या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८५७ च्या वीर महिला । ११५

 आम्ही काही तरी विशेष करून दाखविलेले आहे अशा प्रकारची प्रेरणा इतिहासातून घेऊन वर्तमानकालात जगणारे जे लोक असतात त्यांच्यांत त्यांची गणना करता येईल. एक ध्येयवादी जीवन त्यांनी घालविले आहे. जन्मभर काही निष्ठा मनात बाळगून त्यांना जोपासण्यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. स्पष्ट-अस्पष्टपणे, हिंदूंच्या लष्करीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ते वागले आहेत. प्राचीन भारतातील विक्रमादित्याविषयी, मध्ययुगातील रजपूत, शीख व मराठे यांच्याविषयी आणि मध्ययुगाच्या समाप्तीवर उभे असणाऱ्या सत्तावन्न सालाविषयी त्यांना ज्वलंत अभिमान असावा ही गोष्ट स्वाभाविक आहे. या दृष्टीनेच त्यांच्या सदर पुस्तकाकडे पाहिले पाहिजे. सत्तावन्न साली ज्या स्त्रियांनी आपले कर्तृत्व दाखविले त्यांना दिलेली ही एक प्रकारे पुढच्या शतकाची अभिवंदना आहे. अशाही पुस्तकांची नेहमीच राष्ट्राला गरज असते. सत्य ही जीवनातील फार मूल्यवान निष्ठा आहे हे मान्य करूनही माणूसप्राणी राष्ट्र म्हणून जिद्दीने जगात तो उभा राहतो तो केवळ पुरावा आणि तर्क यांनी उभ्या केलेल्या सत्याच्या आधारे नव्हे. अभिमानस्थाने, श्रद्धास्थाने, भावनेला आवाहन करणाऱ्या काही जागा यांची समाजाला गरज असतेच. या दृष्टीने ह. वा. देशपांडे यांनी एक वाचनीय, स्फूर्तिप्रद पुस्तक लिहिले आहे, यावर दुमत होण्याचे कारण नाही. पण त्याबरोबरच समाजातील प्रौढ विचारवंतांना दरक्षणी निर्भेळ सत्य उघड्या डोळ्यांनी पाहण्याची तयारी ठेवावी लागते हे विसरता येणार नाही. म्हणून या पुस्तकाच्या बाबतीत हे ध्यानात ठेवले पाहिजे की, हे पुस्तक प्रेरक आहे. निर्भेळ सत्य तावून सुलाखून मांडणे हे कार्य देशपांडे यांच्यासारखे ध्येयवादी लोक बहुधा करू शकत नाहीत. जगातील सर्व ध्येयवाद्यांची हीच अडचण आहे. त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट, त्यांच्या निष्ठा, त्यांचे व्यक्तिमत्त्व आपणाला नतमस्तक करते, पण निर्भेळ सत्य यांच्या ठिकाणी बहूधा वास करीत नाही. सत्याला भावनांचे रंग चढवून ते अपेक्षित दृष्टीकोणातून आकर्षक रंगात रंगविलेले दिसते.
 या ग्रंथातील देशपांडे यांचे मुख्य प्रतिपाद्य असे की, १८५७ हे एक राष्ट्रीय स्वातंत्र्य-समर होते. भारतीय महिलांनी या रणसंग्रामात जो भाग घेतला यावरून ही गोष्ट अधिक तीव्रतेने जाणवते. आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा किती तरी पटीने या समरात स्त्रियांनी भाग घेतलेला आहे. त्यांच्यातील काही स्फूर्तिदात्या नेत्या होत्या, काही प्रत्यक्ष लढताना धारातीर्थी पडल्या, काहींनी युद्ध चालू असताना पिछाडी सांभाळली, आणि काहींनी फार मोठे हौताम्य पत्करले.मागासलेल्या वर्गातील महिला यांनीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात या संग्रामात भाग घेतलेला आहे. ज्या काळात इंग्लंडमध्ये अजून स्त्रियांची खरेदी-विक्री होत होती आणि ज्या काळात भारतात अजून आधुनिक शिक्षण आलेले नव्हते त्या काळातील भारतीय महिलांनी