत:च्या कुमारवयातील अनुभवांपासून करायच्या. त्यामुळे मुली लवकर मोकळ्या व्हायच्या. अवघडेपण दूर व्हायचं आणि एखाद्या मैत्रिणीला सांगावेत. तशा मुली स्वत:चे अनुभव सांगू लागायच्या. मग काम सोपं व्हायचं. त्यांनी काही तक्ते आणि चित्रे यांचा वापर प्रशिणिासाठी केला. आपलं शरीर नेकं कसं आहे. वयात येताना त्यात काय बदल हातात आणि गर्भधारणा होते, म्हणजेच नेमके काय होते, हे त्या चित्रांचा वापर करुन त्या मुलींना सांगायच्या. हे खूप परिणामकारक व्हायचं. मुली बारकाईने ऐकायच्या समजून घ्यायच्या. परक्या अनोळखी पुरुषांशी कसं वागावं. याची जाण मुलींना आली. कुणी अनावश्यक लगट करत असेल. कुणी विनाकारण भेटी आणत असेल तर सावध का व्हायचं. जवळचे नातेवाईक कसे शोषण करु शकतात. अशा सगळ्या बाजू त्या मुलींना सांगत. त्यामुळे मुली अधिक सजग झाल्या.
 शिरुर तालुक्यात छोटी गावे आणि वाड्या-वस्त्या भरपूर आहेत. मुलींना शाळेसाठी दुसऱ्या गावात जावे लागते. बहुतेक ठिकाणी वाहनाची सोय नाही. त्यामुळे बहुतांश शाळकरी मुली दररोज पायी चार-पाच किलोमीटर अंतर पार करतात. रस्त्यात मुलींना अडवणं. त्राण देणं. विनयभंग, छेडछाड असे प्रकार घडतात. आई-वडील बाहेरगावी असतात. मुलींनी तक्रार करावी तर कुठे, हा प्रश्न असतात. दबावही असतो. त्यांच्यावर. त्यामुळे त्या गप्प बसून सहन करतात. या प्रशिक्षणात मुलींना शाळेच्या वाटेवरची छेडछाड कशी रोखायची हेही सांगितलं गेलं. वेळ पडली तर मोठ्याने ओरडनं, डोळ्यांत तिखटाची पूड फेकणं, चिमटे काढणं, चावणं यातूनही प्रतिकार होऊ शकतो याची जाणीव दिली. मुलींना आता आत्मविश्वास आला आहे. न घाबरता त्या घरात, गावात, शाळेत वावरू लागल्या आहेत.
 जयश्रीताईंनी प्रशिक्षण शिबिरांची एक पध्दत ठरवून घेतली होती.